Chhatrapati Sambhajinagar : परिसरात घेतल्या जाणाऱ्या आले पिकाच्या उत्पादनात तफावत दिसते. ही तफावत व्यवस्थापनातील चूक अधोरेखित करीत असल्याचे मत मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.
‘सकाळ ॲग्रोवन’ आणि बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने खिर्डी येथे गुरुवारी (ता.६) ‘आले पीक लागवड व व्यवस्थापन’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. पाटील बोलत होते. या चर्चासत्राला बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीचे सीईओ आणि मुख्य शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त दत्तू सखाराम धोत्रे, कृषी सहायिका सोनाली पाटील, बायोमीचे उमेश भोसले आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘पाण्याचा योग्य निचरा होणारी व सुपीक जमीन आले पिकासाठी घ्यावे. या पिकासाठीचा बेड भुसभुशीत हवा. बेडमध्ये शेणखत, गांडूळ,खत, निंबोळी पेंड आदीचा आवश्यक वापर करावा. भाताचे तूस, गवत तसेच रेतीचा वापर लागवडीच्या बेडमध्ये केल्यास पाण्याचा निचरा व हवा खेळती राहण्यास मदत होते. बेडमध्ये प्राणवायू कमी असल्यास कंदांची दमकोंडी होऊ शकते.
आले व कोणत्याही कंदवर्गीय पिकाला अती पाणी देणे नुकसानकारक ठरते. बुरशीनाशकाची आळवणी करताना ती वापसा स्थितीतच करावी. बेडमध्ये हवेचे प्रमाण एक टक्का, पाणी एक टक्का व दोन टक्के अन्नद्रव्य आवश्यक आहे. हेक्टरी २० ते २५ क्विंटल बियाणे लागवडीसाठी वापरावे. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करून घ्यावी. उपयुक्त बुरशींना कार्यान्वित करण्यासाठी जैविक उत्पादनाचा वापर आवश्यक आहे.
लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी पिकाची उटाळणी करावी. संजीवकांचा वापरही उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतो. आवश्यकतेनुसार पाणी, जैविक निविष्ठा, बीज प्रक्रिया, संजीवक वापर, उटाळणी या विषयांकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन वाढते. बायोमीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. गाडगे म्हणाले, ‘‘कोणत्याही पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी रसायनांची निरक्षरता अपेक्षित उत्पादन न मिळण्यास कारणीभूत आहे. वाढता उत्पादन खर्च कीड रोग आक्रमण परिसरातील आले पिकातील प्रमुख समस्या आहेत. त्यावर नियंत्रणासाठी शिफारस कोणत्या गोष्टींची हे लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी बायोमिच्या विविध घटकांची व त्यांच्या उपयुक्ततेची माहिती गाडगे यांनी दिली. प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी, तर आभार वितरण सह व्यवस्थापक अजित वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲग्रोवनचे जिल्हा वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे यांच्यासह अशोक मतकर यांनी प्रयत्न केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.