Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात ८ हजार ३८२ केंद्रांवर होणार मतदान

Election Update : जिल्ह्यातील एकूण ८ हजार २१३ मतदान केंद्र आणि १६९ सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionAgrowon

Pune News : भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

जिल्ह्यातील एकूण ८ हजार २१३ मतदान केंद्र आणि १६९ सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पारदर्शक लोकसभा निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी स्थिर पथक, भरारी पथक व व्हिडिओ चित्रीकरण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजील’ ॲप तयार केले आहे.

Lok Sabha Election
Loksabha Election : लोकसभेला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानासाठी प्रयत्न

या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता विषयक तक्रारींचा जलदगतीने निपटारा होणार आहे. आचार संहिता जाहीर झाल्यापासून ४८ तासांच्या आत सर्व राजकीय प्रचार साहित्य, पोस्टर, बॅनर्स काढण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांना निर्देश दिले आहेत.

निवडणुका निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जमा करणे आदी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ८२ लाख २४ हजार ४२३ मतदार आहेत. दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

Lok Sabha Election
Loksabha Election : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १७ निर्णय

निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था

जिल्ह्यात २० संवेदनशील मतदान केंद्रे असून याठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. ३ हजार ९४१ मतदान केंद्रांवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वेबकास्टिंग करण्यात येणार असून नियंत्रण कक्षाद्वारे येथील मतदान प्रक्रियेचे अवलोकन करण्यात येईल.

केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाचे कर्मचारी आवश्यकतेनुसार तैनात करण्यात येतील. भोर तालुक्यात ३२, खेड-आळंदी ५ आणि आंबेगाव तालुक्यात २ असे एकूण ३९ ठिकाणी इंटरनेट व अन्य सुविधा नसलेली मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बारामती मतदारसंघात ७ मे, इतर तीन मतदारसंघांत १३ मे ला मतदान

बारामती (३५) लोकसभा मतदार संघात १२ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटची दिवस १९ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी २० एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची तारीख २२ एप्रिल, मतदानाची तारीख ७ मे रोजी, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.

मावळ (३३), पुणे (३४) व शिरूर (३६) लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटची तारीख २५ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी २६ एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची तारीख २९ एप्रिल, मतदानाची तारीख १३ मे रोजी, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com