Sangli News : शिराळा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाळ्यापासून तिसऱ्यांदा मोरणा धरणासह लघू पाटबंधारेचे सहा तलाव व ४९ पैकी ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. मोरणा व तोरणा नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिराळा तालुक्यात पावसाने सरासरी गाठली नव्हती. तलावातील पाणीसाठा ही कमी झाला होता. परिणामी शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागले होते. त्यामुळे गतवर्षी पाण्याअभावी ५० टक्के क्षेत्र मोकळे पडले होते.
मोरणा धरण व लघू पाटबंधारेची करमजाई, मानकरवाडी, शिवणी, टाकवे, रेठरे व कार्वे तलाव ओसंडून वाहत आहेत. लघू पाटबंधारे उपविभागांतर्गत शिराळा तालुक्यामध्ये एकूण ४९ पाझर तलाव आहेत. सदर तलावांतील पाणी साठवण क्षमता २३६.४१ दशलक्ष घनफूट इतकी असून सद्यःस्थितीत पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामध्ये २२५.९१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सर्व तलावांची सिंचन क्षेत्र क्षमता १ हजार ६५९ हेक्टर इतकी आहे. तसेच तालुक्यामध्ये ११ सिमेंट नाला बंधारेही पूर्ण क्षमतेने भरलेले असून, सदर बधाऱ्यांतील पाणी साठवण क्षमता ४.५२ दशलक्ष घनफूट इतकी असून सद्यःस्थितीत ४.५२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सदर सर्व सिमेंट बंधाऱ्यांची सिंचन क्षेत्र क्षमता ४८.९७ हेक्टर इतकी आहे. तसेच तालुक्यामध्ये ५० वळण बंधारे असून त्यांची सिंचन क्षेत्र क्षमता १ हजार ०८७ हेक्टर इतकी आहे.
शिराळा तालुक्यात १८०० मिलिमीटर पावसाची नोंद
यंदा शिराळा तालुक्यात ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १८०० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील बंधारे आणि तलावातील पाणीसाठा वाढण्यासाठी मदत झाली.
तालुक्यातील करमाळे नंबर १ व पाचुंब्री पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे दुरुस्तीचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे दोन्ही तलावामध्ये ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पामधील पाणी साठ्यामुळे रब्बी हंगामासाठी अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.