Agriculture Development : शेतीत वाहणार नवतंत्रज्ञानाचे वारे

Pratap Pawar Article : शेती क्षेत्रासमोरील आव्हानांमध्ये वाढ होत आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला अचूक मार्गदर्शन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयोगी ठरू शकते.
Pratap Pawar
Pratap PawarAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology : शेती क्षेत्रासमोरील आव्हानांमध्ये वाढ होत आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला अचूक मार्गदर्शन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयोगी ठरू शकते. त्याच्या विकास आणि प्रसारासाठी बारामती येथील ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ यांच्या सोबतच बिल गेट्स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड अशा जागतिक संस्था एकत्र आल्या आहेत.

त्यांनी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाइब्ज’ असा कृषी क्षेत्रात क्रांतिकारी ठरणारा प्रकल्प सुरू केला आहे. बारामती येथील १७ ते २२ जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या ‘कृषिक’ या प्रात्यक्षिक प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी इ. अत्याधुनिक तंत्रज्ञान मांडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण प्रवास आणि त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत ट्रस्टचे विश्‍वस्त व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याशी झालेली बातचीत.

राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, माध्यम अशा अनेक क्षेत्रांत पवार घराणं कायम आघाडीवर राहिले आहे. तरीही या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शेती क्षेत्राशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. उद्योगामध्ये कार्यरत असतानाही आपणही ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून ते नातं जपलं, ते कसं?
श्री. पवार : खरं म्हणाल तर ‘ॲग्रोवन’ सुरू करण्याचं सारं श्रेय अभिजितचे! त्यासाठी सुरुवातीला सर्वेक्षण करून ६० ते ७० हजार शेतकऱ्यांची मते, विशेषतः त्यांना काय वाचायला आवडेल, हे जाणून घेतले. भरपूर अभ्यास आणि पूर्वतयारीनंतर ‘ॲग्रोवन’ आकाराला आला. अर्थात, तुम्ही संपादक मंडळींनी त्याला पुढे नेले आहे. वर्तमानपत्रात शेतकऱ्यांना काय आणि केव्हा द्यायचे, त्याची भाषा हे सारं संपादक ठरवतात. पण एकूणच उत्कृष्ट समन्वयातून होत गेलेला प्रवास हेच ‘ॲग्रोवन’च्या यशाचे गमक म्हणायला हवे.

Pratap Pawar
Indian Agriculture : मुंबई सोडून भागाबाई पुन्हा परतल्या शेतीत

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती आणली. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी कृषी क्षेत्राला बळकट केले. त्यातून उत्पादकता वाढली असली, तरी शेतीमाल विक्रीतून शेतकऱ्यांऐवजी मध्यस्थाला पैसे मिळवून देणारी व्यवस्था उभी राहिली. यातून आता कसे पुढे जायला हवे?
श्री. पवार :  गेली ५५ वर्षे मी व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. सामाजिक काम करताना डोळ्यासमोर समाज असतो; पण व्यवसाय करताना नफा-तोटा पाहायलाच हवा. शेती हा व्यवसाय असेल तर त्यातही नफा कसा वाढेल हेच बघायला हवे. त्यासाठी खर्च कमी करून उत्पादन वाढवले तरच नफा वाढेल. माझ्या मते हाच नफ्याचा विचार शेतीत केला जात नाही. दुसरे असे, की पुरवठा व मागणी हा व्यापारातील मुख्य घटक आहे. केवळ ग्राहकांचा विचार करून शेतीमालाचे भाव न वाढण्यासाठी केंद्र सरकार हस्तक्षेप करत राहते.

त्यात शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले जाते. खरे तर शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकरीभिमुख धोरणे आखल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. क्रयशक्ती वाढल्यामुळे सर्वच बाजारपेठांची वृद्धी झाली. टीव्ही, दुचाकी, ट्रॅक्टर्स अशा सर्वच बाजारांमध्ये वाढ झाली. कारण शेतकऱ्यांकडे पैसा आला तर तो बाजारात टाकला जातो. पण सध्या तसे होत नाही. सध्याचे सरकार त्याला मारणारे ठरत आहे. हे राजकीय नाही, तर माझे व्यक्तिगत मत आहे. अर्थात, समोर आलेल्या परिस्थिती, समस्यांनुसार स्वाभाविकपणे धोरणकर्ते, सरकार वागत जात असले, तरी त्यातून शेतकऱ्यांचे भले होत नाही, हेच खरे.

Pratap Pawar
Indian Agriculture : शेतीत जगन्नाथाचे हात यापुढेही दिसतील?

शेतीला यांत्रिकीकरणानंतर संगणकीय प्रणालीची आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानाची ही आव्हानं कशी पेलणार?
श्री. पवार : शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यायला हवी, असा विचार घेऊन आम्ही आता बारामतीत वेगाने काही प्रकल्प सुरू करीत आहोत. या संकल्पनेत तसा मी अपघातानेच उतरलो. झालं असं, की एकदा लंडनच्या दौऱ्यावर असताना ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी गप्पा चालू होत्या. आश्‍चर्य म्हणजे त्यांना शिक्षणाऐवजी शेतीत जास्त रस असल्याचे मला जाणवले. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही स्वतः शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात काही तरी करायला हवे. ते म्हणाले, की त्यासाठी उत्कृष्ट मनुष्यबळ, साधनं, आंतरराष्ट्रीय अनुभव हवा. त्यावर मी त्यांना म्हणालो, की हे सारं माझ्या बारामती गावात आहे.

त्यानंतर ते इथे आले. ऑक्सफर्ड पाठोपाठ बिल गेट्स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्टमधील तज्ज्ञ मंडळीदेखील बारामतीत दाखल झाली. बारामतीमधील विविध उपक्रम पाहिल्यानंतर ही तज्ज्ञ मंडळी चकित झाली. अशा सुविधा भारतात आणि त्यादेखील बारामतीसारख्या ठिकाणी आहेत, याचंच त्यांना आश्‍चर्य वाटलं. अर्थात, ते इथं आले आणि इथे सुरू असलेल्या या साऱ्या उपक्रमांचे श्रेय शरद पवार यांचेच. जगातील या तीन सर्वोत्कृष्ट संस्थांनी ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’बरोबर येऊन शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यासंदर्भात उपक्रमाला सुरुवात झाली. यात मी केवळ समन्वयकाची भूमिका बजावली. उत्तम पूरक कामे आणि समन्वयामुळेच आम्ही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाइब्ज’ प्रकल्प उभारण्यात यशस्वी ठरलो.

अप्पासाहेब पवार यांनी सुरू
केलेल्या ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चा प्रवास थक्क करणारा आहे. शेतकऱ्यांमध्ये केलेला शास्त्रीय
ज्ञानाचा प्रसार विलक्षण आहे. त्याला आता जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे?

श्री. पवार : सामान्यातील सामान्य माणसांच्या हाती मोबाइल दिसतो. तो कसा तयार झाला हे कळत नसले, तरी वापरायला जमते. म्हणजेच तंत्रज्ञान कितीही अवघड असले तरी ते हाती आले, रुळले की सोपेच वाटते. आपल्या नव्या प्रकल्पातही याच मोबाइलद्वारे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हाताळता येईल. आणखी एक साधं उदाहरण घेऊ. पूर्वी पत्ता शोधण्यासाठी चार ठिकाणी विचारत फिरत राहावे लागे. आता गुगल मॅपवर पत्ता टाकताक्षणी जवळचा, कमी रहदारीचा मार्ग दाखवला जातो.

आता गुगल मॅप कसे काम करते, हे जाणून घेण्यात काय उपयोग? आपलं काम भागते हेच महत्त्वाचे आहे. शेतीची पुढची दिशा दाखवणारं सारं आधुनिक तंत्रज्ञान बारामतीमध्ये १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कृषिक प्रदर्शनामध्ये मांडणार आहोत. शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीकडे न्यायचे आहे. आपण करत असलेली शेती अधिक शास्त्रीय, काटेकोर करण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी बारामतीत येऊन जरूर त्याचा अभ्यास करावा. या भविष्यातील शेतीकडे सर्वांनी वळण्याची गरज आहे. त्यासाठी या प्रकल्पातून सर्व मदत पुरवली जाणार आहे. शेतीमध्ये जिथे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी यासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, ते वापरण्यात येणार आहे. शेतीच्या एकेका अंगावर काम सुरू असले, तरी असा सर्वांगीण विचार करणारा जगातील असा पहिलाच प्रकल्प बारामतीला होतो आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.

एकदा तज्ज्ञांशी चर्चा करताना लक्षात आले, की पुढील काही वर्षांनंतर कदाचित मॉन्सून गायब होईल. आपल्याकडे मॉन्सूनच्या नियमित पावसावर आधारित खरीप, रब्बी शेतीची हजारो वर्षांची परंपरा आहे. पण मॉन्सून नसेल तर कसं होणार? हवामानातील बदल इतक्या वेगाने होत असून, अनिश्‍चितता सर्वच शेतीक्षेत्राला भेडसावणार आहे. या प्रगत तंत्रामध्ये उपग्रह आणि प्रत्यक्ष शेतातील सेन्सर्सद्वारेही हवामानावरही सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यातील किंचित बदलही किंवा संभाव्य अंदाजही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर समजू शकतील.

त्याचा वेळीच अंदाज मिळाला तर शेतकरी पीक आणि त्यातील व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करून आपले नुकसान टाळू शकतील. आपल्या जमिनीतील मातीचा प्रकार, अन्नद्रव्ये, आर्द्रता यांचा अंदाज घेऊन चक्क तुम्हाला पीक कोणते घ्यावे हेही तुमच्या मोबाइलवर समजू शकेल. आज आपण सरसकट खते देतो. पण एखाद्या शेतात नत्राची गरजच नाही, केवळ स्फुरद द्या, असे ॲप्लिकेशन सांगेल.

पिकातील वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सिंचनाचे वेळापत्रकही बनवून देईल. म्हणजेच खते, पाणी दोन्हींमध्ये बचत होईल. ज्या प्रमाणे आई आपल्या बाळाची गरज जाणून नेमक्या वेळी खाऊ घालून मुलाला सुदृढ बनवते, तसे आपल्या शेतीचे होईल. आता केवळ ऊस पिकाचे उदाहरण घेतले, तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादन किमान ३० टक्क्यांनी वाढेल, तर खते, कीडनाशके अशा खर्चात २० ते ३० टक्क्यांनी बचत होईल.

म्हणजेच नफ्यात ५० टक्क्यांची वाढ होईल, असा आमचा अंदाज आहे. काही मोजके शेतकरी एकरी शंभर टनाचा टप्पा ओलांडत असले, तरी आज उसाचे सरासरी उत्पादन ४० टन आहे. या शेतकऱ्यांपर्यंत तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकऱ्याच्या पद्धती, कधी आणि काय करावे याचे बिनचूक आणि वेळेवर मोबाइल ॲपद्वारे मार्गदर्शन पोहोचले, तर त्यांच्याही उत्पादनामध्ये मोठी वाढ होईल. हीच वेळोवेळी शास्त्रीय मार्गदर्शनाची सुविधा या नव्या तंत्रज्ञान व प्रकल्पामुळे आपल्या हातातील मोबाइलवर येणार आहे. पहिल्या टप्प्यात ऊस पिकावर काम सुरू असले, तरी लवकरच अन्य पिकांबाबत ‘एसओपी’ तयार केल्या जातील.

महाराष्ट्रात राबविल्यानंतर हे तंत्रज्ञान पुढे देशभरातील शेतीमध्ये नेले जाईल. शेतीमधील पायाभूत सुधारणा करणारा हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाइब्ज’ प्रकल्प व त्याच्या सामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याबाबत प्रसारासंदर्भात आमची माध्यमांकडून मोठी अपेक्षा होती, पण आजची बहुतांश माध्यमे राजकीय बातम्यांतच हरवलेली आहेत. हे खरे तर आपले दुर्दैव आहे.

थोडक्यात, हा प्रकल्प म्हणजे शेतीचा स्कॅनर असेल. शेतीला नेमके काय हवे, ते त्या त्या वेळीच शेतकऱ्यांना सुचविणारे हे तंत्रज्ञान आहे. पण या तंत्रज्ञानातून मार्केट इंटेलिजन्सची सुविधा मिळू शकेल काय?
श्री. पवार : तुम्ही तुमच्या शेतात उभे राहून केवळ ‘को-ऑर्डिनेट’ दिल्यास तेथील जमीन, माती, तिचा प्रकार आणि त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण यांचा अंदाज घेऊन हीच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला पिकाची निवड करायला मदत करेल. उदा. इथे टोमॅटोपेक्षा कांदा घेणे फायदेशीर असल्याचे सुचवेल. पण त्याच वेळी देशात नेमके कांद्याची किती लागवड होईल व त्याची आवक याचाही अंदाज देईल. त्याच प्रमाणे सध्याच्या हवामानासोबतच संभाव्य हवामानाचे अंदाज मिळाल्याने स्वतःच्या उत्पादनाचाही ९८ टक्क्यांपर्यंत अचूक अंदाज मिळू शकेल. परिणामी, शेतकऱ्यांना बाजार व्यवस्थेचा निर्णय घेणे सोपे जाणार आहे.

या प्रकल्पातील ‘इमेजिंग अल्गोरिदम’ तंत्र उसातील सुक्रोजच्या अत्युच्च प्रमाणानुसार ऊस कापणीचा सल्ला देईल. परिणामी, साखर उताऱ्यामध्ये दोन अडीच टक्के वाढ होईल. उत्पादन वाढल्याने शेतकऱ्याचा फायदा होईल, तर साखर उतारा वाढल्याने कारखानदारांना लाभ होईल. शेतीतील सर्वेक्षण, स्पॉट ॲप्लिकेशन किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी ड्रोन वापरण्यावरही काम सुरू आहे. यात सातत्याने संशोधन आणि सुधारणा होत राहणार आहेत.

या तंत्रज्ञानामध्ये रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) शेतीबाबत मार्गदर्शन मिळू शकेल काय?
श्री. पवार : सध्या फळे, भाजीपाल्यांमध्ये वापरली जाणारी कीडनाशके अत्यंत धोक्याची असून, माणसांना आजारांकडे नेणारी ठरत आहे. आज अनेक भागांत कर्करोगग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे. या तंत्रज्ञानातून पिकाला वेळीच खते, पाणी मिळाल्यामुळे ती सशक्त राहतील. मुळातच किडीचा प्रादुर्भाव कमी राहील. प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन नेमक्या तेवढ्याच जागी योग्य त्याच रसायनाच्या फवारणीची सूचना मिळेल. तसे नियोजन केले की आपला शेतीमाल ‘रेसिड्यू फ्री’ होऊ शकतो. त्यातून निर्यातीची दालने खुली होतील. माझ्या मते हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असून, शेतीत आमूलाग्र बदल होणार आहे. शेतीत आधी आपण हाताने काम करायचो, नंतर जनावरे-घोड्याच्या मदतीने काम करू लागलो. नंतर यंत्रे व ट्रॅक्टर्स आले. आता संगणक आणि त्यापुढे कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीत येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सामान्यांतील सामान्य शेतकऱ्यांनाही करता येईल, यावर भर राहील.
 

वतंत्रज्ञानाचा आपण स्वीकार न केल्यास त्याचे दुष्परिणाम काय असतील?
श्री. पवार : अन्न ही मानवाची पहिली गरज आहे. कमी खर्चात, जास्त व दर्जेदार अन्नधान्याचे उत्पादन देणारे तंत्रज्ञान स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे फारसा पर्यायच नाही. आपल्याला खड्ड्यात जायचे की शिखर गाठायचे, हे ठरवावे लागेल. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असला, तरी शेतीमध्ये त्याचा वापर करण्याची मोठी संधी आपल्याकडे चालून येत आहे. आपल्या दारात गंगा आलेली असताना त्यातील पाणी घेतले नाही, तर दोष आपलाच असेल. पण मला वाटते, आपला शेतकरी प्रयोगशील आहे, फक्त या प्रयोगांना नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन वाढेल. त्याचे, समाजाचे आणि पर्यायाने देशाचेही कल्याण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com