Plastic Crop Cover : बागेत लावलेल्या प्लॅस्टिक कव्हरचे फायदे

Vineyard Management : व्हेंटिलेटेड आणि सलग अशा दोन्ही प्रकारच्या प्लॅस्टिक कव्हरसोबतच प्लॅस्टिक कव्हर नसलेल्या क्षेत्रातील निरीक्षणे घेण्यात आली. या प्रयोगातील प्रमुख निरीक्षणातून द्राक्ष बागेमध्ये प्लॅस्टिक कव्हर लावण्याचे फायदे आपल्याला स्पष्ट दिसतात.
Grape Crop Cover
Vineyard ManagementAgrowon
Published on
Updated on

Grape Crop Management : वाळवा (ता. जि. सांगली) येथील किशोर मगदूम यांच्या या वर्षी प्लॅस्टिक कव्हर केलेल्या द्राक्ष बागेमध्ये निरीक्षणे घेण्यात आली. यापैकी काही क्षेत्रावर सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या झोपडी पद्धतीने प्लॅस्टिक कव्हर होते, तर काही बागेवर पूर्व व पश्चिम बाजूला वेगवेगळे प्लॅस्टिक लावून दोन्ही प्लॅस्टिकमध्ये गरम हवा बाहेर जाण्यासाठी मोकळी जागा ठेवलेली (व्हेंटिलेटेड कव्हर) दोन्ही बागेमध्ये प्लॅस्टिकखालील व अन्य प्लॅस्टिक नसलेल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र वेदर स्टेशन लावले होते.

त्यामुळे तिन्ही प्रकारच्या बागेतील तापमान व आर्द्रता यात पडणारा फरकही मोजण्यात आला. दोन्ही प्लॅस्टिक कव्हरमध्ये एकाच प्रकारची (म्हणजेच आंतर- ओव्हन एचडीपीई प्लॅस्टिक युव्ही स्टॅबिलाFज्ड १२० जीएसएम इतकी पातळ) फिल्म किंवा प्लॅस्टिक वापरले होते. अन्य सर्व व्यवस्थापनही समान ठेवण्यात आले होते. त्यामुळे निरीक्षणातील फरक हा केवळ प्लॅस्टिक लावण्याचा पद्धतीमुळे असल्याचे आपल्याला समजता येईल. या प्रयोगातील प्रमुख निरीक्षणे पुढील प्रमाणे...

केवडा प्रादुर्भाव

छाटणीनंतरच्या २५ दिवसांतच घेतलेल्या माहितीनुसार, प्लॅस्टिक कव्हर न केलेल्या बागेतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त घड केवडा प्रादुर्भावामुळे भरपूर फवारण्या घेऊनसुद्धा वाया गेले. या उलट प्लॅस्टिक कव्हर असलेल्या दोन्ही बागेत केवडा रोगाचा संसर्गच झालेला दिसला नाही. या बागांमध्ये तर जुलै अखेरीला छाटणी घेतली होती.

१ ते १० ऑक्टोबरपर्यंत वाळव्यामधील सुमारे २५०० एकरांपैकी ४०० एकर क्षेत्रामध्ये छाटण्या घेतल्या होत्या. या सर्वच बागांमध्ये झालेला पाऊस व दवामुळे मोठ्या प्रमाणात घडांचे नुकसान झाले होते. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे या ४०० एकरांपैकी एकाही बागेत १ ते ४ टनांपेक्षा जास्त माल नाही. म्हणजेच हे ५० ते ९० टक्के नुकसान प्लॅस्टिक कव्हरमुळे निश्चित वाचू शकते.

उष्णतेचा कर्बग्रहण प्रक्रियेवरील परिणाम

जुलै ते डिसेंबरच्या काळात ऑक्टोबर महिना सर्वांत गरम असतो. या वर्षी या महिन्यात उघड्या बागेतील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असताना झोपडी पद्धतीच्या प्लॅस्टिक कव्हरखाली बागेत कमाल तापमान यावेळी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते, तर व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक कव्हरखाली ते ३३ ते ३६ अंशापर्यंत पोहोचले होते.

म्हणजेच प्लॅस्टिक कव्हरखालील तापमान हळूहळू वाढत जाऊन ते ३५ अंश सें. पेक्षा जास्त फार कमी वेळेसाठी राहील. परिणामी, त्याचा पानाच्या कर्बग्रहण प्रक्रियेवर कमीत कमी विपरीत परिणाम होईल. माझ्या मते हे दुपारी तापमान कमी ठेवण्यातले मोठे यश आहे.

व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्षांच्या काढणीवेळी केलेल्या घड निरीक्षणातून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे...

साखर जास्त बनल्यामुळे घड जास्त वजनदार आहेत.

याचमुळे बागेतील उत्पादनातही वाढ झाली. झोपडी पद्धतीमध्ये ५.७१ किलो, तर व्हेंटिलेटेड प्लॅस्टिक खाली ७.१ किलो प्रति वेल इतके उत्पादन मिळाले. ही बाग कृष्णा सीडलेस या जातीची असून, त्याच्या ओळीमधील अंतर ७ फूट तर दोन वेलींतले अंतर ४.५ फूट होते. या घटकांचाही विचार केला तर उत्पादनामध्ये मिळालेला फरक मोठा आहे.

टीएसएस १८ ते १९ होता, तर तो झोपडी पद्धतीमध्ये तो १५ ते १७ होता.

या मुद्द्यांवरूनच बागेतील तापमान नियंत्रणाचे महत्त्व समजते.

थंडी व दवाची समस्या

वाळव्यामध्येच डिसेंबर महिन्यात थंडीची लाट आली. भरपूर थंडी आणि सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत पडणारे दव अशी स्थिती होती. या काळात माल काढणीसाठी तयार असलेल्या बागांमध्ये या अचानक आलेल्या थंडी व धुक्यामुळे मणी क्रॅकिंगची समस्या उद्‌भवली.

त्या आधी दोनच दिवसांपूर्वी ज्या बागेसाठी २० ते २५ लाख रुपयांचा सौदा झाला होता, नंतर त्या बागेतील क्रॅकिंगमुळे आता दोन ते अडीच लाख रुपयेही देण्यास व्यापारी तयार नव्हता. प्लॅस्टिक कव्हरखाली तापमान इतके कमी होत नाही व दवही पडत नाही, त्यामुळे मणी क्रॅकिंगची समस्या दिसणार नाही.

Grape Crop Cover
Grape Crop Cover : द्राक्ष बागांसाठी मागेल त्याला ‘क्रॉपकव्हर’ द्यावे

प्लॅस्टिक ठेवणे व काढणे याची गरज

फळाची छाटणी जुलैमध्ये घेतल्यास प्लॅस्टिक कव्हर सांभाळणे थोडे सोपे आहे. सध्या वातावरणात होणारे अवेळी बदल द्राक्ष बागायतदारांना हैराण करत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक कव्हर भविष्यात जवळजवळ वर्षभर लागणार आहे. काही विशिष्ट वेळी प्लॅस्टिक काढून ठेवणेसुद्धा आवश्यक आहे.

उदा. सांगली भागातील गारपीट सर्वसाधारणपणे एप्रिल- मे मध्ये येते आणि तयार होणाऱ्या काड्या खराब करून टाकते. (छायाचित्र ३) एप्रिल - मे मध्ये तापमान ४०- ५० अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने प्लॅस्टिक लावणे शक्य होईल असे वाटत नाही. कारण एका एकरावर प्लॅस्टिक चढवण्यासाठी येणारा खर्च ८ ते १० हजार रुपये आहे आणि त्यासाठी किमान ३ ते ४ दिवस लागतात. त्यामुळे आयत्या वेळेला प्लॅस्टिक लावणेही शक्य नाही.

खरड छाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांच्या काळात काडीमध्ये सुप्तावस्थेतील घडांची निर्मिती होते. अगदी जोमाने वाढणाऱ्या काडीला या काळात वेगवेगळे ताण दिले जातात. उदा. वाढरोधक रसायनांचा वापर, सबकेन करणे, आणि पाण्याचा ताण इ. यामध्ये पाण्याचा ताण सगळ्यात महत्त्वाचा. सर्वप्रकारचे ताण दिल्यानंतरही पाण्याचा ताण देता आला नाही तर सुप्तावस्थेतील घड निर्मितीला मोठा अडथळा होतो.

अलीकडे बऱ्याच भागात बागा खरडछाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांत असतानाच नेमका पाऊस येतो. काही वर्षांपूर्वी ‘एनआरसीजी’ च्या शास्त्रज्ञांनी नाशिक जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यातून घडनिर्मितीच्या वेळी पावसात सापडलेल्या बागेमध्ये घडनिर्मिती नव्हतीच किंवा गोळीघड तयार होण्यासारख्या समस्या दिसून आल्या होत्या.

काडी सबकेन न करता सरळ ठेवली असता घडनिर्मिती साधारण ९ ते १० व्या डोळ्याच्या पुढे होते. बऱ्याच बागा ऑक्टोबरनंतर फेल गेल्या. ही समस्या अलीकडे वाढत चालली आहे. प्लॅस्टिक कव्हरने यावरही नियंत्रण मिळू शकेल असे वाटते. कारण पाऊस आला तरीही प्लॅस्टिक लावलेल्या बागेत पाण्याचा ताण देणे शक्य होणार आहे.

Grape Crop Cover
Grape Crop Cover : प्लॅस्टिक कव्हरखालील बागेतील रोग नियंत्रण

बऱ्याच बागांमध्ये जमीन फारशी खराब नाही. मात्र सिंचनाचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे मुळांच्या जवळपास क्षार साठतात. हे क्षार बागेच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम करतात. सर्वसाधारणपणे वर्षातून येणारे मोठे पाऊस व बागेतून वाहणारे पाणी हे क्षार मातीतून निचरा होऊन ही समस्या बऱ्यापैकी कमी होते. पावसापासून संरक्षण म्हणून बागेवर पावसाच्यावेळी प्लॅस्टिक कव्हर टाकल्यास ड्रीपरच्या जवळपासचे क्षार कसे काय जाणार, असा प्रश्न उद्‌भवू शकेल.

विशेषतः जुलैमध्ये छाटून लगेच प्लॅस्टिक टाकणाऱ्यासाठी ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. प्लॅस्टिक लावल्यानंतर कदाचित पहिल्या १-२ वर्षे क्षारांची समस्या लक्षातही येणार नाही. मात्र पावसाच्या दिवसांत वातावरण बघून काही काळ प्लॅस्टिक बाजूला करणे आवश्यक आहे.

एनआरसीजीच्या प्रक्षेत्रात केलेल्या अशाच प्लॅस्टिक कव्हर काही पावसाळी दिवसांसाठी बाजूला काढण्याच्या एका प्रयोगामध्ये मातीची क्षारता (ईसी) लक्षणीयरित्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. अन्यथा क्षार मुळाजवळून दूर किंवा कमी करण्यासाठी मोकळे पाणी द्यावे लागेल. जत व विजापूरसारख्या भागात संपूर्ण बोद तोडून पुन्हा माती व शेणखताबरोबर उभा करतात.

प्लॅस्टिक कव्हर वापरातील सुलभतेसाठी उपाययोजना

अर्थात, बागेत वरील मुद्दे लक्षात घेऊन प्लॅस्टिक पुन्हा पुन्हा काढणे व चढवणे हे फार कष्टाचे व कठीण काम आहे. या सर्वाला उपाय म्हणून बागेत प्रत्येक ओळीवर एक लांबलचक प्लॅस्टिक न लावता दोन ‘वाय’ अँगलमध्ये सरकवता येतील असे छोटे छोटे प्लॅस्टिकचे तुकडे लावल्यास सोयीचे होऊ शकते. अशा प्रकारचे तुकडे एकदा लावले की वर्षभर काढण्याची गरज भासणार नाही.

ज्यावेळी गरज नसेल, त्यावेळी हे प्लॅस्टिक पडदे सरकवून ठेवता येतील व पुन्हा हवे असताना ओढून घेणे सोपे होईल. व्हेंटिलेटेड प्लॅस्टिकमध्ये पूर्वेला व पश्चिमेला प्लॅस्टिकचे वेगवेगळे तुकडे असतात. अशा पद्धतीमध्ये पूर्वेच्या बाजूचे प्लॅस्टिक फिक्स लावायचे, तर पश्चिम बाजूचे छोट्या तुकड्यांमध्ये लावून पडद्यासारखे हलविण्याची सोय करता येईल. आपल्याकडील पाऊस पश्चिमेकडून येतो. पश्चिमेकडील मावळता सूर्यप्रकाश हा जास्त स्कॉर्चिंग आणणारा असतो. खरे पाहता पश्चिमेकडील प्लॅस्टिकच पुन्हा पुन्हा काढणे व घालणे जास्त आवश्यक आहे.

टीप ः वाळवा गावातील निरीक्षणे आम्ही पुढील वर्षी सुरू ठेवणार आहोत. सध्या ही निरीक्षणे व काढलेले निष्कर्ष हे वाळव्यातील असून, महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष विभागामध्ये लागू पडतील असे नाही. त्यामुळे सर्व विभागामध्ये निरीक्षणे घेण्याचा विचार नक्कीच आहे. याबाबत उत्सुकता असलेल्या बागायतदारांसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ते संपर्क करू शकतात.

- डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९

(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com