डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. सय्यद इस्माईल
Agriculture Crop Management : पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य अन्नद्रव्याइतकीच महत्त्वाची आहेत.अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यातील असंतुलन, यामुळे वनस्पतीच्या वाढीवर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. अलीकडच्या काळात पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी मुख्य अन्नद्रव्यांप्रमाणेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा देखील पुरेशा प्रमाणात वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य, कमतरतेची लक्षणे आणि उपाय
जस्त
अनेक संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वनस्पतीच्या शरीरातील अनेक प्रक्रियेमध्ये उदा. ऑक्सिजनशी संयोग पावणे, हरितद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी कार्ये व्यवस्थितपणे पार पाडली जातात.
वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे काही संजीवने तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्ताची मदत होते.
ठरावीक वनस्पतींच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत जस्ताची मदत होते.
कमतरतेची लक्षणे :
वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात.
पानांच्या शिरांच्या मधील भागातील उती मरतात.
शेंड्याकडील पाने खुजी होतात.
पालवीवर पांढरे चट्टे येतात, पालवी तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसते.
खोड वाळते, पाने पक्व होण्यापूर्वी गळतात. साल खडबडीत व टणक होऊन चकाकते.
उपाय :
०.५ ते १ टक्का तीव्रतेच्या जस्त सल्फेटची फवारणी करावी.
बोरॉन
बोरॉनचे प्राथमिक आणि महत्त्वाचे कार्य कॅल्शिअम या अन्नद्रव्याशी संबंधित आहे. कॅल्शिअम या अन्नद्रव्याचे वनस्पतींच्या मुळाद्वारे शोषण आणि योग्य उपयोग या बाबतीत बोरॉनचे कार्य महत्त्वाचे आहे.
वनस्पतीमध्ये कॅल्शिअम विद्राव्य स्वरूपात ठेवून त्याची चलनक्षमता वाढविण्यास बोरॉन मदत करतो.
वनस्पतीमध्ये पोटॅश किंवा कॅल्शिअमचे प्रमाण योग्य ठेवण्यात बोरॉन नियामक म्हणून कार्य करतो.
नत्राच्या शोषण प्रक्रियेत वनस्पतींना बोरॉनची मदत होते.
वनस्पतींच्या पेशीभित्तिकांचा महत्त्वाचा घटक आहे. पेशीविभाजनामध्ये बोरॉन आवश्यक असते.
कमतरतेची लक्षणे
वनस्पतींच्या शेंड्याकडील भागास पेशींचे विभाजन थांबल्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते. त्यामुळे बोरॉन कमतरतेची लक्षण वनस्पतीच्या शेंडा आणि मुशांच्या टोकाशी ठळकपणे दिसून येतात.
कळीचा रंग फिक्कट हिरवा होतो.
पानांचा रंग निळसर होऊन ती वेडीवाकडी, जाड व ठिसूळ होतात. नवीन पाने गुंडाळतात व सुकतात.
कंद फळांचा गाभा काळा पडून भेगा पडतात.
उपाय :
बोरॅक्स २५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात विरघळून फवारणी करावी.
तांबे
अमिनो ॲसिड आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात.
वनस्पतीमध्ये ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत जी संप्रेरके मदत करतात, त्यामध्ये तांबे इलेक्ट्रॉन घटक म्हणून कार्य करते.
हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत लोहाचा वापर अधिक कार्यक्षमपणे करण्यास मदत करते.
कमतरतेची लक्षणे
पानांचा आकार लहान होतो, कडा करपतात.
शेंडेमर झालेल्या फांदीवर अनेक फुटवे फुटून लहान पानांचा झुपका तयार होतो.
मुळांवर गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते.
उपाय
कॉपर सल्फेट ०.४ टक्का म्हणजेच मोरचुदाच्या द्रावणाची फवारणी द्यावी.
मॉलिब्डेनम
वनस्पतीमधील ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत संप्रेरक प्रणालीमध्ये महत्त्वाचे कार्य.
वनस्पतीच्या पेशीमध्ये ॲमिनो ॲसिड आणि प्रथिने तयार होण्यापूर्वी आवश्यक असलेल्या नायट्रेट नत्राचे रूपांतर अमोनियामध्ये करण्यासाठी आवश्यक.
वनस्पतीमध्ये वातावरणातील नत्र स्थिरीकरणातील कार्यक्षमता मोलाब्दमुळे वाढते.
कमतरतेची लक्षणे
पाने पिवळसर व निस्तेज दिसतात, पानांच्या शिरांमधल्या जागेत प्रथम पिवळसर हिरवा किंवा थोडासा नारंगी रंग दिसतो. नंतर तो सर्व पानांवर पसरतो.
झाडाची मोठी पाने पेल्याच्या आकाराची होतात. वनस्पतीची वाढ खुंटते,
जास्त कमतरता असल्यास पानगळ होते. पानाच्या मागील बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.
उपाय
सोडिअम मॉलिब्डेट ०.२५ ते ०.५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीतून द्यावे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह २ टक्के, मंगल १ टक्के, जस्त ५ टक्के, तांबे ०.५ टक्का आणि बोरॉन १ टक्का याचा वापर मातीपरीक्षणानुसार करावा. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह २.५ टक्के, मंगल १ टक्का, जस्त ३ टक्के, तांबे १ टक्का, मॉल्ब्डिेनम ०.१ टक्का आणि बोरॉन ०.५ टक्का याचे मिश्रण ०.५ टक्का कमतरतेनुसार पानावर फवारणीद्वारे केल्यास उत्पादनात अधिक फायदा होतो.
फवारणीद्वारे वापर
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांस नियमित व वारंवार दिली गेली पाहिजेत. संशोधनातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फळपिकांमध्ये फवारणीद्वारे वापर अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. फवारणीद्वारे सूक्ष्म अनद्रव्ये देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात चुना योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असणे आवश्यक आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्य खत प्रमाण
जस्त सल्फेट ०.५ ते १.०० टक्का
लोह सल्फेट ०.५ ते १.०० टक्का
मँगेनीज सल्फेट ०.५ ते १.०० टक्का
कॉपर सल्फेट ०.५ ते १.०० टक्का
बोरॅक्स किंवा बोरिक ॲसिड ०.२ ते ०.५ टक्का
सोडिअम किंवा अमोनिअम मोलाब्द ०.०५ ते ०.०१ टक्का
जमिनीद्वारे वापर
माती परीक्षण अहवालाद्वारे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाण निश्चित करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्यक आहे. जमिनीत कमी प्रमाणात असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा खतांद्वारे दिली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य अन्नद्रव्यांसोबत द्यावीत. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो. त्यामुळे पिकास फारच कमी उपलब्ध होते. चुनखडीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ही चिलेटेड स्वरुपात तसेच फवारणीद्वारे देखील देता येतात.
जमिनीद्वारे द्यावयाची मात्रा
सूक्ष्म अन्नद्रव्ये खते मात्रा जमिनीद्वारे वापर (हेक्टरी)
तांबे
कॉपर सल्फेट (मोरचूद) २४ टक्के ५ ते १० किलो
कॉपर डीटीए चिलेट १३ टक्के ---
जस्त
जस्त सल्फेट २१ टक्के २० ते २५ किलो
जस्त ईडीटीए चिलेट १२ टक्के ५ किलो
लोह
लोह सल्फेट १९ टक्के २० ते २५ किलो
फेरस ईडीटीए चिलेट १२ टक्के ५ किलो
मंगल
मंगल सल्फेट ३० टक्के १० ते २५ किलो
मँगेनीज ईडीटीए चिलेट १२ टक्के २ किलो
बोरॉन
बोरक्स ११ टक्के ५ ते १० किलो
बोरिक ॲसिड १७.५ टक्के ५ किलो
बियाण्यांसोबत वापर (बियाण्यांवर लेप)
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून बियाण्यांवर लावून पेरणी करता येते. परंतु या पद्धतीत अन्नद्रव्यांचा पुरवठा फारच कमी प्रमाणात होतो. उदा. मोलाब्द सूक्ष्म अन्नद्रव्य संयुगांचे कडधान्य बियाण्यांवर जिवाणू संवर्धकासोबत लेप देणे.
तांबे व जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शक्यतो जमिनीतूनच द्यावीत. तर लोह, मंगल, बोरॉन, मोलाब्द यांचा पिकांवर शिफारशीनुसार फवारणीद्वारे द्यावीत. फवारणीमुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.
चुनखडीयुक्त, विम्ल जमिनी, सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची जास्त गरज असते. हलक्या, वाळूयुक्त आणि उथळ जमिनीमध्ये जस्त, लोह व बोरॉन कमतरता अधिक भासते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
सूक्ष्म अन्नद्रव्य खताचे नाव वापर
१) जस्त जस्त सल्फेट किंवा चिलेटेड जस्त पेरणी सोबत अन्यथा पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत किंवा शिफारशीनुसार जमिनीद्वारे व फवारणीकरिता
२) लोह फेरस सल्फेट किंवा चिलेटेड लोह जमिनीद्वारे देण्याऐवजी पिकांवर २ ते ३ फवारणीस योग्य, जमिनीद्वारे द्यावयाचे असल्यास सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
३) मंगल मँगेनीज सल्फेट किंवा चिलेटेड मँगेनीज लोहाप्रमाणेच फवारणीस योग्य. परंतु फवारणीचा कालावधी शिफारशीनुसार असावा.
४) तांबे मोरचूद (कॉपर सल्फेट) शिफारशीनुसार जमिनीद्वारे द्यावे.
५) बोरॉन बोरक्स किंवा बोरिक ॲसिड जमिनीद्वारे तसेच फवारणीद्वारे देण्यास योग्य.
६) मोलाब्द सोडिअम मोलाब्द किंवा अमोनिअम मोलाब्द बीज क्रिया करणे सर्वांत योग्य. इतर खतांसोबत मिसळून जमिनीद्वारे किंवा फवारणीद्वारे देण्यास योग्य.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी व प्रमाणावरून वापर (प्रति दशलक्ष भाग–पीपीएम)
सूक्ष्म अन्नद्रव्य कमी (पीपीएम) पुरेसे (पीपीएम) कमी असल्यास उपाय
लोह / फेरस २.५ पेक्षा कमी २.५ ते ४.५ फेरस सल्फेट १०.२५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे किंवा ०.५ ते १ टक्का हिराकसची फवारणी.
मंगल / मँगेनीज २.० पेक्षा कमी २.० ते ५.० मँगेनीज सल्फेट १० ते २५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे किंवा १ टक्का मँगेनीज सल्फेटची फवारणी.
जस्त / झिंक ०.६ पेक्षा कमी ०.६ ते १.२ झिंक सल्फेट २० ते ४० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे किंवा ०.५ ते १ टक्का झिंक सल्फेटची फवारणी.
तांबे / कॉपर ०.३ पेक्षा कमी ०.३ ते ०.५ मोरचूद किंवा कॉपर सल्फेट ५ ते १० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे किंवा ०.४ टक्के मोरचूदची फवारणी.
बोरॉन ०.१ पेक्षा कमी ०.१ ते ०.५ बोरॅक्स ५ ते १० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे किंवा १ टक्का सोल्यूबोअरची फवारणी
मोलाब्द/ मॉलिब्डेनम ०.०३ पेक्षा कमी ०.०३ ते ०.०६ सोडीअम मॉलिब्डेट ०.२५ ते ०.५० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे.
- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६
(सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र)
(डॉ. सय्यद इस्माईल हे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य म्हणून कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.