Jalgaon News : खानदेशातील अनेक मध्यम, लघू प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठा यंदा मुबलक आहे. गिरणा धरणातील पाण्याचा कुठलाही वापर झालेला नाही. गिरणासह तापी, वाघूर, पांझरा आदी नद्या अजूनही प्रवाही आहेत.
खानदेशातील एकूण जलसाठा ८४ टक्क्यांवर स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी आदी या मध्यम, लघू प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. तसेच अनेक प्रकल्पांतील जलसाठा मुबलक आहे. पावसाळा संपून एक महिना पूर्ण झाला आहे. परंतु खानदेशातील सर्वांत महत्त्वाच्या नद्यांत प्रवाह आहे.
त्यात गिरणा, तापी, पांझरा, गोमाई, उदय, वाघूर, पांझरा या नद्यांत पाण्याचा प्रवाह आहे. गिरणा धरणातील जलसाठा यंदा १०० टक्के आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. त्यात मागील पावसाळ्यात फक्त ५६ टक्के जलसाठा होता. हा प्रकल्प नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. पण त्याचा लाभ जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांना होतो.
ऑगस्टमध्येच चांगला साठा
मुबलक पाचोऱ्यातील बहुळा प्रकल्पातही सुमारे ८५ टक्के जलसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात १०० टक्के, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातही यंदा १०० टक्के जलसाठा आहे. धुळ्यातील बुराई, अमरावती, मालनगाव, पांझरा, सोनवद या प्रकल्पांतही जलसाठा मुबलक आहे. पांझरा व अनेर या अनुक्रमे साकी व शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठा ऑगस्टमध्येच चांगला होता.
तापी नदीला प्रवाही पाणी
खानदेशात मागील पावसाळ्यात गिरणा नदीला काही दिवस प्रवाही पाणी आले होते. पण यंदा तापी, गिरणा, वाघूर, पांझरा आदी नद्या महिनाभरापासून प्रवाही आहेत. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर, जळगावमधील शेळगाव, धुळ्यातील सुलवाडे, नंदुरबारातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सातपुड्यालगतचे प्रकल्प समाधानकारक स्थितीत
खानदेशात सातपुडा पर्वतालगतच्या प्रकल्पांत जलसाठा चांगला आहे. त्यात नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सुसरी, चिरडे, दरा या लघु प्रकल्पातही जलसाठा १०० टक्के आहे. तसेच धुळे जिल्ह्यात शिरपूरातील अनेर, जळगाव जिल्ह्यात चोपड्यातील गूळ प्रकल्पातही १०० टक्के, यावलमधील मोर प्रकल्पातही १०० टक्के, रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील सुकीमध्येही १०० टक्के जलसाठा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.