
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Infrastructure Planning : महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पणन संचालनालय, सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, अशा सहकार व पणन विभागातील सर्वच स्तरावरील अधिकारी व कर्मचारी वर्गाची क्षमता बांधणी करण्यात येत आहे. सहकार व पणन क्षेत्राची शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका, त्यातील आवश्यक बदल व पुढील उपाययोजना याकरिता जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
पुढील चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्राच्या पणन विषयाशी निगडीत सर्वच यंत्रणांना प्रशिक्षित करून प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन येत्या काळात त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी, त्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा याबाबत सर्व स्तरावरील मनुष्यबळाची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व विभागाच्या विविध योजना क्षेत्रीय स्तरापर्यंत पोहोचणे शक्य होईल. यामध्ये प्रामुख्याने गोदाम निर्मिती आणि स्वच्छता व प्रतवारी केंद्र उभारणी यासारख्या उत्पन्न निर्मितीच्या विविध योजनाबाबत माहिती देण्यात येते.
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गोदाम पावतीचे रूपांतर
कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावरसुद्धा गोदाम पावती योजना व वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी याबाबत माहितीचा अभाव आहे. राज्यातील ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात व उपबाजारामध्ये वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी व गोदाम पावती योजना संपूर्ण क्षमतेने राबविली तर बाजार समितीचे व पर्यायाने शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल. नुकतेच केंद्र सरकारमार्फत गोदाम पावती योजना बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने गोदाम पावतीस १००० कोटी रुपयांची कर्जहमीची तरतूद व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गोदाम पावतीचे रूपांतर ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
देशात सुमारे २१ लाख कोटींचे कर्ज वितरण प्रत्येक वर्षात करण्यात येते. त्यात सुमारे ४०,००० कोटी रुपयांचे कर्ज गोदाम पावतीसाठी देण्यात येते. त्यापैकी फक्त ४००० कोटी रुपयांचे कर्ज इलेक्ट्रॉनिक गोदाम पावती स्वरूपात वितरण करण्यात येते. येत्या १० वर्षांच्या कालावधीत गोदाम पावती करिता सुमारे ५.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण होण्याची शक्यता असल्याने त्यानुसार शासनामार्फत तरतूद करण्यात येणार आहे.
देशात गोदाम निर्मितीच्या बाबतीत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक साखळी योजना राबविण्यासाठी सहकार विभाग, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, नाबार्ड, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, केंद्रीय कृषी विपणन विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या सर्व विभागांनी कंबर कसली असून येत्या काळात राज्यात प्राथमिक कृषी सहकारी संस्थांची मोठमोठी गोदामे उभारली जाणार आहेत.
या गोदामांसाठी गोदाम पावती योजना व इलेक्ट्रॉनिक गोदाम पावती योजना राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी करणे आवश्यक आहे. वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणीत गोदामात विजेची यंत्रणा, वाहनतळ, गोदामाच्या सभोवती पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा (गटार व्यवस्था), पाण्याची तरतूद इत्यादी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा सुविधा
हमाल वर्गासाठी रोजच्या वापरासाठी व स्वच्छता करण्यासाठी पाणी.
साठवणूक करण्यात आलेल्या धान्यावर वेळापत्रकानुसार औषधांची फवारणी.
आगरोधक सुविधेसाठी पाण्याची आवश्यकता.
गोदाम परिसरात वृक्ष लागवड व सजावट (लॉन, फुले इत्यादी झाडे लागवड) इत्यादीसाठी पाणी.
रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी.
पाण्याचे स्रोत व उपलब्धता
विविध कारणांसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे गोदाम निर्मिती करिता जागेची निवड करताना पाण्याच्या स्रोताच्या पुढील काही शक्यता तपासाव्यात.
बोअरवेल, विहीर
नगरपालिकेमार्फत उपलब्ध पाण्याची सुविधा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत होणारा पाणीपुरवठा
टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा
पाण्याच्या गरजेचे गणित
गोदाम उभारणीपासून व्यवसाय सुरू करेपर्यंत विविध परिस्थितीत पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी विविध गरजांचा अभ्यास करून त्यानुसार किती पाण्याचा वापर होऊ शकतो आणि किती पाण्याची आवश्यकता असू शकते याचे गणित मांडणे आवश्यक आहे. अंदाजानुसार गोदाम व्यवसायात पाण्याच्या गरजेचे गणित मांडून पाण्याची आवश्यकता तपासून त्याप्रमाणे पाण्याचा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
अधिकारी वर्ग व हमाल यांच्यासाठी पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी=४५लिटर प्रति दिवस प्रति व्यक्ति
कीटकनाशके फवारणीकरिता = ५ लिटर प्रति दिवस प्रति टन क्षमतेनुसार पाणी
१८०० टन क्षमतेच्या गोदामासाठी प्रति महिना १०,००० लिटर पाणी
झाडांसाठी ५ लिटर प्रति दिवस प्रति झाड पाणी.
कँटीन व इमारतीस आवश्यक पाणी=१५ लिटर प्रति दिवस प्रति व्यक्ति
आगरोधक यंत्रणेकरिता आवश्यक पाणी= १८०० टन क्षमतेच्या गोदामासाठी ५००० लिटर
भविष्यातील इतर कामकाजासाठी तरतूद ३०००० लिटर
जमिनीखालील पाण्याची मोठी टाकी + आगरोधक यंत्रणेसाठी असणारी पाण्याची मोठी टाकी, (असे गृहीत धरा की २ गोदामे + मध्यम आकाराच्या कार्यालयाची इमारत+ २५ हमाल + २५ ट्रक प्रति दिवस + झाडे)=९०००० लिटर (पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी आवश्यक पाणी आणि कीटकनाशके फवारणीसाठी पाणी) + १०००० लिटर (आगरोधक यंत्रणा) = एकूण १ लाख लिटर्स पाण्याची आवश्यकता.
असे गृहीत धरा की ५० मिलिमीटर क्षमतेचे पिण्याच्या पाण्याची जोडणी आणि २५ मिलिमीटर क्षमतेचे आगरोधक यंत्रणेसाठी पाण्याची जोडणी आणि रोजच्या वापरासाठी ३ तास पाणीपुरवठा अशी व्यवस्था निर्माण केली असेल तर पिण्याच्या पाण्याची प्रतिदिन उपलब्धता = २१,१९५ लिटर आणि आगरोधक यंत्रणेसाठी पाण्याची प्रतिदिन उपलब्धता = ५३०० लिटर असू शकेल.
प्रत्येक गोदामाच्या बाजूला असलेली आगरोधक यंत्रणेची पाण्याची टाकी सर्वात पहिल्यांदा भरून घ्यावी. त्यानंतर आगरोधक यंत्रणेची मुख्य पाण्याची टाकी भरण्यात यावी. आगरोधक यंत्रणेसाठी वापरण्यात येणारा पाण्याचा साठा इतर कोणत्याही कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
वादळी परिस्थितीत पाणी वाहक व्यवस्थेची सुविधा व उपाय
वादळी पाऊस झाल्यास गोदामाच्या छतावर, कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर, भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने ठेवलेल्या मोकळ्या जागेवर, वाहनतळावर आणि अंतर्गत रस्त्यांवर पावसाचे पाणी पडते. हे सर्व पावसाचे पाणी गोदामाच्या पाणी वाहक व्यवस्थेमध्ये म्हणजेच गोदामाच्या बाजूला बनविण्यात आलेल्या गटाराद्वारे संकलित करण्यात येऊन पुढे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटाराची योग्य रचना करणे आवश्यक असते.
गटार व्यवस्थेची रचना
गोदामाभोवतीचे गटार मुख्यत्वेकरून गोदाम परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी असते. त्यातून इतर कोणत्याही प्रकारचे घाण पाणी अथवा टाकाऊ पदार्थांचे वहन करणे अपेक्षित नसते.
गटाराचे नियोजन गोदाम निर्मिती करण्यापूर्वी आवश्यक असते. जमीन सपाट असेल किंवा उंचसखल असेल तर त्यानुसार गटाराची रचना करावी. गटारातून वाहणारे पाणी शेवटी उतारावर कुठे जमा होईल, याचे नियोजन असावे. रेनवॉटर हार्वेस्टिंगची जागा शक्यतो गटारातून वाहणारे पाणी शेवटी उतारावर ज्या ठिकाणी जमा होईल अशा ठिकाणी निवडावी.
रेन वॉटर हार्वेस्टिंग
रेन वॉटर हार्वेस्टिंग हे छत व रस्ता यावर पावसाचे पडणारे पाणी जमा करणे, जमिनीत मुरविणे आणि साठविणे याचे एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे पावसामुळे जमा होणारे पाणी जमिनीत मुरवून किंवा कूपनलिकेमार्फत जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी किंवा पाण्याच्या टाकीत साठविण्यासाठी करण्यात येते.
गोदाम परिसरात ज्या ठिकाणी बोअरवेलचे नियोजन आहे अशा उताराच्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमा होणारे पाणी संकलित करण्यात येते. रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविताना व पाणी कूपनलिकेमध्ये सोडताना मेटल फिल्टर्स बसविण्यात यावेत. यामुळे वादळी पावसात जमा होणाऱ्या पाण्यातील कचरा, माती, प्लॅस्टिक इत्यादीमुळे कूपनलिका बंद होत नाही. प्रत्येक वर्षाला रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या यंत्रणेची काळजी घ्यावी. वेळोवेळी त्याची दुरुस्ती करावी.
आगरोधक यंत्रणा, कीटकनाशके फवारणी, झाडाझुडपांना पाणी देणे, रस्त्यावरील धुळीसाठी पाण्याचा
फवारा मारणे, वाहने धुणे व महानगरपालिकेद्वारे पाणी पुरवठा कमी झाला तर अशा वेळेस पाण्याचा उपयोग करणे अशा विविध कारणांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे कूपनलिकेमध्ये जमा होणाऱ्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.
प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.