Nagpur News : ‘‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) माध्यमातून तब्बल ४५० कोटी रुपयांच्या प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी बुटीबोरी औद्योगिक परिक्षेत्रात केली जाणार आहे. हा प्रकल्प विदर्भात शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यास पूरक ठरेल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल,’’ असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
बुटीबोरी औद्योगिक परिक्षेत्रात उभारणाऱ्या दुग्धजन्य प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता.२४) ॲग्रोव्हिजन प्रदर्शनातून ऑनलाइन पद्धतीने विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विखे बोलत होते. ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष मिनेश शाह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील उपस्थित होते.
या प्रकल्पात मदर डेअरीच्या पनीर, तूप, आइस्क्रीम व इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन होईल. विदर्भाच्या कृषी आधारित अर्थकारणाला बूस्ट देण्यास हा उपक्रम पूरक ठरेल. त्यासाठी श्री. गडकरी आग्रही आहेत.
विखे-पाटील म्हणाले, ‘‘नगर जिल्ह्यात सुमारे ५३ लाख लिटर दूध उत्पादन होते. राज्याच्या तुलनेत ही सरासरी लक्षणीय आहे. नगर जिल्ह्यात दरवर्षी २०० ते २२५ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच दुग्धव्यवसायाकडे लक्ष्य देत प्रगती साधली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी देखील अशा व्यवसायासाठी पुढाकार घेतल्यास शेतीवर आधारित अर्थकारणास चालना मिळेल. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल.’’
श्री. गडकरी म्हणाले,‘‘ विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मागासलेपण दूर करण्यात मदर डेअरीचा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या काळात या प्रकल्पातून ३० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करावी.’’
‘‘महानंद’च्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न’
‘महानंद’च्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्ती आणि इतर आर्थिक बाबी संदर्भात शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे,’’ असे विखे-पाटील म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.