Grape Crop Cover : प्लॅस्टिक कव्हरखालील बागेतील रोग नियंत्रण

Vineyard Management : प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर लवकर (म्हणजेच जुलै - ऑगस्टमध्ये) छाटणी घेऊन द्राक्षाचे उत्पादन नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये आणणाऱ्या द्राक्ष बागायतदार प्रामुख्याने करताना दिसतात.
Vineyard
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Grape Farming : प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर लवकर (म्हणजेच जुलै - ऑगस्टमध्ये) छाटणी घेऊन द्राक्षाचे उत्पादन नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये आणणाऱ्या द्राक्ष बागायतदार प्रामुख्याने करताना दिसतात. पहिल्या दोन लेखामध्ये प्लॅस्टिक आच्छादनाखाली द्राक्ष पिकाचे नियोजनासंबंधी माहिती घेतली. प्लॅस्टिक आच्छादनाखाली पिकाचे नियोजन करताना तापमान नियंत्रणाचे मोठे आव्हान असते. तापमानाचे योग्य पद्धतीने नियंत्रण केल्यास रोगकीडी आपोआपच आटोक्यात राहतात.

लवकर म्हणजेच जुलै - ऑगस्टमध्ये छाटणी घेतल्या जाणाऱ्या बागांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव ही महत्त्वाची समस्या आहे. खुल्या बागेमध्ये नवीन फुटी व घड कोवळे असताना ४ ते ५ दिवस सलग पावसाळी वातावरण राहिल्यास प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षेप्रमाणे रोग नियंत्रण मिळत नाही. पिकाचे शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

केवड्याचा प्रादुर्भाव होण्यासाठी पाने ओली होणे अत्यावश्यक आहे. द्राक्षवेलींवर लावलेल्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे कॅनोपीतील उष्णता रात्रीच्या वेळी अवरक्त (इन्फ्रा रेड) किरणांच्या उत्सर्जनाद्वारे कॅनोपीपासून दूर जात नाही. परिणामी कॅनोपीतील वातावरण बाह्य वातावरणापेक्षा अधिक उबदार राहते. विशेषतः प्लॅस्टिकमध्ये इन्फ्रारेड किरणे अडवणारी रसायने असल्यास कॅनोपीतील वातावरण सकाळपर्यंत जास्त उबदार राहते.

सामान्यतः सर्व ठिकाणी सकाळी थंड वातावरणामुळे बाष्पाचे दवामध्ये रूपांतर होते. मात्र प्लॅस्टिक आच्छादनाखालील पाने व काड्या अधिक उबदार असल्यामुळे तेथे दव पडत नाही. परिणामी पाने ओली होत नाहीत. साहजिकच कोरड्या पानांवर केवडा येणारच नाही. मात्र अनेक बागायतदार प्लॅस्टिक आच्छादन करूनही केवड्याच्या नियंत्रणासाठी फवारण्या घेत राहतात. माझ्या मते पाने ओली झाल्याशिवाय केल्या जाणाऱ्या या फवारण्या आवश्यक नाहीत.

Vineyard
Crop Cover Scheme : ‘कागदपत्रांमुळे त्रस्त, ‘क्रॉप कव्हर’चे भिजत घोंगडे’

आमच्या प्रयोगातील आशादायक निष्कर्ष

आम्ही केलेल्या एका प्रयोगामध्ये प्लॅस्टिक कव्हर केलेल्या ओळीतील काही काड्या प्लॅस्टिकच्या बाहेर वाढल्या होत्या. त्या काडीवरील प्लॅस्टिकच्या बाहेरील पानांवर भरपूर केवडा वाढला होता. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यावर कोणतीही फवारणी न घेता केवळ त्या काड्या प्लॅस्टिकच्या खालील कॅनोपीमध्ये व्यवस्थित बांधून घेतल्या.

प्लॅस्टिक खालील वातावरणात केवड्याचा प्रादुर्भाव असलेल्या पानावरील रोग अन्य पानांवर पसरला तर नाहीच, पण खुद्द प्रादुर्भाव असलेल्या पानांवरसुद्धा पुढे त्याची वाढ झाली नसल्याचे आढळले.

या निरीक्षणातून प्लॅस्टिक कव्हरखाली केवड्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करून खर्च वाढवण्याची आवश्यकता नाही. केवळ रोग नुकसानकारक आहे, या भीतीपोटी फवारणी करण्यापेक्षा सकाळी आठ वाजता पाने ओली आहेत का, हे पाहूनच फवारणी घेण्याबद्धलचा निर्णय बागायतदारांनी घ्यावा.

भुरीचे नियंत्रण

केवडा रोगाच्या उलटी स्थिती भुरी या रोगाबाबत घडताना दिसते. कारण भुरी रोगाच्या वाढीसाठी कोरडी पाने, ४० टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता आणि प्रकाशाची कमी तीव्रता या तीन गोष्टी आवश्यक असतात. या तीनही गोष्टी प्लॅस्टिक कव्हरखालील कॅनोपीमध्ये उपलब्ध असल्याने भुरी निश्चितच येते. या भुरीच्या नियंत्रणासाठी घड फुलोऱ्यात असतानाच आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करून भुरीचा धोका कमी करून घ्यावा.

त्यानंतर कोणत्याही आंतरप्रवाही बुरशीनाशकांपेक्षा सल्फर व जैविक नियंत्रकांचा आलटून पालटून वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. जैविक नियंत्रणासाठी कोणत्या बुरशीचा किंवा जिवाणूंचा वापर करायचा, हे ठरविण्यासाठी आपल्या बागेतील वातावरण जाणून घेणे गरजेचे असते. उदा. भुरी नियंत्रणासाठी जास्त थंडी असताना ॲम्पिलोमायसेस, कमी थंडी असताना ट्रायकोडर्मा तर तापमान उबदार असताना बॅसिलस सबटिलिस या जैविक घटकांचा ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापर करता येईल.

या तीनही जैविक नियंत्रकांची फवारणी बागेमध्ये जास्त आर्द्रता असलेल्या स्थितीत केल्यास अधिक यशस्वी ठरते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अशी सापेक्ष आर्द्रता प्लॅस्टिक कव्हरखाली बऱ्यापैकी नियमितच उपलब्ध असते. म्हणूनच प्लस्टिक कव्हरखाली जैविक नियंत्रण हे हुकमी एक्क्यासारखे काम करतात. मात्र भुरीसाठी सामान्यतः वापरली जाणारी आंतरप्रवाही बुरशीनाशके ही जैविक नियंत्रकांचासुद्धा नाश करतात.

Vineyard
Grape Crop Cover : द्राक्ष बागांसाठी मागेल त्याला ‘क्रॉपकव्हर’ द्यावे

म्हणूनच प्लॅस्टिक कव्हरखाली फुलोऱ्याच्या नंतर त्यांचा वापर कटाक्षाने टाळावा. सल्फर हा घटक जैविक नियंत्रकांसाठी कमीत कमी हानिकारक आहे. म्हणून सल्फरचा वापर प्लॅस्टिक कव्हरखाली केल्यास जैविक नियंत्रण निश्चितपणे काम करत राहील. सल्फरचे ‘डब्ल्यूपी’ फॉर्म्युलेशन न वापरता ‘एससी’ फॉर्म्युलेशन वापरावे. तसेच फवारणी इलेक्ट्रोस्टॅटीक फवारणीयंत्राने केल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळते.

शिवाय घडांवर सल्फरचे डाग किंवा वास राहत नाही. मात्र फवारणीदरम्यान कॅनोपीमध्ये चांगले कव्हरेज मिळणे महत्त्वाचे आहे. एखादा घड खोडाला चिकटून राहिला असल्यास त्याच्या खोडाकडील भागात भुरी वाढते. त्यावरील बीजाणू प्लॅस्टिक खाली भुरी वाढविण्यास कारणीभूत होतात. प्लॅस्टिकखाली सल्फरचा जास्त वापर होत असल्यास सल्फर किंवा धुळीने खराब न होणारे खास प्लॅस्टिकही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर अधिक फायदेशीर राहू शकतो.

कीड नियंत्रण

प्लॅस्टिकखालील बागेमध्ये अन्य बागांच्या तुलनेमध्ये कीड कमी असते. छोट्या किडी (उदा. फूलकिडे, तुडतुडे इ.) हे वाऱ्याबरोबर बागेत पसरतात. प्लॅस्टिकमुळे कॅनोपीमध्ये हवेचा वेग कमी असतो. त्यामुळे या किडींचा प्रसारही कमी होतो. तरीही सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढल्यास बागेमध्ये कोवळ्या फुटींवर फुलकिडे (थ्रिप्स) वाढतात. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यक असते.

मिलीबग व लाल कोळी या किडी जास्त तापमान व कमी आर्द्रतेमध्ये मण्यात पाणी भरायला लागल्यानंतर येतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते येण्याची शक्यता फारशी नसेल. प्लॅस्टिक खाली भुरीच्या नियंत्रणाप्रमाणेच या किडींच्या नियंत्रणासाठीही जैविक नियंत्रण यशस्वी होऊ शकते. त्यासाठी व्हर्टिसिलीअम लेकॅनी, मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली या सारख्या बुरशींजन्य कीडनाशकांचा वापर जैविक नियंत्रणासाठी यशस्वी होऊ शकेल. त्याच प्रमाणे आपण भुरीच्या नियंत्रणासाठी वापरलेल्या सल्फरमुळे बागेतील लाल कोळीचेही नियंत्रण बऱ्यापैकी साधू शकते.

- डॉ. एस. डी. सावंत,

९३७१००८६४९

(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com