
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Supply Chain Innovations : देशभरात केंद्रशासन आणि राज्य शासनामार्फत प्रोत्साहन देऊन विविध योजनांची अंमलबजावणी आणि व्यवसायास पूरक वातावरण निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर धान्य साठवणूक आणि गोदाम उभारणीकडे शेतीमालाशी निगडित सर्व घटक वाटचाल करीत आहेत. यात प्रामुख्याने शासनाच्या विविध संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गोदाम उभारणी करीत आहेत.
वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) ही केंद्र शासनाची गोदाम विषयक कामकाज करणारी यंत्रणा असून, त्यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या २००७ च्या कायद्यात सुधारणा व बदल करण्यासाठी ७ जानेवारी २०२५ पर्यन्त सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या आधारे देशभरात जास्तीत जास्त गोदामे प्रमाणित करण्यात आलेली सद्यःस्थितीतील प्रक्रिया आणखी सोपी, बाजाराभिमुख व शेतकरी वर्गास पूरक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि पणन या क्षेत्रास चालना मिळाली आहे. केंद्र शासनाने सहकार क्षेत्राबाबत जाहीर केलेल्या निर्णयानुसार सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नवीन संस्थांची निर्मिती करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने १०,००० बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली असून दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
यापुढील नियोजनाच्या अनुषंगाने पुढील ५ वर्षांत देशभरात सुमारे २ लाख प्राथमिक कृषी सहकारी संस्थांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात नाबार्डमार्फत देशभरात सुमारे २२,७५० प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४७,२५० सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट (NDDB) बोर्डामार्फत ५६,५०० नवीन सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात येणार आहे.
यापूर्वीच्या अस्तित्व असणाऱ्या ४६,५०० सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय फिशरीज डेव्हलपमेंट (NFDB) बोर्डामार्फत ६,००० नवीन सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात येणार आहे. ५५०० जुन्या सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासोबत सर्व राज्यातील सहकार विभागांमार्फत २५,००० नवीन प्राथमिक कृषी सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात येणार आहे.
शेतीमालाच्या पुरवठा साखळ्यांची निर्मिती
१) सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर राज्यभरात ११,६९५ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (PACs) नवीन घटनेनुसार नव्याने नोंदणी करण्यात आल्या असून हा एक महत्त्वाचा टप्पा देशभरात सहकार खात्यामार्फत पूर्ण करण्यात आला आहे. एकदा २ लाख प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची नोंदणी पूर्ण झाली की, शेतकऱ्यांचा शेतीमाल जागतिक बाजारपेठेत विनाअडथळा जाण्याच्या दृष्टीने शेतीमालाची बळकट पुरवठा साखळी निर्माण होणार आहे. ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये नवीन प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आघाडीवर आहेत. तसेच शेतीमालाच्या विविध पिकांच्या पुरवठा साखळ्यांची निर्मिती करण्यात पुढे झाली आहे.
२) शेतीमालाच्या पुरवठा साखळ्यांची निर्मिती करण्यावर शासनाचा भर आहे. या पुरवठा साखळ्यांमध्ये करार शेती, प्रॉडक्टीव्ह पार्टनरशिप, गोदाम हीच बाजारपेठ, खाजगी बाजार, थेट पणन व एकल पणन परवाना इत्यादीशी निगडित पुरवठा साखळ्या, गोदाम आधारित विविध शेतीमाल तारण पुरवठा साखळ्या जसे की शेतमाल तारण योजना, प्राथमिक प्रक्रिया उद्योग, दुय्यम प्रक्रिया उद्योग, ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित गोदाम उद्योग, गोदाम आधारित कृषिमॉल अथवा अग्रिमॉल, कृषी निविष्ठा विक्री व्यवसाय, गोदाम व्यवसायाशी निगडीत कामकाज करणाऱ्या सहकारी संस्था, सहकारी बँक, पतसंस्था यांच्याबरोबर भागीदारीत व्यवसाय करणे इत्यादींचा समावेश होतो.
३) केंद्र शासनाने सुचविलेल्या महत्त्वाच्या व्यवसायांपैकी गोदाम आधारित व्यवसाय उभारणीच्या अनुषंगाने जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना राबविण्याच्या दृष्टीने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्यात सहकार विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकरिता १०० दिवसांत १०० गोदामांची उभारणी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत गोदामाचा प्लॅन व एस्टिमेट बनविणे, व्यवसाय आराखडा बनविणे व गोदाम व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे इत्यादी कामकाज जीएसटी व्यतिरिक्त नाममात्र शुल्क घेऊन करण्यात येणार आहे.
४) देशभरात शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांनी गोदाम निर्मिती केल्यानंतर त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून गोदामात साठवणूक केलेला मूल्यवान शेतमाल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात.
धान्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना :
प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणूक करणे अपेक्षित आहे. साठवणूक केलेल्या धान्याचे उंदीर, घुशी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे धान्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
माकडांपासून होणारा उपद्रव :
गोदाम उभारणी केलेल्या भागात जर माकडांचा वावर असेल तर अशा ठिकाणी पावसाचे पाणी छतावरून खाली गटारामध्ये सोडण्यासाठी ठेवलेल्या पाइपवरून माकडे छतावर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या पाण्यासाठी असणारे पाइप पावसाळ्यापूर्वी जोडावेत आणि इतर हंगामात ते काढून ठेवता येतील अशी व्यवस्था करावी. जेणेकरून वर्षांतील ८ महिने तरी माकडांचा उपद्रव गोदामास होणार नाही. यामुळे छतावरील पावसाचे पाणी संकलन करण्यासाठी लावलेले गटाराचे पाइप व गोदाम हवेशीर राहण्यासाठी लावलेले व्हेंटिलेटर्स यांचे नुकसान होणार नाही.
गाय, शेळ्या आणि कुत्र्यांपासून होणारा उपद्रव :
गोदामाच्या प्लॅटफॉर्म अथवा तात्पुरत्या ठेवलेल्या लोखंडी जिन्यावरून गाय, शेळ्या किंवा कुत्रे गोदामात प्रवेश करू शकतात. आत प्रवेश करून अन्नधान्याची पोत्यांचे नुकसान करू शकतात. कुत्रे शक्यतो गोदामात आराम करण्यासाठी प्रवेश करू शकतात. हे उपद्रव टाळण्यासाठी रोलिंग शटर्सला १.२ मीटरचे जाळीचे ग्रील बसविल्याने हा त्रास बंद होऊ शकतो.
वराहांपासून होणारा उपद्रव :
निवाऱ्याची जागा म्हणून वराह गोदामाच्या कुंपणाच्या भिंतीच्या आतील भागात प्रवेश करू शकतात. त्यांचा गोदामातील प्रवेश टाळण्यासाठी गोदामाच्या चारही बाजूंस ९० सेंटिमीटर उंचीचा पाया तयार करून त्यावर १.५० मीटर उंचीचे ५ आडव्या तारांचे कुंपण मारावे किंवा १.५० मीटर उंचीची विटांची भिंत उभारावी. त्याच पद्धतीने मुख्य प्रवेशद्वार सुद्धा बांधावे. गोदाम रोजच्या रोज स्वच्छ ठेवावे. कुठेही धान्य सांडलेले नसेल याची काळजी घ्यावी.
पक्ष्यांपासून होणारा उपद्रव :
गोदामाच्या आतील भागात छताच्या जवळ सोडलेल्या लोखंडी पाईपच्या जवळ असणाऱ्या बिळाच्या आधारे प्रामुख्याने पोपट, कबुतरे, पारवे, चिमण्या इत्यादी पक्षी घरटे बनवितात. त्यामुळे भिंत व पाईइपच्या जवळच्या छिद्राचे नुकसान होऊन त्यामधून पावसाचे पाणी आत येऊ शकते. त्यापासून संरक्षण करण्यासाठी अशी छिद्रे काँक्रीट मिक्सच्या द्रावणाने भरून घ्यावीत. गोदामात हवा खेळती राहण्यासाठी बसविलेल्या खिडक्यांना जाळ्या लावाव्यात. रोलिंग शटर्सना ग्रील बसवावेत. त्यावर बारीक जाळ्या बसवाव्यात जेणेकरून चिमणीसारखे छोटे पक्षी गोदामात प्रवेश करू शकणार नाहीत.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती.)
संपर्क : प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.