
Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या मे महिन्यात भूजल पातळी ५.०४ ते ९.१८ मीटर खोल असल्याचे आढळून आले होते. जिल्ह्यात यंदा १ जून पासून शुक्रवार (ता. ४) पर्यंत सरासरी १७३.६ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात १००.०२ मिमी (५७.७ टक्के) पाऊस झाला आहे. अजूनही सर्वदूर जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी विहिरी, बोअर आदी जलस्त्रोतांतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक लोकवस्त्यांवरील पाणी टंचाईची समस्या कायम आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ८६ निरीक्षण विहीरीतील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. २०२४ च्या जून ते सप्टेंबर या (मॉन्सून कालावधी) ८२७.३ मिलीमीटर (१०८.७ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली होती.
ऑक्टोंबरमध्ये भूजल पातळी सरासरी ४.२० मीटर असल्याचे आढळून आले होते. सततच्या उपशामुळे अनेक भागातील विहीरी, बोअरची पाणी पातळी यंदा जानेवारी महिन्यातच तळाला गेली होती. जानेवारीतील निरीक्षण विहिरीतील नोंदीनुसार जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ६.२७ मीटर खोल असल्याचे आढळून आले होते.
त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ सुरु झाली. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी आणखीच खोल गेली. मे महिन्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून घेण्यात आलेल्या नोंदीनुसार परभणी जिल्ह्यतील भूजल पातळी ५.०४ ते ९.१८ मीटर खोल असल्याचे आढळून आले. २०२० ते २०२४ या पाच वर्षातील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात परभणी,सोनपेठ या दोन तालुक्यातील पातळी खोल गेली आहे.
शुक्रवार (ता. ४) पर्यंत जिल्ह्यातील ९ पैकी केवळ पूर्णा तालुक्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यात सरासरी पावसाच्या ३४.४ टक्के, सेलू तालुक्यात ३९.९ टक्के, मानवत तालुक्यात ४२.५ टक्के, पाथरी तालुक्यात ५६.९ टक्के, जिंतूर तालुक्यात, ५८.३ टक्के, परभणी तालुक्यात ६१.१ टक्के, गंगाखेड तालुक्यात ६९.३ टक्के, पालम तालुक्यात ८०.१ टक्के तर पूर्णा तालुक्यात सरासरीच्या १०३.८ टक्के पाऊस झाला आहे. अनेक लोकवस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.
परभणी जिल्हा भूजल पातळी स्थिती (मीटरमध्ये)
तालुका निरीक्षण विहिरी सरासरी भूजल पातळी मे मधील भूजल पातळी
परभणी १४ ८.९९ ८.४१
जिंतूर २० ७.८१ ७.१९
सेलू १२ १०.०१ ९.१३
मानवत ४ ७.८८ ७.३८
पाथरी ८ ९.०३ ८.८६
सोनपेठ ५ ९.०४ ९.१८
गंगाखेड ९ ९.११ ८.८८
पालम ७ ७.२० ६.९१
पूर्णा ७ ५.९७ ५.०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.