Pune News : भामा आसखेड धरणाचे पाणी पेडगावच्या बंधाऱ्यात घुटमळल्याने दौंड तालुक्यातील पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
येथील शेतकरी तसेच नागरिक धरणातील आवर्तनाची चातक पक्ष्यासारखी वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. परिणामी पिके करपली आहेत.
सध्या उजनी पट्ट्यातील ही गावे पाण्याच्या नियोजनाअभावी तहानलेलीच राहिली आहेत. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला'' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या उजनी धरणाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांनाही आपले हक्काचे पाणी मिळत नसल्याने हे धरणग्रस्त शेतकरी शासनाच्या व लोकप्रतीनिधींच्या कार्यप्रणाली व ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.
भीमा पट्ट्यातील पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र असलेली ही गावे भीमा नदीचे पाणी व उजनी धरणाच्या फुगवट्यावर अवलंबून आहेत. पाऊस योग्य प्रमाणात झाला तर उजनी धरण शंभर टक्क्यांहून अधिक भरले जाते. त्यामुळे बारमाही उजनी पट्ट्यातील शेती ओलिताखाली राहते. ऊस हे प्रमुख पीक घेऊन तीनही तालुक्यातील ऊस कारखाने आपल्या गळीत हंगामाचा विक्रम करतात.
मात्र,पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेली दोन दशकांपूर्वी उजनीच्या फुगवठ्यावरून पाणी उचलण्याचे व उपसा करण्याचे प्रमाणही तुरळक होते. मात्र, सध्या भीमा नदीच्या पाण्यावर अनेक दुष्काळी गावांची तहान भागवली जात आहे. साहजिकच दुष्काळी गावांनाही बागायतीचे स्वरूप प्राप्त होण्यास मदत झाली.
दौंड तालुक्यातील अनेक गावांची तहान भीमा नदीच्या पाण्यावर भागवली जाऊ लागली. मात्र दरवर्षी मुबलक असणाऱ्या पाण्याची भीमा नदी महिन्यापूर्वीच कोरडीठाक पडली आहे. धरणाच्या पाण्याचे नियोजनाअभावी असे हाल होत असतील तर हजारो हेक्टर ओलिताखाली असलेल्या उभ्या पिकांच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.