Watermelon Production : आमचा माल आम्हीच थेट विकू...

Fruit Farming : पवार बंधू दरवर्षी विकतात काही टनांनी कलिंगडे
Watermelon Farming
Watermelon Farming Agrowon

संदीप नवले

Watermelon Farming : मावडी कडेपठार (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील विशाल आणि सागर या पवार बंधूंनी ‘मार्केटिंग व विक्री’ कला अवगत केली. शेताजवळ रस्त्याकडेला स्टॉल उभारून दर्जेदार कलिंगड, खरबुजासाठी थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारली. व्यापाऱ्यांकडून शेतमालाला चांगले दर मिळत नसल्याच्या समस्येवर त्यांनी अशा प्रकारे सक्षम उत्तर शोधून अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली आहे.

पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील विशाल आणि सागर या पवार बंधूंची
२५ एकर शेती आहे. आठ सदस्यांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. दोघे बंधू कृषी पदवीधारक आहेत. पैकी विशाल यांनी कृषी निविष्ठा कंपनीत १७ वर्षे नोकरी केली. तर सागर कृषी सेवा केंद्रही चालवतात. पूर्वी त्यांचे ऊस हे मुख्य पीक होते.

बारामती येथील कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्गदर्शनातून पवार बंधूंनी सुधारित तंत्रज्ञानावर आधारित शेतीला सुरवात केली. भाजीपाला, फळपिके, तेलबिया, चारापिके आदी पिके घेताना प्रयोगशीलताही ठेवली. राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे, शिवारफेरीत सहभागी होणे, प्रशिक्षण घेणे यातून ज्ञानाचा आवाका वाढून शेतीत बदल घडू लागले.

थेट विक्रीचा मिळाला मार्ग

सन २०१९ च्या दरम्यान पवार बंधूंनी कलिंगड व खरबुजाची सुधारित व्यवस्थापनातून शेती सुरू केली. त्या काळात उत्पादन चांगले मिळाले. पण लॉकडाऊनच्या काळात विक्री व्यवस्था कोलमडली.
व्यापारी दर पाडून माल मागू लागले. अशावेळी नुकसानीत जाण्यापेक्षा आपला माल स्वतः विकून पाहूया असे पवार बंधूंनी ठरवले. त्यांचे शेत बारामती- जेजुरी रस्त्यावर आहे. या मार्गावर प्रवाशांची
सतत गर्दी असते. शेताच्या रस्त्याकडेला लोखंडी कॉट व त्यावर फळे ठेऊन थेट विक्रीस प्रारंभ केला.
हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला. विक्री अपेक्षेपेक्षा चांगली झाली. या प्रसंगानंतर
पवार बंधूंनी यापुढेही एकही फळ व्यापाऱ्याला न देता दरवर्षी थेट ग्राहकांनाच विक्री करायचे असे ठरवले. त्यानुसार विक्रीत सुमारे चार ते पाच वर्षांपासून सातत्य ठेवले आहे.

Watermelon Farming
Ajit Pawar : शेतकऱ्यांनी माल मातीमोल विकू नये : अजित पवार

अशी आहे कलिंगड, खरबूज शेती

-दरवर्षी पाच एकरांत कलिंगड तर एक एकरांत खरबूज लागवड.
-नोव्हेंबर- डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने लागवड. दोन लागवडीमध्ये १५ दिवसांचे अंतर.
त्यामुळे एकदम उत्पादन हाती न येता थेट विक्रीसाठी थोडा थोडा माल उपलब्ध होतो.
-कलिंगडाच्या एकरी पाच हजार तर खरबुजाच्या एकरी सहा हजार रोपांची ‘बेड’ व ‘मल्चिंग पेपर’ वर लागवड.
-पीक संरक्षणासाठी दशपर्णी अर्क, व्हर्मीवॉश , भुसूधारक स्लरी, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर व अन्य सेंद्रिय निविष्ठांचा वापर. पक्षी थांबे, विविध सापळे, मधमाशी पेट्या यांचा वापर.
-रसाळ, चवीला गोड, बाजारपेठेत अधिक मागणी, गर जास्त आदी वैशिष्ट्ये असलेल्या वाणांची निवड.
-कलिंगडाचे एकरी २० ते २५ टन तर खरबुजाचे १० ते १२ टन उत्पादन.

विक्रीसाठी ‘सोशल मीडियाचा वापर

विशाल, त्यांची पत्नी संध्या, सागर, त्यांची पत्नी अश्‍विनी असे चौघेजण थेट विक्रीत सहभाग घेतात.
आई शोभा यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते. बारामती जेजुरी रस्त्यावर शेताच्या कडेला स्टॉल उभारून हंगामात दररोज पाचशे किलो, कधी एक टन तर काहीवेळा कमाल दीड ते दोन टनांपर्यंतही मालाची विक्री होते. कलिंगडाला प्रति किलो २० ते २५ रुपये तर खरबुजाला ४० ते ५० रुपये दर मिळतो. या शिवाय वर्तमानपत्र, ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हॉट्स ॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम व वैयक्तिक फोन आदी विविध माध्यमांद्वारे आपल्या मालाचे यशस्वी मार्केटिंग पवार बंधूंनी केले आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आदी विविध जण फोनवरून संपर्क साधूनही खरेदी करीत आहेत. मागील चार ते पाच वर्षांत आपल्या पाचही एकरांतील संपूर्ण
मालाची थेट विक्री करून काही लाख रुपयांची कमाई पवार बंधूंनी केली आहे.

कराराने शेती

शेतीत विहीर व बोअरची व्यवस्था आहे. मात्र अलीकडील वर्षांत पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. चालू वर्षी देखील पाऊसमान कमी असल्याने पाण्याची स्थिती चांगली नाही. हे लक्षात घेऊन पाणी असलेल्या नजीकच्या भागात पाच एकर शेती कराराने घेतली आहे. त्यातही कलिंगड व खरबुजाचे उत्पादन घेतले जाणार आहे.

थेट विक्रीचा असा झाला फायदा

सागर म्हणाले की जेव्हा आम्ही कलिंगड घेऊन मुंबईला गेलो तेव्हा व्यापाऱ्यांनी किलोला
फक्त आठ रुपये दर देऊ केला. आम्ही थोडा आवाज उठवल्यानंतर मग कसेबसे त्यांनी
दर १४ रुपयांपर्यंत नेला. पण यातून हा धडा घेतला की आपल्या मालाची विक्री आपणच करायची आणि त्यातून नफ्याचे मार्जिन वाढवायचे. आता परिसरातील गावातील शेतकऱ्यांनाही त्याची प्रेरणा मिळत असून तेही कलिंगडाने भरलेला ट्रॅक्टर शेताजवळ उभा करून थेट विक्री करू लागले
आहेत.

विशाल पवार ९७६७००५५२२,
सागर पवार ९०११२२३६१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com