डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Wasteland Critical Area Index, CAI : सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ व सुधारित सूचना २०११ नुसार, प्रत्येक पाणलोट क्षेत्राची रचना, उतार, मातीचा थर, खडकांची रचना, जलधारण क्षमता, वातावरण, जैवविविधता इ. बाबीमध्ये विविधता असते. एखाद्या भागातील पाणलोट क्षेत्राचा विकास करताना केंद्र व राज्य शासनाच्या तीव्र पाणीटंचाई, मातीचे धूप व अन्य सामाजिक बाबी अशा निकषानुसार गावांची निवड केली जाते.
निवड झालेल्या गावक्षेत्राचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातो. सध्या गावक्षेत्रातील पडीक किंवा अनुत्पादक जमिनीचे नकाशे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (GIS) मिळविणे सहज शक्य झाले आहे. हे नकाशे तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात उपलब्ध होतात.
त्या जागांसाठी जल व मृदा संधारणासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. त्यात करावयाच्या उपचारांचे शासकीय दरानुसार आराखडे बनवले जातात. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर प्रस्तावित केलेले उपचार नकाशावरही अधोरेखित केले जातात. या गोष्टीचा पुढील मूल्यमापनाच्या प्रक्रियेदरम्यान खूप फायदा होतो. या लेखामध्ये आपण पडीक / अनुत्पादक जमीन (Critical Area Index, CAI) या विषयी निर्देशांक समजून घेणार आहोत.
पडीक जमीन/अनुत्पादक जमीन (CAI) =
पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे लाभ झालेली अनुत्पादक जमीन / गावातील एकूण अनुत्पादक जमीन.
याचे आपण एक उदाहरण बघू
उदाहरणार्थ एका गावांमध्ये २६०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास २५० हेक्टर क्षेत्र हे पडीक किंवा अनुत्पादक आहे. या गावांमध्ये पाणलोट क्षेत्र उपचारामुळे २५० हेक्टर क्षेत्र पैकी २३० हेक्टर क्षेत्र हे शेती योग्य व उपजाऊ बनले आहे. उपरोक्त सूत्रानुसार त्याचे उत्तर असे असेल.
पडीक जमीन/अनुत्पादक
जमीन हे.(CAI) = २३० हे/२५० हे
=०.९२.
या दर्शकाची/ निर्देशकाची जास्तीत जास्त किंमत १ इतकी येऊ शकते. जेवढी जास्त किंमत तेवढे जास्त क्षेत्र कृषी उत्पादनयोग्य झाल्याचे लक्षात येते. पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांच्या मूल्यमापनामध्ये हा निर्देशांक वापरणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरते.
कोणत्याही ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर उपचार केलेल्या क्षेत्राची नोंदणी ग्रामपातळीवर करावी. अशा काम झालेल्या क्षेत्रामध्ये पूर्वीचे उपचार प्रस्तावित करू नयेत. त्या ऐवजी पुढच्या कार्यक्रमांमध्ये उर्वरित पडीक क्षेत्राचा समावेश करता येईल. एकाच गावात एकाच क्षेत्रावर तीच तीच कामे करण्यामध्ये निधीचा अपव्यय होतो. त्या ऐवजी हा राज्य किंवा केंद्र सरकारचा निधी अन्य गरजू गावांसाठी वापरता येईल.
याशिवाय झालेल्या उपचारांची डागडुजी करणे हे त्याचा लाभ होणाऱ्या स्थानिकांचे काम आहे. अथवा मोठे काम असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी डागडुजीबाबत संबंधित पाणलोट विकास समिती किंवा ग्रामपंचायत यांना कळविणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविलेल्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या सरकारी अथवा बिगर सरकारी ( स्वयंसेवी) यंत्रणा कार्यरत असतात. त्यांनी या निर्देशांकाचा समावेश आपल्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये करावा. म्हणजेच मूल्यमापनाची प्रक्रिया ही तांत्रिक दृष्ट्या योग्य राहील. या दर्शकाची प्रक्रिया प्रथमदर्शनी सोपी वाटत असली तरी खूपच महत्त्वाची आहे. तांत्रिक निकषाच्या आधारे योग्य कामे केलेल्या गावांमध्ये जल, मृदासंशोधन अधिक शाश्वत झाल्याचे दिसते.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.