Water Management : गाळरूपी दैत्याच्या संहारातून जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन

Water Shortage : मागील भागामध्ये पाणी व्यवस्थापनामधील ‘सप्तगुरू’ची ओळख करून घेतली. या भागामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये माणसानेच निर्माण केलेल्या एका दैत्याची ओळख करून घेऊ. त्याचे नाव आहे ‘गाळ.’
Water Management
Water ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. नागेश टेकाळे

Water : मागील भागामध्ये पाणी व्यवस्थापनामधील ‘सप्तगुरू’ची ओळख करून घेतली. या भागामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये माणसानेच निर्माण केलेल्या एका दैत्याची ओळख करून घेऊ. त्याचे नाव आहे ‘गाळ.’

हजारो वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर घनदाट जंगल होते. केवळ माणूसच नव्हे तर सर्व सजीव जंगलात आपली उपजीविका करत. साधारणपणे १४ हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला. त्या वेळी माणसाने जंगलातील काही जमीन जंगलाकडून घेतली.

जंगलाचा हा त्याग विसरून माणसे अधिकच हव्यासी बनत गेली. पुढील टप्प्यामध्ये जंगलास मागे ढकलत त्याने शेतीसाठीचे क्षेत्र वाढवत नेले. औद्योगिक क्रांतीनंतर विकासाचा अर्थ बदलला. या विकासाला प्रवाही करण्यासाठी अधिकच क्षेत्र खेचले जात राहिले आणि आजही ही प्रक्रिया अखंड सुरूच आहे. खरेतर घनदाट जंगलाचा पाणी व्यवस्थापनामध्ये मोठा सहभाग आहे.

जंगलेच उद्ध्वस्त झाल्यामुळे तिथे हजारो वर्षांपासून असलेले पाण्याचे शाश्‍वत स्रोत विस्कळीत झाले, आटले गेले, कितीतरी कायमस्वरूपी नष्टही झाले. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या जंगलांचे क्षेत्र कमी होत गेले, तशी त्यामधून वाहणारी ॲमेझॉन नदी प्रथमच आटत गेली.

या नदीतीरावरच घनदाट जंगल असल्यामुळे नदी दुरून दिसतच नसे. स्थानिक आदिवासी तिच्या आवाजावरून तिचे वाहते पात्र शोधत असत. हजारो जुन्या स्थानिक वृक्षांच्या सरळ उंच वाढलेल्या खोडांना शहरात मागणी वाढली. पण व्यवस्थित रस्ते नसल्यामुळे मागणीची पूर्तता करता येत नव्हती. मग वृक्ष कापून या जंगलात महामार्ग तयार करण्यात आला.

वृक्ष नष्ट झाल्यामुळे मुळाजवळील हजारो टन सुपीक माती सैल झाली. मुसळधार पावसामुळे ती सर्व वाहून ॲमेझॉन नदीत गेली. आज जगामधील ही सर्वांत मोठी नदी पूर्णपणे गाळाने भरलेली आहे. ती अनेक ठिकाणी थांबण्याचे मुख्य कारणही तेच ठरत आहे.

ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात आज दहा हजार कि.मी.पेक्षाही जास्त पक्के रस्ते आहेत. त्यातील ७१ टक्के एकट्या ब्राझीलमध्ये, तर उरलेले बेलेव्हिया आणि पेरूमध्ये आहेत. या जंगलात तब्बल ३९० अब्ज पूर्ण वाढलेले वृक्ष आहेत. त्यापैकी ४७० दशलक्ष या रस्ता निर्मितीसाठी नष्ट झाले. आजही ही वृक्षतोड चालूच आहे.

प्रत्येक मिनिटास १०५० पूर्ण वाढीचे वृक्ष कापले जात असल्याचा अहवाल आहे. आपण जर इतकी झाडे कापत असून, तर जागतिक तापमान वाढीचे संकट कसे थोपवता येणार? जेव्हा एक पूर्ण वाढलेला वृक्ष जमिनीस समांतर कापला जातो, तेव्हा त्याच्या वर्तुळाकार पर्णसंभाराखालील जवळपास दीड हजार टन माती मोकळी होते. येणाऱ्या पुढील पावसामध्ये हीच माती जवळपासच्या जलाशयात किंवा जवळच्या नदीमध्ये प्रवेश करते.

तिथे तळाला ती गाळरूपाने स्थिर होते. नदीला जिवंत ठेवणारे भूजलाचे पृष्ठभागावर येणारे नैसर्गिक स्रोत बंद करतो. मग अशी गाळाने भरलेली नदी बारमाही वाहणे कमी होत जाते. त्याऐवजी पहिल्या एक दोन मुसळधार पावासामध्ये दुथडी भरून वाहते. अशा नदीला येणारा हा पूर नेहमी भासमान असतो.

Water Management
Water Management : विश्‍व कल्याणासाठी कार्यरत ‘सप्तऋषी’

गाळ हा पाणी व्यवस्थापनामधील प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. पूर्वी ऋषिमुनी घनदाट अरण्यात जाऊन आश्रम बांधत, जपतप करत, गुरुकुलाची परंपरा चालवत. येथे नेहमी मोठमोठे यज्ञ होत. त्यात अनेक वनस्पतींची फक्त वाळलेली लाकडेच समिधा म्हणून वापरल्या जात.

देवांना प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या यज्ञयागांमध्ये दैत्य नेहमीच विघ्ने आणत असल्याचे उल्लेख आहे. या यज्ञाचे विधी रोखण्यासाठी ते विविध पर्याय अवलंबत. त्यामुळे यज्ञकर्मांचे संरक्षण करण्याचे कार्य तत्कालीन राजे, महाराजे किंवा लढवय्या लोकांकडे येई.

आज पुराणामधील या यज्ञ विधींकडे सकारात्मक रूपाने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याचे महत्त्व पटेल. आपल्या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला तर सप्तऋषींनी केलेला यज्ञ आणि त्यात गाळरूपी राक्षसाने आणलेले विघ्न ही प्रतिमा चपखल बसते. गाळ हा माणसानेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या निर्माण केलेला महाराक्षस आहे.

पाणी व्यवस्थापनामध्ये अडथळा निर्माण करणारा
हा राक्षस आज आपल्यासमोर अकराळविकराळ रूप धारण करून उभा ठाकलेला आहे. वाहत्या नद्या, धरणे, जलसाठे यामध्ये गाळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या प्रमाणावर होणारी नगदी पिकांची शेती आणि खालावलेली वृक्ष संख्या.

जलसाठ्याजवळ सेंद्रिय शेती, गवत लागवड या गाळावर नियंत्रण ठेवते आणि जल साठ्यांचे आयुष्य वाढवते. जलसाठ्यामधील साचलेला गाळ भूजल साठवणीवर नकारात्मक परिणाम करतो. भूजल साठवण वाढवायची असेल तर जलसाठे नेहमीच गाळमुक्त हवेत.

Water Management
Water Management : हा तर सहकारी पाणी वापर संस्थांचा संक्षिप्त इतिहासच

नडीयाम गावाची गाळमुक्तीची यशकथा...
तमिळनाडूमधील तंजावर प्रांतामधील नडीयाम (Nadiyam) हे कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामधील एक गाव. येथील शेतकऱ्यांनी नदीत येणाऱ्या गाळाला रोखण्यासाठी कंबर कसली आणि एक वेगळीच यशोगाथा निर्माण केली. हा प्रदेशच सारा भातशेतीवर अवलंबून. उत्तम पाऊस आणि सुपीक जमीन यामुळे उत्तम भात उत्पादक अशी त्याची ओळख. गेल्या दशकामध्ये तो पूर्ण उजाड झाला. कारण होते समुद्राचे पाणी भातशेतीत घुसणे.

शेती परवडत नसली तरी हजारो वर्षांपासूनची ही पारंपरिक शेती, घरदार आणि एकूणच जमलेली मुळे सोडून शेतकऱ्यांचा पाय काही बाहेर निघत नव्हता. याच गावावर निमल राघवन हा ३५ वर्षांचा तरुण दुबईला नोकरीसाठी गेला. उच्च पगाराची नोकरीमुळे सुखवस्तू कुटुंबामध्ये रमायला काही हरकत नव्हती. पण त्याला आपल्या गावकऱ्यांच्या वेदना पाहवत नव्हत्या. एका क्षणी त्याने दुबईतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून या त्रिभुज प्रदेशामधील शेतकऱ्यांच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला.

कावेरीच्या या त्रिभुज प्रदेशामधील लहान मोठ्या गावांना, शेतकऱ्यांना भेटी दिल्या. सर्व तरुणांना एकत्रित करून त्या परिसरामधील तब्बल ७० लहान मोठे तलाव शोधून काढले. ते सर्व गाळाने भरलेले होते. २०१८ ते २२ या चार वर्षामध्ये या शेकडो तरुणांनी एकत्रितरीत्या हे सत्तर तलाव गाळमुक्त केले.

आता पुढील टप्पा सुरू झाला, तो म्हणजे तलावांमध्ये गाळ न येऊ देण्याचा. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू झाले. भातशेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराने हलकी झालेली माती पावसामुळे जात असल्याचे त्यांनी सर्व गावकऱ्यांना पटवले. तलावामध्ये गाळाऐवजी स्वच्छ पाणी टिकू लागल्यानंतर लोकांनाही त्याचे महत्त्व कळू लागले. गाळमुक्त झालेले तलाव पावसाच्या पाण्याने भरले. संरक्षित पाण्याअभावी उजाड झालेल्या शेती बहरू लागली. या पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करत नारळ लागवडीचा पर्याय निवडला होता. पण सर्वांनाच तो शक्य नसल्यामुळे अडचणी वाढल्या होत्या.

आता भातातूनच चांगले उत्पादन मिळू लागल्यामुळे हजारो सामान्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले. हे हास्य असेच कायम ठेवण्यासाठी राघवनने गावीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गाळमुक्त झालेले हे सर्व ७० तलाव दर चार वर्षांनी पुन्हा गाळमुक्त केले जातात. स्थानिक शेतकरी म्हणतात, ‘‘हे सर्व पारंपरिक तलाव गाळमुक्त केल्याचा सर्वांत जास्त फायदा भूजल वाढण्यामध्ये झाला आहे. काढलेल्या गाळाचे मोठमोठे बांध तलावाकाठी बांधले आहेत. त्यामुळे आता समुद्राच्या भरतीचे पाणी भातशेतीत येत नाही. या सर्व तलावाने भूजल पातळी वाढली असून, शेतात जेमतेम ५० फुटांवरच पाणी लागत आहे. चार पाच वर्षांपूर्वी एवढ्याच पाण्यासाठी २५० फूट किंवा त्यापेक्षाही जास्त खोलीपर्यंत जावे लागत होते.’’

राघवन म्हणतात, “गाळ हा भूजल चार्जिंगचा नंबर एकचा शत्रू आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे भूजल चार्जिंग वाढले. आज हाच गाळ मोठमोठ्या बांधांच्या रूपाने समुद्राच्या खाऱ्या पाण्यास भातशेतीत येण्यापासून रोखत आहे. म्हणजेच समुद्राच्या पाण्याचे आक्रमणसुद्धा थांबले.” आज या भागामधील हजारो अल्पभूधारक शेतकरी पावसाळ्यात पावसावर, तर उर्वरित वर्षात भूजलाच्या साह्याने चार वेळा भात पीक घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज हे सर्व ७० तलाव वर्षभर पाण्याने भरलेले असतात.


या यशानंतर राघवन थांबले नाहीत. त्यांनी पेराव्हुरानी (Peravurani) हा ५५० एकरांवर पसरलेला तलाव सर्वप्रथम गाळमुक्त केला. आता त्यांनी युवकांच्या साह्याने तिरुनेलवेल्ली, पेट्टुकोटाई, शिवगंगा आणि तेथूकुडी या जिल्ह्यामधील तलाव गाळमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. यशोगाथा या फक्त वाचण्यासाठी नसतात, तर अनुकरण करण्यासाठीच असतात, हे लक्षात घेऊन आपणही पुढे झाले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com