Village Story : हरवलेली सांज

Article by Samir Gaikwad : गावाकडची ती सांज नभातून हळूवार उतरत दबक्या पावलानं, सारवलेल्या अंगणात दाखल होत असे. आईचे सायमाखले हात पाठीवरून अदृश्य व्हावेत तशी ही सांज काळाच्या ओघात हरवून गेलीय. आता फक्त कासावीस झालेला चंद्रमा अधूनमधून लिंबाच्या झाडाआड हमसून हमसून रडताना दिसतो.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Rural Story : परिवर्तनाच्या कराल चक्रात पिसून निघणाऱ्या ग्रामजीवनात गतकाळी एक सांज अवतरत होती जी आता विस्कटून गेलीय. गावाकडची ती सांज नभातून हळूवार उतरत दबक्या पावलानं, सारवलेल्या अंगणात दाखल होत असतानाच गळयातल्या घंटांचा मंजुळ नाद करत सगळं गोधन शेतशिवारामध्ये परतत असे. त्यांच्या खुरांवरची माती गोठ्यात विसावायची; तहानेनं ताठलेली वासरं गाईच्या दिशेने सुसाट पळत सुटताच गोठ्यांना उधाण येई.

दिवसभर उन्हात उभी असलेली पिकं सांजेशी गुजगोष्टी करत. पानां-पानांवरली धूळ अलगद हवेत उतरे आणि तिरप्या होत चाललेल्या बिलोरी सूर्यकिरणांशी झिम्मा खेळत ताल धरून फिरे. अल्लाद येणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेवर ज्वारीच्या ताटांनी अंग झटकून घेताच त्यांना पेंग चढे. त्यांना डोळे मिटताना पाहून करड्या तांबड्या रानातल्या कोवळ्या तुरी खिदळत.

केळीच्या तटतटलेल्या पोटऱ्या रात्रीतून येणाऱ्या विणेसाठी सांजेपासूनच तयारीला लागत. शेवरीच्या झाडावरल्या कापसाचा तरंगता संसार तांबूस झालेल्या सूर्यकिरणांना अंगावर आरपार खेळवत राही. सूं सूं आवाज करत उसाच्या फडातून वाहणारा वारा गावाच्या शिवंलगत असणाऱ्या विसाव्याच्या वाटेला जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसे.

मावळतीच्या जाणिवेने विहिरीतले पारवे कड्याकपारीत जाऊन बसत, ते स्तब्ध होताच सुग्रणीचं घरटं बांधायचं काम थांबे. बांधावरल्या बाभळीच्या घरट्यातली नुकतीच जन्मलेली होल्यांची पिलं चोच उघडून व्याकुळतेने आईची वाट बघत. नारळाच्या झावळ्या सावल्यांची नवी नक्षी मातीवर काढू लागत अन् आमराईतली घेरदार झाडे उगाच मान वाकवून उदास होऊन जात. चिंचपट्टीतले घनदाट वृक्ष पानगळीच्या डौलदार नक्षीकडे आपल्याच तालात बघू लागत. झाडा-झाडांतून पक्ष्यांची किलबिल टिपेस जाऊ लागे.

अस्ताला जाणारा सूर्य चराचरांत नव्या चेतना जन्मास घाले. पश्‍चिमेची लाली दिगंतातून थेट मातीत उतरू लागे. खुरट्या झाडाझुडपांतले रातकिडे अंग झटकून जागे होत आणि निशेच्या गीतगायनासाठी घसे साफ करू लागत. चंद्रमौळी छपरातून घरात शिरणाऱ्या तिरक्या धूसर सावल्या कोनाड्यातल्या आडोशाला अंग टेकत. आचळाला तोंड लावून आपली तहानभूक भागवणाऱ्या मखमली वासरांना गाई चाटायला लागत तेव्हा केसाची चांदी झालेल्या डोईवर फाटका पदर चापूनचोपून घेतलेल्या बायाबापड्यांच्या आसावल्या डोळ्यात तृप्ततेचे मेघ तरळून जात.

दावणीला बांधलेल्या म्हशींच्या पुढ्यात कडबा कुट्टीचा घास आणि आमुण्याच्या पाट्या येताच जबडे हलवत त्यांचे एकसुरी चर्वण सुरू होई. मग बळीराजा धारा काढायची पितळी चरवी थंडगार पाण्याने विसळू लागे. वस्तीवरच्या चुलीतला विस्तव फुरफुरू लागताच भुकेचे गंधवेडे निरोप घेऊन मंद हवा आसमंतात फिरू लागे.

Village Story
Village Story : सुगंध मातीचा

ओढ्यातल्या संथ पाण्याचे आवाज उगाच मोठे वाटत, बांधाबांधावरचे दगडधोंडे देखील वेगळ्या रंगाचे भासत. दिवसभर हवेत तरंगत असणारा गावठाणाच्या वाटेवरचा फुफाटा जमिनीवर विसावे. याच वाटेवर असलेल्या नागोबाच्या देवळाबाहेरची विशाल झाडं मनात अकारण काहूर माजवून ओशाळलेल्या सावलीला कवटाळून बसत.

विजनवासातल्या जीर्ण छोटेखानी गाभाऱ्यात किरणांचा अभिषेक घालून काही क्षण सांज रेंगाळत राही. थोडं पुढं गेलं की गावाजवळच्या पीरसाहेबाच्या दर्ग्याचे मीनार मेघात लपलेल्या सृष्टीच्या निर्मिकाशी गळाभेट घेत, कलमा पढत असल्यागत त्याचे घुमट कंबरेतून वाकून नमाज अदा करत. तिथल्या अलौकिक गंधाच्या धूप-ऊदाचा दरवळ दूरवर एक आगळी प्रसन्नता घेऊन जाई.

वाटेतले खाचखळगे पायाशी मस्ती करू लागत. माथ्यावरल्या दुरडीत माळवं घेऊन शेतशिवारातून येणारे कष्टकरी जीव वेशीपाशी येताच तळ्यातल्या पाण्याच्या थंडगार झुळका त्यांच्या पायांना मालिश करत. मग त्यांचा थकवा कुठच्या कुठे निघून जाई. घराबाहेर लावलेल्या शेणकुटाच्या गोवऱ्या एव्हाना वाळून गेलेल्या असत अन् त्यांचा एक वेगळाच वास प्रत्येक घराच्या अंगणात तरळे.

या गोवऱ्या गोळा करत अंगण लख्ख झाडून घ्यायचं काम कुठं कुठं अजूनही चालू असे. तळ्याकाठची झाडं पाण्यात विरत चालेलेलं प्रतिबिंब पाहून उगाच हिरमुसली होत. तिथल्या पानगळीची पानं मात्र आनंदाने स्वतःभोवती फेर धरून पाण्याच्या तरंगांवर स्वार होत. हिरव्या निळ्या पाण्याचं तळं आस्तेकदम शांत होऊ लागे. त्याची हिरवाई काळसर होऊ लागे. स्थिरावलेल्या पाण्यात पानकोंबड्या वेटोळे करून अंग चोरून सूर मारू लागत. आसमंतातले बगळ्यांचे थवे त्रिकोणी आकारात लयबद्ध विहरू लागत.

सांज गडद होऊ लागताच पाणंद उगाच भीतीची चादर अंगावर ओढून बसे. पाणंदेतली झाडं उगाच भकास उदास वाटू लागत. तिथल्या जुनाट वडाच्या पारंब्या भेसूर वाटत. पिंपळपानाआड बसलेली घुबडे अन् अशोकाच्या झाडात लटकलेली वटवाघळे जागी होऊ लागत. हळूहळू तिथली वर्दळ घटू लागे. वेगाने रिती होत जाणारी पाणंद एकीकडे असे तर त्याच वेळी दुसरीकडे वेशीजवळील मारुतीरायाच्या देवळात वाढत जाणारी लगबग असे.

भक्कम दगडी बांधकाम असणाऱ्या नि बऱ्यापैकी जुन्या असलेल्या देवळातल्या लामणदिव्यांना तेलवात होताच सांज झाल्याची जणू अधिकृत घोषणा होई. ज्यांच्या घरी वीज असे तिथले टंगस्टन फिलामेंटचे पारदर्शक काचेचे बल्ब उजळून उठत. अन्यत्र लख्ख पुसून ठेवलेले कंदील जागे होत. काही ठिकाणी बत्तीचे मेंटल भडके. काही दारांजवळच्या देवळ्यांत बारीक वातीचे दिवे तेवू लागत. दरम्यान, पारावरील गप्पांना वेगळाच कैफ चढलेला असे. सांजेची निळाई पारावरल्या वडाच्या पारंब्यावरून लोंबकळत गावातल्या मातीत उतरे, गप्पांच्या या फडात पान तंबाखूची चंची उघडली जाताच बोलघेवड्या लोकांच्या डोळ्यात चैतन्य तरळे. शेतशिवारापासून ते ऊनपावसापर्यंत अनंत विषयावरच्या तिथल्या गप्पांचा शेवट आपल्या नेहमीच्या चिंता विठूचरणी वाहून सुफळ होई.

Village Story
Village Story : हक्क

संध्याकाळ सरताना चावडी मात्र भकास वाटे. गावातलाच कोणीतरी गांजलेला नडलेला अंधाराची प्रतीक्षा करून तिच्या कोनाड्यात दाखल झालेला असे. चमक फिकी झालेला, मंदिराचा पिवळसर कळस उतरणीच्या आभाळाकडे उद्याच्या दिवसाचे दान मागत तांबूस होऊन जाई. देवळाच्या शिखराभोवती काही उनाड कबुतरं गुटरssगुमचा आवाज काढत पंख फडफडवत बसत.

वेगवेगळ्या गल्ल्यांतनं डोईवर पाटी घेऊन ताज्या भाजीपाल्याचं माळवं विकणारे आपापल्या शैलीत आवाज देत फिरू लागत. घरोघरी चुलीतलं सरपण धडाडून जाई. काही मोजक्या ठिकाणी स्टोव्ह असत नि क्वचित एखाद्या घरी एलपीजीसुद्धा असे. चरचर आवाज करत पातेल्यांमध्ये आधण चढे. दरम्यान, गल्लोगल्ली पोरांचे खेळ जोमात येत. एकच गलका चोहीकडे उडालेला असे.

बागेतलं फिरणं, शॉपिंगची उनाडकी, बाजारपेठांतली चहलपहल, मॉल्सचा चकचकाट, हातात ताट घेऊन टीव्हीवरील मालिका बघत बसणं, योगा क्लासला जाणं, इव्हिनिंग वॉक एन्जॉय करणं असली कोणतीही सोंगं न करता अगदी नजाकतीनं ही सांज गावातल्या मातीत उतरे. तिला नशेची तलफ नसे, पैशाचा माज नसे, ज्ञानाचा अहंकार नसे, आपल्याच नादातला एकलकोंडा विखार नसे. शिट्या फुंकणारे हॉर्न वाजवणारे कर्कश आवाज तिच्या कवेत नसत. ती भरजरी वस्त्रात कधीच लपेटून येत नसे ;

नेसूच्या जुनेर कपड्यात ती येई. गावाकडची ही सांज भरल्या डोळ्याने येऊन पणतीच्या, दिव्याच्या वातीत उतरायची आणि घराघरांत प्रकाशाची आभा पसरवायची. पुढे जाऊन ही सांज पारावर विसावायची, गल्लोगल्ली खेळणाऱ्या पोरांच्या पायात थिरकायची, मंदिरातल्या टाळ चिपळ्यांच्या नादात दंग व्हायची,

शेतशिवारात मनसोक्त भटकून होताच बळीराजाच्या दमलेल्या पायांशी माथे टेकायची, गायीच्या शेपटीवरून बैलाच्या वशिंडावर घसरगुंडी खेळायची, गोठ्यातल्या वासराला झोपी लावून गावातल्या घरात यायची आणि झोळीत टाकलेल्या इवल्याशा गोजिरवाण्या देवपावलांचे चुंबन घ्यायची, देव्हाऱ्यात जाऊन समईच्या धाग्यात स्वतःला गुंफून घ्यायची, ढेलजेत येऊन ढांगा टाकायची! ही सांज सगळीकडे प्रफुल्लता घेऊन जायची, दमलेल्या प्रत्येक खांद्याला विसावा द्यायची, सुखाच्या गुजगोष्टी करायची.

उंबरठ्याजवळ येऊन थबकताच मात्र तिच्याही डोळ्याला पाणी यायचं. कारण दाराबाहेरच्या ओसरीत थकले भागले जीव उरले सुरले दिवस मोजत जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्याला पदर लावत बसलेले असायचे. उंबऱ्यापाशी उभं राहून दरवाजाच्या कडीशी चाळा करत नवी हळदओली सून माहेरच्या काचबिंदी आठवणींनी कासावीस झालेली असायची. तिच्या डोळ्यातला मायबापाचा विरह अन् पडवीत झिरपत असलेल्या चांदण्याचा आर्त प्रकाश यामुळं हिरमुसून गेलेली सांज तिथून निघून अखेरीस विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यावर जाऊन मस्तक टेकवे, आपला शीण घालवे. एव्हाना रात्रीचा अंधार घनगर्द होऊन गेलेला असायचा आणि श्रमलेल्या सांजेला त्यानं आपल्या कुशीत सामावून घेतलेलं असायचं.

आईचे सायमाखले हात पाठीवरून अदृश्य व्हावेत तशी ही सांज काळाच्या ओघात हरवून गेलीय. आता फक्त कासावीस झालेला चंद्रमा अधूनमधून लिंबाच्या झाडाआड हमसून हमसून रडताना दिसतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com