Article by Indrajit Bhalerao : कृष्णात खोत या माझ्या आवडत्या लेखकाला रिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं आणि मला खूप आनंद झाला. साहित्य अकादमी या गुणी लेखकावर अन्याय करते आहे, असं मागच्या अनेक वर्षांपासून मला वाटत होतं.
या वेळी अकादमीनं ती उणीव भरून काढलेली आहे. कृष्णातनं ‘रिंगाण’च्या रूपानं एक अफाट क्षमता असलेली कादंबरी लिहिली आणि तिला प्रतिसादही खूप चांगला मिळाला. जाणत्या वाचकांपासून ते विचारवंत समीक्षकांपर्यंत सर्वांनाच या कादंबरीनं झपाटून टाकलं.
माणसाचं आदिम जगणं पाहिलेला आणि नव्या जाणिवेनं व ताकदीनं ते साहित्यात आणणारा कृष्णातशिवाय अन्य मराठी लेखक आज विरळा आहे. कृष्णातचा जन्म डोंगरकपारीतल्या आदिम जीवन जगणाऱ्या एका वस्तीत झालेला आहे. त्यामुळे हे सगळं जगणं त्यानं आतून पाहिलेलं आहे. त्याच्या एका पुस्तकाचं नावच आहे ‘नांगरल्याविण भुई.’ कृष्णात आज साहित्यात जी भुई कसतो आहे, ती याआधी कुणीही कसलेली नाही.
नांगरल्याविण पडीक असलेली ही आदीम भुई कृष्णात नांगरतो आहे. नव्यानं वहितीत आणलेल्या जमिनीचं वैशिष्ट्य असतं की ती अत्यंत उपजाऊ असते. तिथं घेतलेलं पीक उधाणून येत असतं. कृष्णातच्या लेखनाचं असंच काहीसं झालेलं आहे. उसळी मारून त्याच्या साहित्यात येणारं हे जगणं आज मराठी साहित्यासाठी एक नवलाई झालेलं आहे.
योगायोगानं मागच्याच वर्षी, एप्रिल २०२२ मध्ये, कृष्णातच्या जन्मगावी मी जाऊन आलेलो आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना डोंगरदऱ्यातून पन्हाळगडाच्या पायथ्यानं संजीवन विद्यालयाकडं प्रवास करताना मध्येच निकमवाडी नावाचं गाव लागलं. हेच कृष्णातचं गाव. गाव ओलांडताना मी कृष्णातला सहज फोन लावला, तर त्यानं फोन उचलला नाही. थोडं पुढं गेल्यावर त्याचा फोन आला.
त्याला म्हटलं, ‘‘आम्ही तुमच्या गावात आणि तुम्ही फोन पण उचलत नाही राव!’’ त्याला वाटलं मी कोल्हापुरातून बोलतोय. तो म्हणाला, ‘‘सर, मी आज रविवारचा गावाकडं आलोय.’’ त्याला म्हटलं, ‘‘येड्या मी तुझ्या गावातूनच बोलतोय.’’ त्यानं विचारलं, ‘‘कुठं आहात?’’ मी म्हटलं, ‘‘तुला फोन केला तेव्हा आम्ही तुझ्या निकमवाडीतच होतो. तू फोन उचलला नाहीस, तेवढ्यात आम्ही तुझं गाव ओलांडून पुढं संजीवन विद्यालयाकडं निघालो.’’ ‘‘मग फिरा मागं,’’ तो म्हणाला.
गावाबाहेरच डोंगर चढणीवर कृष्णातच्या मोठ्या भावानं बांधलेल्या घरात तो थांबला होता. त्यानं सांगितलेल्या डोंगर उताराच्या खाणाखुणा पार करत आम्ही त्याच्या भावाच्या घरी पोहोचलो. त्याच्या भावाचं हे घर चढणीवर असल्यामुळे तिथून त्याचा जुना गाव नजरेच्या टप्प्यात दिसत होता. त्याच्या कथा-कादंबऱ्यातून आलेला हा सगळा गावशिवार मी डोळ्यात आणि मोबाइलमध्ये साठवून घेत होतो.
हा भाग अजूनही जंगलीच आहे. इथं सगळी जंगली श्वापदं वावरतात. कृष्णातचा भाऊ या श्वापदांची चित्रं आपल्या बोलण्यातून इतकी आखीव-रेखीव आमच्यासमोर उभी करत होता, की मला कृष्णातच्या लेखनातले उतारे आठवत होते. कृष्णातच्या लेखनातल्या अनुभवाचे भांडार ज्या अंबारातून आले ते अंबारच साक्षात माझ्यापुढं उभं होतं.
कृष्णात आता कोल्हापूरला राहतो. लहाना भाऊ गावातल्या जुन्या घरात राहतो आणि मोठा भाऊ इथं या घरात राहतो. सगळ्यांच्या वागण्या-बोलण्यातला एकोपा पाहून खूप आनंद वाटला. मला कृष्णातच्या लेखनातून हे सगळं कुटुंब आधी भेटलं होतंच. आता ते समोर साक्षात बघत होतो.
घर, गोठा आतून बाहेरून फिरून पाहत होतो. कोपरान् कोपरा न्याहाळत होतो. कृष्णातच्या कोणत्या लेखनात यातल्या कोणत्या वस्तू आल्यात ते तपासून पाहत होतो. प्रत्येक वस्तू आणि माणूस माझ्या मोबाइलमध्ये पकडत होतो.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी त्याची गावठाण ही कादंबरी मौजेच्या दिवाळी अंकात आली; तेव्हापासून या लेखकानं मला वेड लावलं. नंतर ही कादंबरी ‘मौजे’नंच पुस्तक रूपात आणली. तेव्हा पुन्हा एकदा ती कादंबरी मी वाचली. ‘लोकसत्ते’तल्या माझ्या सदरात मी या कादंबरीवर लिहिलं देखील. तेव्हा प्रथम कृष्णातचा परिचय झाला. अधूनमधून आम्ही फोनवर बोलत राहिलो.
कृष्णात म्हणाला, ‘‘सर, कोल्हापूरला विद्यापीठात मी पदवीच्या वर्गात शिकत होतो तेव्हा पीकपाणी हा तुमच्या कवितासंग्रह माझ्या अभ्यासक्रमात होता. आणि आता मी तुमची पाठ्यपुस्तकातली कविता शाळेत शिकवत असतो. तुम्हाला मी फार आधीपासून ओळखतो. पण आयुष्यात आपली कधी भेट होईल आणि तुम्ही माझ्या पुस्तकावर लिहाल याची मी कल्पनाही केलेली नव्हती.’’
पुढं दिवाळी अंकातून आणि वाङ्मयीन नियतकालिकांतून येणारं त्याचं लेखन मी वाचत होतो. कृष्णात कथा लिहीत होता, व्यक्तिचित्रं लिहीत होता आणि लहान मुलांसाठीही खूप चांगलं लेखन करत होता. पण त्याचं हे मुलांसाठीचं लेखन अजून पुस्तकरूपात आलेलं नाही. आमचा फोनवर संपर्क होता. एकमेकांनी वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांविषयी एकमेकांना सांगत होतो.
मी कोल्हापूरला गेलो आणि कृष्णातला माहीत झालं, तर तो आवर्जून भेटायला येत होता. कधी मेहतांच्या दुकानात तर कधीही रवींद्र जोशी यांच्या अक्षरदालनमध्ये. प्रा. भारत काळे यानं सुरू केलेला बाराशिव पुरस्कार एका वर्षी कृष्णातला मिळाला; तेव्हा कृष्णात परभणीलाही येऊन गेला. फार घाईत आला आणि घाईत गेला. पण भेट झाली, गप्पा मारता आल्या.
एरवी कृष्णात फारसा कुठं जात नही. आपण, आपली शाळा, आपलं लेखन यावरच तो लक्ष केंद्रित करतो. मधल्या काळात त्याची नोकरी धोक्यात आली होती. त्यामुळे तो आयुष्यात अस्थिर झाला होता. त्याच्या भोवतीच्या लेखकमित्रांनी त्याच्यासाठी खूप धडपड केली आणि एकदाचा तो प्रश्न निकाली लागला.
त्याच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता आली. नाहीतर त्याला पुन्हा एकदा त्या आदिम जगण्याकडं परत जावं लागलं असतं. मग त्याच्यातला लेखक फुलत राहिला असता की कोमेजून गेला असता ते सांगता येत नाही. दरम्यान, झड-झिंबड, रौंदाळा, धूळमाती, रिंगाण या त्याच्या कादंबऱ्यांतून त्याच्या लेखनाची कमान चढतीच राहिली. डोंगर कपारीतल्या आदिम शेतकऱ्यांचं जगणं प्रथमच त्यानं आपल्या कादंबऱ्यांमधून मांडलं. आज मराठी साहित्यात त्याचा एक वाचकवर्ग आहे. सगळ्या थोर समीक्षकांचाही तो लाडका लेखक आहे. मराठी साहित्यात त्यानं आपली स्वतंत्र वाट निर्माण केलेली आहे.
दोनेक वर्षांपूर्वी ‘मौजे’नंच त्याचा ‘नांगरल्याविण भुई’ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह प्रकाशित केला. गावठाण आणि हे पुस्तक वाचताना मला सतत व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी आणि माणदेशी माणसं ही पुस्तकं आठवत होती. गावठाण ही गुरं राखणाऱ्या एका मुलीची कथा. ‘नांगरल्याविण भुई’मध्ये याच गावातली आदिम जीवन जगणारी माणसं आलेली आहेत.
भुई धरून असलेला आणि आभाळाला भिडलेला हा लेखक मला नेहमीच व्यंकटेश माडगूळकरांच्या जातीचा वाटत आलेला आहे. आपण भलं आणि आपलं लेखन भलं; याशिवाय वर मान करून वाङ्मयव्यवहारातल्या उचापतीकडं तो ढुंकूनही पाहत नाही. या भेटीत कृष्णात पुढं आमच्यासोबत पन्हाळगडावरही आला.
त्याचं शिक्षण पन्हाळ गडावरच्याच शाळेत झालेलं आहे. लहानपणी तो पायथ्याखालच्या त्याच्या गावातून रोजच सगळा कडा चढून गडावरच्या शाळेत जायचा. वर जाताना करवंदाच्या जाळीत फाटू नयेत म्हणून तो अंगावरचे कपडे काढून दप्तरात ठेवायचा.
गरिबी इतकी की अंग फाटलं तर भरून येईल पण कपडे कोण भरून देणार...? असा विचार ही मुलं करायची. करवंदांच्या जाळीतून वर गडावर गेलं की लता मंगेशकर यांचा बंगला लागायचा. त्या बंगल्यासमोर उभं राहून दप्तराले कपडे काढायचे, ते अंगात घालायचे आणि मग पळत शाळेत जायचं.
कृष्णातनं त्याचा शाळेला जाण्याचा तो रस्ता मला गाडीकड्यावर चढताना खिडकीतून दाखवला. वर गेल्यावर त्यानं त्याची पन्हाळगडावरची शाळाही मला आवर्जून दाखवली. आम्ही गेलो तो दिवस सुट्टीचा होता. त्यामुळे त्या शाळेला कुलूप होतं. पण तिथं राहणाऱ्या एका शिक्षकाला फोन करून कृष्णातनं बोलावून घेतलं आणि शाळा उघडून दाखवली.
छत्रपती ताराराणी यांच्या घरातच ही शाळा भरायची. सध्या याच संस्थेच्या बेळे गावातल्या शाळेत कृष्णात नोकरी करतो. हे सगळं सांगताना, दाखवताना तो खूप आनंदित होता आणि हे सगळं पाहताना मी त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदी होतो. कारण त्याच्या साहित्यातून वाचलेल्या जागा त्याच्या सोबत त्यानंच करून दिलेल्या परिचयासह मला पाहायला मिळत होत्या.
आठवून आठवून मी त्याला त्याच्या साहित्यातल्या खाणाखुणा विचारत होतो. दिवसभराच्या त्याच्या सहवासात मला माझा एक आवडता लेखक आतून-बाहेरून समजून घेता आला. त्याच्या नजरेतून त्याचा भूतकाळ पाहता आला, वर्तमान अनुभवता आला आणि पन्हाळगडाचा इतिहासही समजून घेता आला.
: ८४३२२२५५८५ (लेखक प्रख्यात कवी आहेत.)
(छायाचित्रे ः संतोष पेडगावकर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.