
राहुल वडघुले
Natural Pest Management: पीक संरक्षणासाठी प्रामुख्याने रासायनिक कीडनाशकांच्या वापरावर भर दिला जातो. मात्र रासायनिक कीडनाशकांमुळे शेतातील मित्रकीटकांवर विपरीत परिणाम होतो. याशिवाय पीक उत्पादनामध्ये रसायन अवशेष शिल्लक राहतात. त्याचे मानवासह जमिनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यासाठी जैविक कीड नियंत्रण पद्धती फायदेशीर ठरते.
याशिवाय नैसर्गिक पद्धतीने शेतामध्ये विविध मित्रकीटक कीड व रोग नियंत्रणाचे काम करत असतात. त्यामुळे रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होते. यामध्ये वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, मित्रकीटक, कोळी यांचा समावेश होतो. निसर्गातील या उपयुक्त मित्रकीटकांचे संवर्धन करण्यासाठी त्यांची ओळख पटवून संवर्धन करणे गरजेचे आहे. आजच्या लेखात ‘लेडी बर्ड बीटल’ म्हणजेच ढालकिडा या मित्रकीटकाविषयी माहिती घेऊ.
किडीची ओळख
मित्रकीटक : लेडी बर्ड बीटल
मराठी नाव : ढाल कीड, ठिपक्याचा किडा
प्रकार : मित्रकीटक
किडीचा वर्ग : Insecta
ऑर्डर : Coleoptera
किडीचे कुळ : Coccinellidae
किडीचे भक्षक : मऊ अंग असलेले किडी जसे की, मावा, मिलिबग, पांढरी माशी, फुलकिडे, स्केल कीड, कोळी इत्यादी. विशेषतः लहान अळ्या देखील खातात.
भक्षक अवस्था : प्रौढ आणि अळी
जगभरात Coccinellidae या कुळात सुमारे ५००० प्रजाती आढळून येतात. यामध्ये जास्तीत जास्त प्रजाती या मित्रकीटक आहेत, तर काही प्रजाती पिकांना नुकसान करणाऱ्या आहेत. खालील छायाचित्रामध्ये Epilachna beetle ही कीड पिकाचे नुकसान करताना दाखविली आहे. ही कीड वांगी, कारली या पिकाची पाने खाऊन नुकसान करते. काही किडी फुलांमधील मकरंद खातात. काही प्रजाती हानिकारक बुरशी खातात. उदा. Illeis galbula आणि Illeis indica या प्रजाती भुरी रोगाच्या (पावडरी मिल्ड्यू) बुरशीला खातात.
समज गैरसमज
लेडी बर्ड बीटल या किडीची प्रौढ अवस्था सर्वांना परिचित आहे. परंतु किडीची अळी अवस्था परिचित नसल्यामुळे तिला हानिकारक कीड समजून नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी घेतली जाते.
कार्यपद्धती
या किडीला चावून खाता येईल अशाप्रकारचे दात (मॅंडीबल) असतात. हे दात चिविंग आणि बायटिंग प्रकारातील म्हणजेच भक्ष चावून चावून खाता येण्यासारखे असतात. किडीच्या तोंडाकडील खालील बाजूस शत्रू किडीला पकडण्यासाठी विशिष्ट अवयव (मॅक्झिलरी) असतो. या अवयवाच्या मदतीने किडीचे प्रौढ शत्रू किडीला पकडून मॅंडिबलच्या मदतीने भक्ष जिवंत असताना चावून बारीक तुकडे करून खातात.
भक्ष खाण्याची क्षमता
अळी अवस्थेतील लेडी बर्ड बीटल प्रति दिवस सुमारे ३० ते ४० मावा कीड, तर प्रौढ अवस्थेतील बीटल रोज ४० ते ५० मावा कीड खाते. संपूर्ण जीवनचक्रात प्रौढ अवस्थेतील लेडी बर्ड बीटल कीड सुमारे ५००० मावा कीड खाते.
किडीचा जीवनचक्र
किडीच्या संपूर्ण जीवनचक्रामध्ये प्रौढ कीड, अंडी, अळी आणि कोष या पूर्ण होतात.
प्रौढ अवस्था
वरील बाजूचे पंख हे कडक, अर्ध गोलाकार असून त्यावर काळे ठिपके असतात. यावरून किडीची ओळख पटविता येते.
खालील बाजूचे पंख पारदर्शक असून त्यांचा उडण्यासाठी उपयोग होतो.
ही अवस्था शत्रू किडी, परागकण, बुरशी किंवा झाडाचे भाग खाते. प्रौढ अनेक आठवडे किंवा वर्ष जिवंत राहतात.
अंडी अवस्था
मादी प्रौढ पानाच्या मागील बाजूला किंवा खोडावर समुहाने पिवळ्या भगव्या रंगाची लंबगोलाकार अंडी घालते. अंड्यामधून ३ ते १० दिवसांत अळी बाहेर पडते.
अळी अवस्था
किडीची अळी ही प्रौढ किडीपेक्षा अतिशय वेगळी असते. अळी आकाराने लंबगोलाकार काळ्या रंगाची असून पाठीवर पिवळ्या भगव्या रंगाचे ठिपके असतात.
अळीच्या शरीरावर सेंगमेंट असून त्यावर केसासारखी वाढ झालेली दिसून येते.
अळी अत्यंत चपळ असल्यामुळे जास्तीत जास्त भक्ष किडी खाऊ शकते. ही अवस्था २ ते ३ आठवड्यांची असून चार वेळा कात टाकून कोष अवस्थेत जाते.
कोष अवस्था
कोष हा पिवळ्या ते भगव्या रंगाचा असून त्यावरील काळ्या रंगाची ठिपके प्रकर्षाने दिसून येतात. पानावर किंवा फांदीवर हा कोष चिकटलेला दिसतो. कोष अवस्था ५ ते १० दिवसांची असते. कोषामधून प्रौढ किडा बाहेर येतो.
संवर्धनासाठी हे करता येईल
या किडीला नुकसान करणाऱ्या कीटकनाशकांचा वापर टाळावा.
या किडीला नुकसान करणार नाही असे कीटकनाशक गरज असेल तेव्हाच वापरावे.
जैविक कीडनाशकांचा जास्त वापर करावा.
एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
शेतामध्ये रासायनिक फवारणी सरसकट न करता, केवळ गरज असलेल्या ठिकाणीच फवारणी घ्यावी. (Spot Application)
शेतातील काही ठराविक भाग या किडींसाठी राखून ठेवावा.
पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना मित्रकीटकांची ओळख करून द्यावी.
- राहुल वडघुले, ९८८११३५१४०,
(लेखक कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीमध्ये तांत्रिक अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.