
Latur News : जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यातच पावसाळ्याला सुरवात झाली आहे. शासकीय भाषेत बेमोसमी असलेल्या या पावसाचा मोठा फटका जिल्ह्याला बसला आहे. आतापर्यंत या महिन्यात वीज अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला, तर ९८ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यातील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मार्च व एप्रिलमध्येच उन्हाळा जाणवला. त्यामुळे मेमध्ये उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवेल, असे वाटत होते. पण, मेमध्ये वैशाखी उन्हाळा लातूरकरांना जाणवलाच नाही. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी आहे. कधी जोरदार पाऊस पडत आहे, तर कधी रिमझिम. रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाळी वातावरण तयार झाले आहे. जनजीवनावरही याचा परिणाम झाला आहे. या बेमोसमी पावसाचा फटका मात्र जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपूर्वी वादळी वारे, विजांच्या कडकडटासह पाऊस पडला होता. यातच आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ठिकठिकाणी वीज पडून ९८ जनावरे ठार झाली आहेत.
यात लहान दुधाळ जनावरे ४८, मोठी दुधाळ जनावरे ४३, ओढकाम करणारी मोठी जनावरे सात यांचा समावेश आहे. या बेमोसमी पावसाने ६५ गावे बाधित झाली आहेत. या पावसाचा फळबागांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ३१ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती गोळा करणे सुरू झाले आहे.
आतापर्यंत सरासरी १८४.५ मििलमीटर पाऊस
जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १८४.५ मिलीमीटर पाऊस झाला. यात लातूर तालुक्यात १९३.४, औसा १८३.८, अहमदपूर १३७.७, निलंगा १८३.६, उदगीर २००.५, चाकूर १८१.९, रेणापूर १६७.१, देवणी २६१, शिरूर अनंतपाळ १८९, जळकोट तालुक्यात सरासरी १६१.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यात २४ मेपर्यंत १९.७ मिलीमीटर अपेक्षित पाऊस आहे; आतापर्यंत १८४.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. याची टक्केवारी ९३६.५ इतकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.