डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील
Wheat Crop Water Management : मध्यम ते भारी जमिनीत गहू पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पाणी देणे फायदेशीर ठरते. गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करणे अधिक फायदेशीर दिसून येते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ४० ते ५० टक्के बचत होते.
गहू पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वाफसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी, त्यामुळे उगवण चांगली होते.
पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजून न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवावे. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
संवेदनशील अवस्था पेरणी नंतरचे दिवस
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८-२०
कांडी धरण्याची अवस्था ४५-५०
फुलोरा अवस्था ६०-६५
दाण्यात दुधाळ / चीक अवस्था ८०-८५
दाणे भरण्याची अवस्था ९०-१००
टीप : पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठरावीक वेळेला पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.
एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
गव्हास एकच पाणी दिले, तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले, तर उत्पादनात २० टक्के घट येते.
ठिबक सिंचनाचा वापर
गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करणे अधिक फायदेशीर दिसून येते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ४० ते ५० टक्के बचत होते. उत्पादनात वाढ होते.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी वापर कार्यक्षमता अधिक मिळते, याचबरोबर ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर टँकमधून देता येतात. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते दिल्याने खतांच्या वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत करता येते. पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठ्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. दाणे चांगले भरले जातात. दाण्यांना वजन चांगले मिळते. दाण्याची गुणवत्ताही चांगली मिळते.
ठिबक सिंचनातून १२ हप्त्यांतून अन्नद्रव्ये देण्याचे प्रमाण
लागवडीनंतरचा कालावधी नत्र स्फुरद पालाश
टक्के कि. प्रति हे. टक्के कि. प्रति हे. टक्के कि. प्रति हे.
१-२१ (३ समान हप्ते) २५ ३०.० १५ ९.० २४ ९.६०
२२-४२ (३ समान हप्ते) ४७ ५६.४ २० १२.० ४८ १९.२०
४३-६३ (३ समान हप्ते) २० २४.० ३५ २१.० १६ ६.४०
६४-८४ (३ समान हप्ते) ८ ९.६० ३० १८.० १२ ४.८
एकूण १०० १२० १०० ६० १०० ४०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.