Life Cycle of the Humani Worm and EPN
Life Cycle of the Humani Worm and EPNAgrowon

Humani Pest Control: ऊस पिकातील हुमणी नियंत्रणासाठी तातडीचे उपाय

Sugarcane Pest Management: बदलत्या हवामानामुळे हुमणी किडीचे प्रौढ जमिनीतून यावर्षी लवकर बाहेर आले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा किडीचा प्रादुर्भाव लवकर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुमणीचा बदलता जीवनक्रम लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Published on

शिवाजीराव देशमुख, सुधा घोडके, डॉ. क्रांती निगडे

Sugarcane Crop Management: दरवर्षी वळीव पावसानंतर आढळणारे हुमणीचे भुंगेरे यावर्षी मार्चमध्येच आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा हुमणीचा प्रादुर्भाव लवकर व मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हुमणी किडीची जीवनशैली देखील बदललेली आहे. यापूर्वी वळवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात व्हायची. मात्र यावर्षी मार्च महिन्यामध्येच भुंगेरे बाहेर येत असल्यामुळे नर व मादीचे मिलन लवकर होऊन पुढील काळात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक वाढेल. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. तर ऊस उत्पादनात हेक्टरी १५ ते २० टनांपर्यंत नुकसान होते. त्यामुळे हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जीवनक्रम (होलोट्रॅकिया)

किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेत पूर्ण होतो. मॉन्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीच्या प्रौढ भुंगेरे संध्याकाळी जमिनीतून बाहेर येतात. त्यानंतर कडुनिंब, बाभूळ, बोर इ. झाडांची पाने खातात. या झाडांवर नर आणि मादीचे मिलन होते. त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते.

अळीची पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी ३० ते ४५ दिवस व तिसरी अवस्था १४० ते १४५ दिवसांची असते. तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल गेल्यानंतर कोषावस्थेमध्ये जाते.

किडीची एक पिढी पूर्ण होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो.

Life Cycle of the Humani Worm and EPN
Humani Pest Control: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण

नुकसानीचा प्रकार

प्रथम अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा पिकाच्या मुळ्यांवर उपजीविका करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी ऊस व इतर पिकांची मुळे खातात. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो. पाने मरगळतात. हळूहळू पाने पिवळी पडतात. साधारणपणे वीस दिवसांमध्ये संपूर्ण ऊस वाळून काठीसारखा दिसतो.

एका उसाच्या बेटाखाली सुमारे २० अळ्या आढळून येतात. उसाचे एक बेट एक अळी तीन महिन्यात, तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त अळ्या एक महिन्यात कुरतडून कोरडे करतात.

अळी जमिनीखालील उसाच्या कांड्यावर देखील उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त उसाला हलका झटका दिल्यास ऊस सहजपणे उपटून येतो.

हेक्टरी २० ते २५ हजारांपर्यंत अळ्या सापडल्यास, साधारणपणे १५ ते २० टनांपर्यंत नुकसान होते. जास्त प्रादुर्भावामध्ये पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे मोठे नुकसान होते.

आर्थिक नुकसान पातळी

एक अळी प्रति घनमीटर.

पावसाळ्यात कडुनिंब, बोर किंवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास उपाय योजावेत.

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती

अ) पारंपरिक पद्धती

प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करणे.

रात्रीच्या वेळी भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ व कडुनिंबाच्या झाडावर जमा होतात. संध्याकाळी ७ ते ९ या दरम्यान झाडाच्या फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून ई.पी.एन ५० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या जैविक कीडनियंत्रकांच्या द्रावणात टाकून मारावेत.

भुंगेरे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

Life Cycle of the Humani Worm and EPN
Sugarcane Pest Management : उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक व्यवस्थापन

रासायनिक पद्धती :

कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडावर, इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

शेतामध्ये शेणखत, कंपोस्टखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेणखत किंवा कंपोस्टखतातून हुमणीची अंडी व अळ्या शेतामध्ये जातात. त्यासाठी एक बैलगाडी शेणखतामध्ये दाणेदार फिप्रोनील (०.३ जी.आर.) १ किलो मिसळून नंतर शेतात टाकावे.

मोठ्या उसामध्ये, फिप्रोनील (४० टक्के) व इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी १००० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून जमिनीत द्यावे.

जैविक पद्धत

जैविक पद्धतीमध्ये प्रामुख्याने किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर केला जातो. हुमणीचे नैसर्गिक शत्रू जसे बुरशी, सूत्रकृमी यांचा वापर किडींचा नायनाट करण्यासाठी केला जातो. यात बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम ॲनिसोपली या बुरशींचा वापर नियंत्रणासाठी केला जातो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे जैविक कीड नियंत्रक विकसित करण्यात आले आहे.

ईपीएन : (एन्टोमोपॅथोजनिक नेमॅटोड)

यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे विकसित केलेल्या सूत्रकृमीयुक्त द्रवरूप ईपीएन (एन्टोमो पॅथोजेनिक नेमॅटोड) चा वापर करण्यात आला आहे.हे जमिनीमध्ये आढळणारे परोपजीवी सूत्रकृमी असून ते जमिनीमधील हुमणीला शोधून तिच्या शरीरावरील छिद्रांवाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करतात. त्यानंतर ते किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमधील दुसऱ्या हुमणीला रोगग्रस्त करतात. त्यामुळे हुमणी अळीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते.

वापर ः (प्रति एकर)

ई.पी.एन. १ लिटर प्रति ४०० लिटर पाणी या प्रमाणात मुळांजवळ वाफसा स्थितीत आळवणी करावी.

ई.पी.एन. हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणू तसेच पिकावर विपरीत परिणाम होत नाहीत.

- सुधा घोडके ९६२३२५५३०५ - डॉ. क्रांती निगडे ८३७९९४६९८७ (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com