Village Story : वळवाचा पाऊस...

Story on Rain : वर्षा ऋतूशिवाय अवेळी बरसून जाणारा वळवाचा पाऊस मात्र वेगळाच असतो. पट्टीच्या मल्लांना मैदान मारताना आपण नेहमी पाहतो पण कधी एखादा नवखा, लेचापेचा गडीही बाजी मारतो आणि मनःपटलावर त्याच्या स्मृती राहतात. तसंच काहीसं वळवाच्या पावसाचं असतं. त्याचं येणं अनेकदा सुखावून जातं.
Village Story
Village StoryAgrowon

समीर गायकवाड

Rural Story : भर दुपारी दूरवर उडणाऱ्या टिटव्यांचा टिटिविटीवटीवचा आवाज, चिंच-लिंबांच्या झाडांतनं मधूनच ऐकू येणारं होल्यांचं गुंजन अन् जोडीला सुतार पक्ष्याची टॉकटॉक सोडल्यास रानात दूरवर कुणीच बोलत नसतं. म्लान निळं आकाश बगळ्यासारखं मान वाकवून मातीकडे सुकल्या ओठांनी बघत राहतं. वितळत्या उन्हात आभाळाकडं तोंडं करून झाडं मुक्यानं उभी असतात.

त्यांची थरथरणारी सावली मागेपुढे होत कवडशांचे डाव मातीत उतरवते. त्राण नसलेला वारा आस्तेकदम पानांच्या देठांना कुरवाळत फिरतो, पिकल्या पानांचे अश्रू सोबत घेऊन पुढे जात राहतो. नुकतेच फुटलेले कोंब उष्म्यानं कावरेबावरे होतात. अवतीभवती थिरकणाऱ्या फुलांच्या रंगीबेरंगी कोमल पाकळ्यांची शुद्ध एव्हाना हरपते.

डोक्याचं ओझं झाल्यागत फुलांचे गुच्छ मातीच्या दिशेने लोंबकळतात. भिरभिरणारी फुलपाखरं हरेक फुलांची समजूत घालत त्यांना सबुरीचा सांगावा देत जलदगतीने फिरत राहतात. झाडांच्या सुन्या ढोलीत कोळ्याचे बिऱ्हाड स्वतःच्याच जाळ्यात अडकून पडलेले असते. पिंपळाच्या फांद्यांच्या गुंत्यात तरंगत असणाऱ्या घरट्यांच्या काटक्या एकेक करून हळूहळू निखळतात. चिंचेची पानं गिरक्या घेत मातीवर नक्षी काढत पडतात.

बांधावरच्या दगडातल्या कपारीतले सरडे भर उन्हात भक्ष्याची वाट बघत निपचित बसतात, वाळलेल्या गवतातले सोनकिडे माती उकरत जमेल तितके खाली जातात. वडाच्या बुंध्यावरचे मुंगळे मात्र जगबुडी झाली तरी आम्ही जगणारच याच तोऱ्यात विशिष्ट रांगांत स्वतःला कामाला जुंपतात, समोरून येणाऱ्या प्रत्येकाला ख्याली खुशाली विचारत ते आपल्याच नादात एका तालबद्ध लयीत पुढे जातात.

बांधावरच्या बोरी-बाभळी ओशाळवाण्या होऊन एकमेकींच्या फांद्यांना लटका धीर देत खेटून उभ्या असतात. पाटाच्या कडेनं तगलेल्या थोड्याशा ओलाव्यासाठी रातकिड्यांचा आटापिटा जारी असतो, रात्रीच्या गायनासाठी त्यांचा रियाज दिवसाच सुरू असतो! जवळच असणाऱ्या ताशीव दगडी विहिरीचा तळ वर येऊन गाळाची आतडीकातडी दिसू लागतात. विहिरीच्या माथ्यावर दबा धरून बसलेले जिद्दी बगळे त्यातल्या पानकिड्यांचा शोध हळूच सूर मारतात.

Village Story
Village Story : सुगंध मातीचा

विहिरीत घुमणाऱ्या पारव्यांचा आवाज ऐकून दंडाजवळच्या हिरव्या-सावळ्या झाडाखाली बांधलेले सुस्तावलेले बैल उगाच कान टवकारतात. आपलं रेशमी शुभ्र अंग थरथरवत उदास झालेल्या वशिंडाला झुलवत राहतात. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवाज वाऱ्यासोबत वाहत गायींच्या गोठ्यात दाखल होतो, तो घंटानाद ऐकताच दावणीपाशी डोळे मिटून बसलेल्या गायी किंचित जाग्या होतात. पोटात काही घासचिपाड पेंड-आमुणं गेलं नसलं तरी सवयीप्रमाणे रवंथास सुरुवात करतात.

रवंथ करताना हलणाऱ्या जबड्यामुळं तिच्या शिंगावर बसलेली दक्ष रानपाखरं उडून जातात, मात्र तिच्या अंगावरची चिवट गोचिडं थोडीशी वरखाली होतात, उडून जात नाहीत. गायींनाही त्यांची बऱ्यापैकी सवय झालेली असते. सावलीतली सगळी गुरं बसल्या जागी मातीवर शेपटी आपटत आपली कैफियत सुनवत राहतात. माती मन लावून त्यांचे मुके बोल ऐकत राहते. खरं तर रोजच्या उन्हात करपून निघणाऱ्या मातीला स्वप्नं पडत असतं मृद्‍गंधात चिंब भिजणाऱ्या चराचराचे!

काळवंडलेली पिकं नेटानं उभी असतात. काळपट, तेलकट झालेली ताटकळून गेलेली जुंधळ्याची ताटं दिनवाण्या मुद्रेने ताठ बाण्याचं महत्त्व उनाड वाऱ्याला सांगत असतात. उलून गेलेल्या भुसभुशीत मातीत गवताचे पिवळट मळके कोंब माना टाकून पडलेले असतात. भरकटलेल्या वाऱ्यावर उडत आलेला पानगळीचा पाचोळा अंग चोरून ढेकळाच्या तळाशी दडलेला असतो.

कोंदटलेल्या दिशांनी येणारा वारा भकास माळावर येताच त्याला गरमीने धाप लागलेली असते. मोठाल्या खडकापाशी तो अडखळतो. वाऱ्याला शिवारसमृद्धीचा पत्ता देताना चकवा झाल्यागत एखादी वावटळ स्वतःलाच उडवून देते. वावटळीत उडालेल्या धुरळ्यात मातीचीही स्वप्नं कैद असतात. वावटळ उंच गेली की मातीच्या स्वप्नाचं दुःख आभाळाला कळतं अन् त्याच्या मनात आर्त घालमेल सुरू होते.

दूरवर पांगलेले ढग एकत्र येऊन बंड करतात, सौदामिनी संगं आली तर तिच्यासवे नाहीतर तिला सोडून ते मेघदुंदुभी वाजवू लागतात. नभातले सगळे मायेचे पूत गोळा होतात. डबडबलेल्या डोळ्यांचे काळेसावळे मेघ गोळा होताच त्यांच्या विरहाश्रूंच्या धारा नभातून पाझरू लागतात. तहानलेल्या वसुंधरेवर वेड्यावाकड्या कोसळू लागतात. बेभान होऊन मेघातून येणारा प्रत्येक थेंब मातीच्या कणाला गोंजारत तिच्या कुशीत शिरतो अन् आपल्या कुशीतला प्रत्येक थेंब माती तृप्ततेने विरघळवत राहते.

Village Story
Village Story : हरवलेली सांज

चंद्रमौळी घरातला बळीराजा धावतच बाहेर येतो. सुरकुतल्या चेहऱ्याने आभाळाकडं बघत घामेजले हात जोडतो अन् वळवाच्या पहिल्या पावसाच्या सरी ओंजळीत साठवतो. वळवाचे ते थेंब जीवदान देऊन जातात मातीला, मातीतल्या कोंबांना, कोंबातल्या उर्मिला, घरट्यातल्या पिलांना, पडवीतल्या वासरांना, पिकातल्या अखेरच्या धुगधुगीला, सुकलेल्या पानांना, कोमेजल्या फुलांना, तारवटल्या फांद्यांना अन् कोलमडलेल्या धन्याला! तसं तर केवळ वळवाच्या पावसानं पिकत काहीच नसतं, त्यानं लाखकोटीचं उत्पन्न वाढतं असंही नसतं. मात्र वळवाचा पाऊस जिद्द जिवंत ठेवतो, हरत आलेली बाजी हाती आणतो. स्वप्नं बघण्याची उमेद जिवंत ठेवणं ही त्याची देण.

उन्हाच्या झळांमुळे यंदाच्या वळवाची ओढ तीव्र होती, कालपरवा ती पुरी झाली पण पावसाने पार कणाच मोडला. तरीदेखील मातीचा प्रत्येक पूत तिच्यासाठी झिजायला आसुसलेलाच आहे. अस्सल मातीतला माणूस पावसाचा कधीच तिरस्कार करत नाही. भलेही त्यानं त्याचं नुकसान होवो, त्याचे बांध फुटून पाणी वाहो वा उभी पिके पाण्यावर वाहून जावो; तो पावसावर चिडेल, रागावेल पण त्याचा तिरस्कार नाही करणार. माती-पाण्याची ही नाळ खूपच घट्ट असते. तिची वीण भूमिपुत्राच्या काळजात घट्ट असते. ती कधीच ढिली होत नाही. माणसाच्या मनावर पावसाचं गारुड आदिम आहे. नकोसा असलेला पाऊस मनसोक्त कोसळून गेला तरी बळीराजा त्याच्या नावानं बोटं मोडत नाही कारण हाच पाऊस त्याच्या डोळ्यातही असतो. तो कधी आत्यंतिक सुखाच्या समयी तर कधी दुःखाचे कढ झेलताना वाहतो.

पावसालाही मातीचं, भूमिपुत्राचं आकर्षण असतं. कधी तो फार ताणून धरतो तेव्हा मात्र लक्षावधी जीव उस्मरून जातात, मातीची उलघाल सुरू होते. मग पावसाला राहवत नाही. तो कोसळून जातो. पावसाच्या अनेक तऱ्हा आहेत. त्याचीही नानाविध सोंगेढोंगे आहेत. तो कधी पिरपीर करीत पडतो, तर कधी मुसळधार. कधी कधी दिवसभर सततधार तर कधी चोर-पोलिसासारखा लपंडाव. पाऊस कधी वाऱ्यावर डुलत येतो तर कधी गारांचे थैमान घालून जातो.

कधी कधी ढगफुटीही होते. वर्षा ऋतुशिवाय अवेळी बरसून जाणारा वळवाचा पाऊस मात्र वेगळाच असतो. पट्टीच्या मल्लांना मैदान मारताना आपण नेहमी पाहतो पण कधी एखादा नवखा, लेचापेचा गडीही बाजी मारतो आणि मनःपटलावर त्याच्या स्मृती राहतात. तसंच काहीसं वळवाच्या पावसाचं असतं. त्याचं येणं अनेकदा सुखावून जातं. उन्हाने जिवाची काहिली होत असताना आलेला वळवाचा पाऊस वातावरणास शीतलता बहाल करतो. हवेतला उष्मा एका फटक्यात दूर करून सगळा आसमंत मोकळा श्‍वास घेऊ लागतो.

वळवाचा पाऊस पडू लागताच झाडं अंग झटकून उभी राहतात. पानांची मरगळ दूर जाते. गोठ्यातल्या गायी कान टवकारून अंग थरथरवत सावध होतात. मातीतून उष्ण वाफा बाहेर पडू लागतात. सर्वत्र मृद्‍गंध दरवळू लागतो. वळवाच्या पहिल्या पावसाची गाणी पक्षी गाऊ लागतात. या आभाळगाण्यांनी मेघ आनंदून जातात. मातीला उधाण येतं. शेतशिवाराच्या सगळ्या पाऊलवाटांना गहिवरून येतं.

खरं तर आभाळाचंही गणगोत मातीतच असतं अन् पाऊलवाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं. लेखक, कवी त्याला पावसाचं नाव देतो. पण पाऊस म्हणजे तरी काय असतो? वाडवडलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक ‘भाऊबंद’ असतो. त्यांच्या आनंदाश्रूंचाच खारट थेंब असतो.

म्हणूनच सारं चराचर व्याकुळ होऊन पावसाची चातकासारखी वाट बघत असतं. ऋतू कोणताही असो त्यातील पर्जन्योत्सुक नभातलं ओझं हळूहळू रितं होत जातं नि वसुंधरा तृप्त होते. ही तृप्ती सारस्वतांच्या लेखणीला उभारी देते, त्यात इंद्रधनुष्यी रंग भरते. आयुष्याच्या नागमोडी पाऊलवाटांचा प्रवास मग अक्षरगंधाने भारून जातो. बघता बघता साठा उत्तराची शब्दकहाणी सुफळ होते. इतकी जादू एका वळवाच्या पावसानं होते. वळवाच्या पावसातील आभाळगाण्यांची ही ताकद अनोखी आणि अभूतपूर्व असते.

: ८३८०९७३९७७ (लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com