
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Planning and Budgeting of Warehouse: गोदामाचे अंदाजपत्रक आर. सी. सी स्ट्रक्चर याची तयारी ही सिव्हिल इंजिनिअर, सनदी इंजिनिअर, सनदी आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चर इंजिनिअर यांच्या मार्फत तयार करून घेणे अपेक्षित आहे. इंजिनिअरची जबाबदारी असली तरी त्यातील व्यावहारिक माहिती गोदाम मालक किंवा गोदामाची उभारणी करणारी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांचे संचालक, व्यवस्थापक किंवा सचिव यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी गोदाम एस्टीमेट व डिझाइनची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला मास्टर लेआउट तयार करताना खालील घटकांचा समावेश करावा.
गोदामाच्या ठिकाणापासून नियमानुसार इतर उपघटक जसे की रस्ता, उपरस्ता, मुख्य रस्ता व इतर महत्त्वाची ठिकाणे यांचे अंतर नमूद करणे.
गोदामाची इमारत, गटार व्यवस्था, प्लॅटफॉर्म इत्यादी
कार्यालयाची इमारत, अंतर्गत रस्ते.
उपहारगृहाची इमारत
हमाल कामगार यांच्या निवास व्यवस्थेसाठी इमारत
वीज व्यवस्था अथवा इलेक्ट्रिफिकेशन
कुंपणाची भिंत, गेट व सुरक्षारक्षकांचे केबिन, वाहनतळ, वजनकाटा
पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा
कूपनलिका (गरजेनुसार)
प्लॅन आणि इस्टिमेशनच्या दुसऱ्या टप्प्यात मास्टर लेआउटची तयारी पूर्ण झाल्यानंतर गोदामाच्या रचनेचे तपशीलवार नियोजन, मध्यवर्ती ठिकाणची व बाजूची उंची, गोदामासाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकामाचे साहित्य, कामगार, मशिनरी इत्यादीची तपशीलवार माहिती संबंधित गोदाम मालकाशी चर्चा करून त्याची मान्यता घेऊन तयार करण्यात यावे.
सुरुवातीला बांधकामाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी गोदाम उभारणीची जागा आहे, त्या जागेवर गोदाम उभारणीबाबत ग्रामपंचायत / नगर परिषद / नगरपालिका / महानगरपालिका / पीएमआरडीए, विभागीय टाउन प्लॅनर यांच्या मान्यतेचे प्रमाणपत्र घ्यावे.
गोदाम व मास्टर लेआउटनुसार तपशीलवार एस्टिमेट तयार करण्यात यावे.
अंदाजपत्रक तयार करण्याचे टप्पे
गोदाम उभारणीच्या जागेवर मधोमध नमुना खड्डा घेण्यात यावा. त्याचे आकारमान १.२ मीटर × २.१ मीटर × १.२ मीटर असणे आवश्यक आहे. या नमुना खड्ड्यावरून गोदाम निर्मिती करण्यात येणाऱ्या जमिनीची तपशीलवार माहिती मिळते. यामध्ये जमिनीत कच्चा मुरूम, पक्का मुरूम, काळी माती, हलकी माती, खडक यांचे किती प्रमाण आहे, हे दिसून येते. त्यावरून गोदामाचा पाया किती खोल जाऊ शकतो, याचा अंदाज येऊन त्यानुसार खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे सोपे होते. नमुना खड्डा न घेतल्याने अंदाजपत्रकात चूक होऊन खर्चात वाढ होऊ शकते.
नमुना खड्ड्यावरून जमिनीत किती मुरूम उपलब्ध होऊ शकेल याचा अंदाज येतो. या मुरमाचा वापर गोदामाचा पाया तयार करताना होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून मुरूम आणावा लागणार नाही. खर्चात बचत होऊ शकेल.
नमुना खड्डा तयार करताना त्यात जमिनीतून पाणी उपळून येऊ शकते, त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता असेल तर ते पाणी काढून घेण्याची व्यवस्था करावी.
नमुना खड्ड्यानुसार गोदाम निर्मितीच्या जागेवर किती खडक व मुरूम उपलब्ध होऊ शकेल, याचे अंदाजपत्रक तयार करणे सोपे होते. अंदाजपत्रकातील लीड स्टेटमेंट आणि क्वेरी चार्टमध्ये जागेवरील व जागेच्या आसपास किती किलोमीटर परिसरात विटा, दगड, वाळू , खडी उपलब्ध होऊ शकेल या साहित्याचा तपशील नमूद करावा.
अंदाजपत्रकात साहित्याची तरतूद आणि गोदामासाठी मापांचा तपशील
नमुना खड्ड्याच्या अंदाजपत्रकानुसार जमिनीतून कच्चा मुरूम, पक्का मुरूम, मऊ खडक, पक्का खडक या मातीच्या प्रकारानुसार जमीन खणण्याची प्रक्रिया व तरतूद नमूद करावी.
जमीन १.५ मीटरपर्यंत खणल्यानंतर त्यातील खडक व माती बाहेर काढण्याची तरतूद करण्यात यावी.
जमीन खणल्यानंतर त्यातील आवश्यक खडक व माती व्यवस्थित स्वतंत्रपणे रचून ठेवणे आणि अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावण्याची तरतूद अंदाजपत्रकात नमूद करावी.
गोदामाचा पाया खणताना केलेले खड्डे पुन्हा भरणे, गरजेनुसार इतर ठिकाणांवरून मुरूम आणून गोदामांच्या पायात भरणे यासाठी खर्चाची तरतूद करण्यात यावी. याकरिता महसूल विभागाची परवानगी व चलन भरण्यात यावे.
गोदामाच्या पाया खणण्यापासून पुढे त्यात मुरूम भरणे, पाणी टाकून पाया सपाट करणे आणि ते संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत वाळवीरोधक प्रक्रियेची तरतूद करण्यात यावी.
पीसीसी व आरसीसी कामकाज, बांधकामाकरिता खांबाची उभारणी, पायाचे कामकाज, पायातील खांब इत्यादीची आर्थिक तरतूद करावी.
आरसीसीचे कॉलम, छत, छज्जा, पाया, फ्लोरिंग इत्यादीची एकूण संख्या व खर्च याची अंदाजपत्रकामध्ये तरतूद करावी.
भिंती विटांचे काम, गवंडीकाम, मोठ्या भिंती, छोट्या भिंती, पाणी वाहण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म इत्यादीची संख्या नमूद करणे आवश्यक आहे.
१५ मिलिमीटर जाडीचे सिमेंट प्लॅस्टर, २३ मिलिमीटर जाडीचे वाळूचे प्लॅस्टर याची संख्या व खर्च नमूद करावा.
१५ मिलिमीटर जाडीच्या सिमेंटच्या स्लरीने पायाच्या खालील भागांची घोटाई, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाची घोटाई इत्यादी खर्चाची तरतूद करणे.
छतावरील व्हेंटिलेटर्सची संख्या व आर्थिक तरतूद नमूद करण्यात यावी.
रोलिंग शटर्सची संख्या व त्याची आर्थिक तरतूद करण्यात यावी.
गोदामातील विविध भागांत लोखंडाचे गज, सळ्या यांची आवश्यकता असते. विविध भागांत लोखंड वापराची प्रति क्युबिक मीटरनुसार किलोमध्ये गरज व त्याचे प्रमाण अभियांत्रिकी विभागामार्फत खालील प्रमाणे तयार करण्यात आलेली असते.
पायातील लोखंडी सळ्यांचे प्रमाण ः ६५ ते ७० किलो / क्युबिक मीटर
कॉलम / खांब ः १००किलो / क्युबिक मीटर
बीम : १०० किलो / क्युबिक मीटर
छज्जा : ६० ते ८० किलो / क्युबिक मीटर
पायानंतरचे फ्लोरिंग : ८० किलो / क्युबिक मीटर
आराखड्यानुसार स्ट्रक्टरल स्टीलची गरज व एकूण स्टीलची आवश्यकता काढावी, अन्यथा खालीलप्रमाणे थंब रूल / नियमाचे पालन करावे.
अ) टॅबुलर स्ट्रस (गोल छताचे लोखंड) : १५ किलो / चौ.मीटर
ब) कोणीय ट्रस (त्रिकोणी छताचे लोखंड) : २५ किलो / चौ. मीटर
प्रीइंजिनियरिंग बिल्डिंगनुसार गोदामाचे बांधकाम करताना कॉलम, बीम, जीआय शीट व इतर सर्व आवश्यक लोखंडी साहित्य : ५५ ते ६० किलो / क्युबिक मीटर.
आतील भागातील भिंतीला पांढऱ्या चुन्याचे हात देण्यात यावेत.
गोदामाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या भिंतींना तीन हात रंगीत रंगाने लावण्यात यावा किंवा पाणी विरोधक सिमेंट पेंटचे तीन हात लावावेत.
रोलिंग शटर्स, व्हेंटिलेटर्स इत्यादी गंजरोधक ऑइलपेंटची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करावी.
रोलिंग शटर्सला आवश्यक लोखंडाची ५० × ५० × ६ मिलिमीटरची तरतूद करावी.
गोदामाच्या छतासाठी ०.५० मिलिमीटर जाडीचे झिंक व रंगाचे आवरण असणारे पत्रे वापरावेत.
टर्बो व्हेंटिलेटर ३०० / ६०० मिलिमीटर व्यासाचे असावेत.
वीजरोधक व अर्थिंगची तरतूद करण्यात यावी.
गोदामाच्या भिंतीवर मार्बलची फरशी बसविण्यात यावी. व बांधकामाचे वर्ष नमूद असलेली गोदामांची संख्या नोंदवावी.
गोदामाच्या बाहेर लोखंडी बोर्ड लावून त्यावर प्रकल्पाचे नाव, गोदामांची संख्या, गोदामांची क्षमता, बांधकामाचा तपशील, बांधकामाचा खर्च इत्यादी नमूद करावे.
समरीशीट किंवा रिकॅप शीटमध्ये एकूण रक्कम रॉयल्टी चार्जेस १८ टक्के जीएसटी टेस्टिंग चार्जेस घटक अंदाजपत्रकामध्ये नमूद करावे. रीकॅपलेशन शीटमध्ये गोदामाच्या एकूण खर्चाची रक्कम नमूद करण्यात येते. अंतिम रकमेवर १८ टक्के जीएसटी रक्कम नमूद करावी. तसेच त्यात १ टक्का लेबर इन्शुरन्स एकूण रकमेवर नमूद करावा. याप्रमाणे तांत्रिक मान्यतेकरिता अंदाजपत्रक तयार करण्यात यावे.
गोदाम तयार करताना कामाच्या कालावधीनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी. सर्वसाधारणपणे टेंडर प्रक्रिया बांधकाम विभागाचे निकष, कामकाजाचा कालावधी, याचा आर्थिक तरतुदीकरिता आधार घ्यावा व खालीलप्रमाणे खर्चाचे टप्पे ठरवावेत.
पहिला टप्पा : २५ टक्के बांधकाम झाल्यावर एकूण प्रकल्प रकमेच्या २५ टक्के निधी
दुसरा टप्पा : ५० टक्के बांधकाम झाल्यावर एकूण प्रकल्प रकमेच्या ५० टक्के निधी
तिसरा टप्पा : १५ टक्के बांधकाम झाल्यावर एकूण प्रकल्प रकमेच्या १५ टक्के निधी
अंतिम टप्पा : १०० टक्के बांधकाम झाल्यावर एकूण प्रकल्प रकमेच्या १०० टक्के निधी अशा प्रकारे निधीचे वितरण करावे व त्यानुसार गोदामधारकाने आर्थिक तरतूद करावी.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्तअभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती.)
कृषी पायाभूत निधी योजना
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत गोदाम उभारणीच्या दृष्टीने, गोदामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक बनविणे, त्यास तांत्रिक मान्यता घेणे व त्यानुसार व्यवसाय आराखडा बनवून कृषी विपणन योजनेतून २५ टक्के अनुदान व कृषी पायाभूत निधी योजनेतून ३ टक्के व्याजात सूट तसेच राज्यातील विविध बँकांकडून वित्तसाह्य मिळवून देणे इत्यादी सहकार्य करण्यात येते.
राज्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांना बाजारातील शुल्कापेक्षा कमी शुल्कात गोदाम निर्मितीच्या कामकाजासाठी सहकार्य करण्यात येत असून, गोदाम उभारणीनंतर बाजारजोडणी अथवा मार्केट लिंकेजसाठी सहकार्य करण्यात येते.
त्याप्रमाणे राज्यातील पात्र प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना स्मार्ट प्रकल्पातून ६० टक्के अनुदान व १ टक्का व्याजाने कर्ज याप्रमाणे सहकार्य करण्यात येत असून, गोदाम पावती योजना सुरू करून त्यातून संस्थेला उत्पन्न मिळवून देण्याच्या अनुषंगाने सेवा पुरवठादार संस्थेचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ज्या प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्मार्ट प्रकल्पात पात्र नाहीत, त्यांना केंद्रशासन व नाबार्डची कृषी विपणन सुविधा योजनेतून ३३.३३ टक्के अनुदान आणि १ टक्का व्याजाने कर्जपुरवठा याकरिता सहकार्य करण्यात येते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून २५० टन क्षमतेच्या गोदाम उभारणीकरिता ५० टक्के अनुदानासाठी सहकार्य करण्यात येते.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.