World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Article by Dr. Venkatrao Ghorpade : आज जागतिक पशुवैद्यक दिन. 'Veterinarians are the essential health workers', अर्थात पशुवैद्यक हे मानवी आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे आरोग्य कर्मचारी आहेत, अशी या वर्षीची थीम आहे. पशुवैद्यक स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पशूंसह मानवी आरोग्य जपण्याचेही काम करीत असतात.
World Veterinary Day
World Veterinary DayAgrowon

डॉ. व्यंकटराव घोरपडे

९४२२०४२१९५

Health Workers Article : पशुवैद्यक संघटनेमार्फत दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘जागतिक पशुवैद्यक दिन’ साजरा केला जातो. सन २००० पासून याला सुरुवात झाली. एकूणच प्राणी जगताचे आरोग्य आणि कल्याणासाठी जागतिक पशुवैद्यक संघटनेची स्थापना करण्यात आली. दरवर्षी या संघटनेमार्फत एक थीम ठेवून सर्व पशुपालक, पाळीव प्राणी मालक यांना त्यांच्या पाळीव पशुपक्ष्यांबाबतचे महत्त्व, आरोग्य, लसीकरण याबाबत सजग करण्याचे काम जागतिक पशुवैद्यक दिनी केले जाते.

सन १८६३ मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय एडिनबर्ग (इंग्लंड) येथील प्राध्यापक डॉ. गॅम्गी यांनी युरोपमधील सर्व पशुवैद्यकांना एकत्र करून ‘वर्ल्ड व्हेटरनरी काँग्रेसची’ स्थापना केली. पुढे १९५९ मध्ये जागतिक पशुवैद्यक संघटना म्हणून पशू आरोग्य आणि कल्याण यावर भर देण्यात आला. प्रत्येक देशात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यक दिन साजरा केला जातो. विशेष अशा निवडलेल्या थीमला अनुसरून त्याबाबत चर्चासत्रे, सभा संमेलने आयोजित केली जातात. सर्व पशुवैद्यक, पशुपालक यांना मार्गदर्शन केले जाते. विशेष कार्य केलेल्या पशुवैद्यकांचा यथोचित सन्मानदेखील करण्यात येतो.

World Veterinary Day
Veterinary Research : पशुचिकित्सा संस्थेचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

या वर्षी 'Veterinarians are the essential health workers' अर्थात, पशुवैद्यक हे मानवी आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे आरोग्य कर्मचारी आहेत, अशी थीम निवडलेली आहे. पशुवैद्यकीय शास्त्र हे केवळ प्राण्यांच्या आरोग्य व कल्याणासाठी नसून मानव जातीच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक कल्याणासाठी देखील योगदान देणारे आहे, हे आज या निमित्ताने चर्चिले जाणार आहे. अनेक वेळा पशुवैद्यकांचे काम हे समाजाच्या दृष्टीने थोडे दुर्लक्षित राहते असे म्हणायला वाव आहे. पशुवैद्यकीय शास्त्र हे मानवी आरोग्याचे मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण करत असते आणि ते त्यांच्या व्यवस्थापनाचा आवश्यक भागही आहे. जरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले नसले तरी सार्वजनिक आरोग्य, अन्नसुरक्षा योग्य पद्धतीने पुरवण्यासाठी ते मदत करत असतात, हे मान्य करायलाच हवे.

जागतिक हवामान बदल आणि वाढत चाललेल्या प्राणिजन्य आजाराची संख्या याचा विचार केला तर निश्‍चितपणे पशुवैद्यकांचे महत्त्व अधोरेखित होते. प्राणिजन्य आजारांचे प्राण्यांमधील निदान करणे, ते रोखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, उपचार करून पुढाकार घेत असतात. प्रसंगी ते अशा आजारांच्या प्रथम संपर्कात येत असल्यामुळे त्याची लागण देखील होऊ शकते. संपूर्ण काळजी घेऊन याबाबतीत आरोग्य विभागाला अहवाल देणे, मार्गदर्शन करणे, नियंत्रणासाठी मदत करणे या बाबी ते करत असतात. उदाहरणादाखल जर यादीच द्यायची झाली तर क्षयरोग, ब्रुसेलोसिस, रेबीज, सार्स, एव्हिअन इन्फ्लुएंजा, क्रिमियन काँगो फीवर, कायसनुर (KFD), लेप्टोस्पायरोसिस, ॲन्थ्रॅक्स, अशा कितीतरी प्राणिजन्य आजाराची यादी देता येईल. जवळपास ७५ टक्के प्राणिजन्य आजार हे मानवाला प्राण्यांकडून होतात व त्याचा मानवी आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो.

देशात असणारी १४२ कोटी लोकसंख्या आणि ८५१.८१ दशलक्ष कुक्कुट पक्षी, ९.०६ वराह, ३०३.७६ दशलक्ष जनावरे, १४८.८९ दशलक्ष शेळ्या-मेंढ्या या एकाच सामुदायिक वातावरणात आणि विशेषता ग्रामीण भागात एकत्र राहून अशा रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असतात. अशावेळी अशा रोगाबाबत जागरूक राहणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे, निदान करणे, लसीकरण करणे व एकूण जनावरांच्या आरोग्याची काळजी घेऊन अशा रोगापासून सर्व जनावरांचे व पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी पशुवैद्यक धडपडत असतात.

त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होते. सोबत ज्या वेळी साथीचा प्रादुर्भाव होतो अशावेळी जलद बहुविभागीय कृती समितीमध्ये सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, महामारी शास्त्रज्ञ (Epidemiologist), यांच्या बरोबरीने पशुवैद्यक हे महत्त्वाचा रोल बजावत असतात. सध्या महाराष्ट्रात देखील आयसीएआर व आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या आवारात प्राणिजन्य आजारांचा सामना करण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून देशातील लोकांना मार्गदर्शन आणि प्राणिजन्य आजाराबाबत संशोधन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

World Veterinary Day
Veterinary Service : राज्यात पशुसेवेसाठी लागू होणार तीन पदांचा पॅटर्न

अनेक मान्यताप्राप्त पशुवधग्रहातून कत्तलीपूर्व जनावरांचे आरोग्य तपासणी केली जाते. अनेक रोगांबाबत तपासणी होते, वापरलेल्या प्रतिजैवकांचे परिणाम तपासले जातात. त्यामुळे अन्नसुरक्षा जपली जाते. प्राणिजन्य आजाराची लक्षणे, सेवाशुश्रूषा, आहार व्यवस्थापन याबाबत पशुवैद्यक हे अखंडपणे पशुपालकांना मार्गदर्शन करत असतात. प्राणिजन्य कचरा व त्याचे व्यवस्थापन याबाबत संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करणे, वन्यजीवांचे आरोग्य त्यांच्या माध्यमातून पसरणारे रोग त्यांच्या नियंत्रणाच्या बाबतीतही पशुवैद्यकांचा पुढाकार असतो हे देखील उल्लेखनीय आहे.

बऱ्याच विकसित देशांमध्ये पशुवैद्यक हे कीटकनाशकांचा वापर, औद्योगिक प्रदूषण आणि इतर दूषित घटकांचा प्राण्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदावर काम करत असतात. त्या माध्यमातून संबंधित संस्थांना मार्गदर्शनही करत असतात. अनेक रोगनिदान करणाऱ्या मोठमोठ्या प्रयोगशाळांमधून असणाऱ्या लहान प्राण्यांचे आरोग्य तपासणीचे काम देखील मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकाकडून केले जाते.

जेणेकरून रोगनिदान अचूक होऊन उपाययोजना करणे सोपे जाते. अनेक पशुवैद्यकीय प्रयोगशाळांमधून मानवी रोगांचे निदान आज काल सहज केले जाते. त्याबाबत मार्गदर्शन देखील आरोग्य विभागाला केले जाते. अनेक पशुवैद्यक शास्त्रज्ञांनी सांध्यांचे आजार, तुटलेली हाडे यावर नवनवीन उपचार तंत्र विकसित करून सोबत कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग आणि संसर्गजन्य रोगातील संशोधनांमध्ये योगदान दिलेले आहे. मानवी आरोग्यामध्ये आपला सहभागही नोंदवला आहे. पशुवैद्यक हे पाळीव प्राण्यांच्या मालकांना होणारे आजारपण त्यामुळे होणारे नुकसान आणि त्यांच्या वर्तणुकीसंबंधित समस्यांच्या वेळी भावनिक आधार देऊन त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

येणाऱ्या काळाचा विचार केला तर निश्‍चितपणे गाव पातळीवर पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभाग यांना एकत्रितपणे अनेक बाबींवर काम करावे लागणार आहे. रोगप्रसार त्याचे नियंत्रण याबाबत जनजागृती करणे, लसीकरण अशा बाबतीत एकत्रित काम केल्याने अनेक बाबी दोघांनाही समजावून घेता येतील व एकत्रित गावचे आरोग्य पर्यायाने सर्वांचे आरोग्य अबाधित ठेवता येईल, यात शंका नाही.

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com