- डॉ. आनंद नाडकर्णी
Human Willpower : आपल्या मनात उद्दिष्टांची जुळवाजुळव आणि मांडणी आपल्याही कळत नकळत सुरू असते. एक क्षण असा येतो की पुरता निश्चय होतो. आणि मग त्या ध्येयासाठी इच्छाशक्ती निर्माण होते. माणसाच्या विकासात, ध्येयपूर्तीच्या प्रवासात अशी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची ठरते. पण ती स्वार्थी ध्येयाने प्रेरित आहे की परमार्थ साधणारी?
दीपावली सणाच्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. सणवार आले की त्याच्या तयारीत, कामांच्या धांदलीत आपली ठरलेली नेहमीची कामं जरा मागेच पडतात. पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष होतं. महत्त्वाची पण तितकीशी तातडीची नसलेली कामं पुढं ढकलली जातात. काही दिवसांत सणाची-समारंभाची धांदल संपते; पण परत आपली गाडी मूळ पदावर यायला मात्र तयार नसते.
आपण स्वत:लाच म्हणत राहतो, “सध्या ना, मोटिव्हेशन नाहीये ही कामं करायचं!” आपल्याला एखादं उद्दिष्ट किंवा कार्य साध्य करायचं असतं, तशी इच्छा असते, त्यासाठी लागणारे कौशल्य आणि क्षमताही आपल्याकडे असते; पण इच्छाशक्ती कमी पडते. हे मोटिव्हेशन म्हणजेच इच्छाशक्ती म्हणजे नक्की काय आणि ती कशी मिळवायची, ते आपण पाहूया.
‘इच्छा तिथे मार्ग’ हे आपण सगळेच जाणून आहोत, अनुभवलं देखील आहे. आपल्याला अनेक इच्छा असतात. त्या इच्छांमधल्या ज्या पर्यायाकडे आपला कल वाढतो, त्या पर्यायासाठी आपण ऊर्जा, शक्ती घालायला लागतो आणि त्यातून उद्दिष्ट आकार घ्यायला लागते. एकदा उद्दिष्ट नक्की झालं की मग त्यासाठी आपण पूर्ण बळ लावतो, ऊर्जा निर्माण होते. ध्येय माणसाला ऊर्जा देते. ऊर्जा घेऊन माणूस ध्येयाकडे जातो. उद्दिष्टाकडे घेऊन जाणारी ही शक्ती म्हणजे इच्छाशक्ती.
ही इच्छाशक्ती अजागृत अवस्थेत आपल्या मनात असते. मग तरीही ती सहजासहजी जागृत का बरं होत नाही? त्याची पुढील कारणे आहेत ः
- आपल्या उद्दिष्टांविषयी आपल्यालाच नेमकेपणाने स्पष्टता नसते, अशा वेळी इच्छाशक्ती उपयोगाची नाही. उदाहरणार्थ, दुसरी-तिसरीतल्या मुलाला घरचे सगळे सांगत असतात, की भरपूर अभ्यास कर आणि चांगले मार्क मिळव. पण त्या मार्कांचा उपयोग नक्की काय हे त्या लहानग्याला समजत नसतं आणि त्यामुळे त्याला अभ्यास स्वत:हून करायची इच्छा फारशी नसते बऱ्याचदा.
- आपल्या भावना तीव्र (सुखद किंवा दुःखद) असतील, तर आपण भावनेनुसार वागत जातो, आपलं इच्छाशक्तीचं बळ कमी पडू शकतं. म्हणजे सलग तीन-चार सामने जिंकले, की त्या टीमला तीव्र आनंद आणि अतिविश्वास वाटायला लागतो, की पुढच्या सामन्याआधी सराव करायची टाळाटाळ केली जाते, इच्छाशक्ती कमी पडते.
- सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलाच मूर्खपणा. आपण मनावर घेऊन कष्ट करायला कचरतो. तंबाखू सोडायला हवी, मधुमेह असताना साखर वाढू द्यायला नको हे बुद्धीला कळत असलं, तरी त्यासाठीचे मनाचा निग्रह आणि इतर कष्ट आपल्याला करायचे नसतात. मग काही वेळा मित्रांमुळे / प्रभावी नेतृत्वामुळे किंवा तातडी वाटल्याने आपण वर पाहिलेल्या कारणांवर मात करून त्या त्या कामाला लागतो, इच्छाशक्ती जागी करतो.
पण आपण इच्छाशक्ती जागृत केली, तरी ती टिकून राहात नाही. कुठलेही दीर्घ पल्ल्याचे ध्येय गाठायचे, तर आपल्याला त्याकडे नेणारी निरंतर, सतत टिकून राहणारी इच्छाशक्ती हवी. ती कशी टिकवायची? त्यासाठी काही पायऱ्या आपण पाहूया ः
- स्वत:चे परखड निरीक्षण आणि परीक्षण करू या. माझे उद्दिष्ट काय आहे? मी आता कुठल्या ठिकाणी आहे? अजून किती पल्ला मला गाठायचा आहे? मला हा पल्ला गाठायचा तर स्वत:ला काय सांगायला हवे? शॉर्ट टर्म किंवा नजीकची उद्दिष्टे कशी आणि काय असायला हवीत? या गोष्टींचे स्पष्ट आणि परखड निरीक्षण करणे आवश्यक आहे.
- उद्दिष्टाकडे दीर्घकाळ वाटचाल करताना फक्त आपल्याच विचारांचा रेटा दर वेळी पुरेसा पडेल असे नाही. समविचारी लोक, साथ देणारे आप्त-स्वकीय यांचा पाठिंबा घ्यायला हवा. त्यातून माझी इच्छाशक्ती शाबूत आणि जागृत ठेवायला हवी. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांच्या सवंगडी मावळ्यांची, आई जिजाबाईंची साथ होती. जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो ध्यास घेतला होता, त्यात सावित्रीबाईंची साथ त्यांना नवं बळ देणारी आणि इच्छाशक्ती जागृत ठेवणारी होती.
- उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना, पाठीवर अशी कौतुकाची थाप देणारे कमी आणि टीका-निंदानालस्ती करणारेच जास्त. संत तुकारामांना मंबाजीने छळले, तर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना पैठणचा ब्रह्मवृंद टोचून बोलत होता.
अशा टीकेकडे, निंदेकडे सशक्त पद्धतीने पाहता यायला हवे. त्यातला कुठला भाग माझ्या चुका दाखवणारा, सुधारणा सुचवणारा आहे, हे लक्षात घेतले तर मला इच्छाशक्ती बळकट करायला मदत होईल.
माणसाची जगण्यातली इच्छाशक्ती ही सगळ्यात आदिम. ती समजून घेतली तर त्याचे तीन टप्पे दिसतील ः - अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड. - स्वत:चे जगणे अधिक सुकर व्हावे, त्रास कमी व्हावा आणि आराम वाढावा यासाठीचा प्रयत्न. - जगणे अर्थपूर्ण (अधिक आनंदी, विकसनशील आणि स्वार्थ व परमार्थ जोडून घेणारे) व्हावे यासाठी केलेला प्रयास.
यापैकी पहिले दोन टप्पे हा आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या हार्डवेअरचा भाग आहेत. त्यामुळे अस्तित्व टिकवणे आणि स्वत:चे आयुष्य अधिक सुखकर करणे यासाठीची इच्छाशक्ती आपल्यापाशी उपजतच आहे. त्यासाठी वेगळे काही प्रयास करायला लागणार नाहीत.
मात्र जगणे अर्थपूर्ण करणे हा आपण मानवाने शिकलेला, विकसित केलेला भाग आहे. तो आपल्या सॉफ्टवेअरचा भाग आहे. त्यामुळे अशी उद्दिष्टे आणि त्यासाठी इच्छाशक्ती प्रयत्नपूर्वक मिळवायला लागते. इच्छाशक्ती जागृत होणे, ही जणू दूध तापण्याच्या प्रक्रियेसारखी असते. ही प्रक्रिया हळूहळू सुरू असते, दूध आतून गरम होत असते. मात्र त्याची दृश्य जाणीव आपल्याला दूध वर येतं किंवा उतू जातं तेव्हा होते.
आपल्या इच्छाशक्तीचे दोन पैलू असतातः बाह्यरुप इच्छाशक्ती (extrinsic motivation) आणि अंतर्गत इच्छाशक्ती (intrinsic motivation). बाह्यरूप इच्छाशक्ती म्हणजे मिळणारा पैसा, यश, नाव किंवा सत्ता अशा ध्येयांसाठीची इच्छाशक्ती. तर अंतर्गत इच्छाशक्ती म्हणजे मनातून, आतून, ध्येयाचा पूर्ण स्वीकार केल्यामुळे मला ध्येयाबद्दल जे प्रेम आणि निष्ठा वाटते त्यातून निर्माण होणारी इच्छाशक्ती. अंतर्गत इच्छाशक्ती जागी झाली की ती आपल्याला दीर्घकाळपर्यंत ऊर्जा पुरवते.
आपल्या मनात उद्दिष्टांची जुळवाजुळव आणि मांडणी आपल्याही कळत नकळत सुरू असते. एक क्षण असा येतो की पुरता निश्चय होतो. आणि मग त्या ध्येयासाठी इच्छाशक्ती निर्माण होते. माणसाच्या विकासात, ध्येयपूर्तीच्या प्रवासात अशी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची ठरते. पण ती स्वार्थी ध्येयाने प्रेरित आहे की परमार्थ साधणारी? म्हणजे पाहा, हिटलरची जर्मनीला सर्वश्रेष्ठ बनवायची इच्छाशक्ती ही अतिशय क्रूर आणि स्वार्थी होती. अशी स्वार्थाने अंध झालेली इच्छाशक्ती विनाशाकडे घेऊन जाते.
मात्र स्वार्थ आणि परमार्थ जोडून घेणारी इच्छाशक्ती माणसाला कणखर बनवते, विकासाकडे घेऊन जाते. हिंदवी स्वराज्य स्थापण्याची, अन्याय्य राजवट संपवण्याची शिवरायांची इच्छा ही परमार्थ-समस्त जनतेचे हित- साधणारी होती. अशी व्यक्ती आपलं कौशल्य-क्षमता वाढवते आणि इतरांनाही देते. माणसामाणसांमधले बंध-अनुबंध जोडले जातात. इच्छाशक्ती मुरली की ती व्यक्ती प्रेरणादायी बनून जाते. मोठी ध्येये, उदात्त उद्दिष्टे अशा इच्छाशक्तीतून साकारतात. आजच्या काळातील आनंदवन, हेमलकसा अशी अनेक उदाहरणे म्हणजे अशा परमार्थ जोडून घेणाऱ्या इच्छाशक्तीचेच फलित. सर्वहितसाधक, स्वार्थ आणि परमार्थ जोडून घेणारी इच्छा म्हणजे निर्मितीक्षम इच्छाशक्ती. त्याबद्दल पुढल्या लेखात विस्ताराने जाणून घेऊ.
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.