
जिओपॅथिक स्ट्रेस झोन ः भाग १
पाणी हेच सर्व जीवनाचा आधार आहे म्हणूनच त्याच्या अनेक समानार्थी शब्दांत ‘जीवन’ या शब्दाचाही समावेश आहे. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे आपत्तिजनक स्थिती निर्माण होऊन जीवन असलेले हेच पाणी अनेक वेळा जीवनास धोकाही निर्माण करते. हे साधारणपणे आपल्याला माहीत असते.
पण मी तुम्हाला जर सांगितले, की जमिनीखालून वाहणारे पाणीही तुमच्या आरोग्याला, जीवनाला धोका निर्माण करू शकते, तर तुमचा विश्वास बसणार नाही. हो खरेच, सहजासहजी पटण्यासारखे नाहीच ते! कोणत्याही अविश्वसनीय बाबीसंदर्भात आपल्याला ती अंधश्रद्धाच असे वाटते.
आपल्या थोड्याफार अनुभवातून काही लोक जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची मांडणी करत होते. पण कुणीही विश्वास ठेवत नव्हते. अंधश्रद्धा किंवा छद्मविज्ञान म्हणून नाकारण्याकडेच बहुतेकांचा कल होता व आजही आहे.
असाच दुसरा विषय म्हणजे, विहीर वा बोअरवेल खोदण्यासाठी जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती १) हातावर नारळ घेऊन जमिनीवर फिरणे किंवा २) धातूचे दोन राॅड हातात घेऊन फिरणे. याकडेही छद्म विज्ञान वा अंधश्रद्धेचे लेबल लावले जाते.
सामान्यपणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित पण इतरांच्या दृष्टीने टिंगलीच्या मानल्या जाणाऱ्या या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची, त्याला आधुनिक शास्त्रांच्या कसोट्या लावण्याची गरज होती. हे धाडस केले ते पुण्यातील एका कॉलेजच्या प्राध्यापकांनी. त्यांनी विज्ञानाच्या आवश्यक त्या साऱ्या कसोट्या लावत महत्त्वपूर्ण संशोधन मांडले. त्यातून अनेक शास्त्रीय तथ्यांच्या उलगडला झाला आहे.
या जमिनीखालील पाण्याच्या प्रवाहाचे केवळ माणसाच्या हातातील नारळावरच परिणाम होतो असे नाही, तर त्या प्रवाहाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी त्याचा प्रभाव अनेक असाध्य वाटणाऱ्या आजारांच्या कारणमीमांसेपर्यंत जाऊ शकत असल्याचे दाखवले आहे.
इतके मोठे रहस्य उलगडणाऱ्या या अभ्यासाचे स्वागत सुरुवातीला अवहेलनेनेच झाले. पण जसजसे संशोधन पुढे गेले आणि अधिक पुरावे मिळत गेले, तेव्हा मात्र तेच लोक कौतुकही करू लागले. पुण्यातील प्राध्यापकांनी केलेल्या या मूलभूत संशोधनाला जगातून मान्यता मिळू लागली. त्यांना अमेरिकेतील विद्यापीठांमधून संशोधन सादरीकरणासाठी व चर्चेसाठी निमंत्रणे येऊ लागली. १९९४ मध्ये सुरू झालेल्या या रहस्यभेदांतून प्रा. अविनाश खरात यांनी पीएच. डी. तर मिळवलीच, पण त्यातील काही पेटंटही घतले.
त्यांच्या बरोबरीने आणि नंतर गुरू शिष्य परंपरेतून हे संशोधन पुढे गेले. प्रा. डाॅ. नंदकुमार धर्माधिकारी, प्रा. डाॅ. सुनील पिंपळीकर, प्रा. डाॅ. रविराज सोरटे, प्रा. डाॅ. रोहित सालगुडे, प्रा. डाॅ. चाफेकर, प्रा. डाॅ. दीपक कोळेकर, प्रा. डाॅ. अर्जून वसटकर, प्रा. डाॅ. सौ. स्नेहल बोबडे -सोरटे या मंडळींनी या विषयातल्या संशोधनाचे पुढचे अनेक टप्पे गाठले आहेत.
गेल्या तीस वर्षांतली ही संशोधन वाटचाल महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यातून निर्माण झालेले ज्ञान व त्याचे संभाव्य उपयोग याबद्दल या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले पाहिजे. इतकेच नव्हे तर त्यांचा अभिमान आणि कृतज्ञताही बाळगली पाहिजे. कारण या जमिनीखालील पाण्याचे प्रवाह आपल्या सर्वांच्या जीवनात विशेषतः शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठे परिणाम होतात.
शास्त्रीय भाषेतच बोलायचे, तर याला म्हणतात, ‘जिओपॅथिक स्ट्रेस झोन’. तो कसा तयार होतो? या झोनचे परिणाम काय? त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्या काय असतात? त्यावर काय उपाययोजना करता येतील, या सर्वांची शास्त्रीय आणि तांत्रिक मीमांसा आपण पुढील काही लेखातून पाहणार आहोत.
...अशी झाली सुरुवात
१९९४ ची गोष्ट. अविनाश खरात हे पुण्यातील भारती विद्यापीठातील स्थापत्य विभागामध्ये प्राध्यापक होते. दोन व्याख्यानांच्यामध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळात त्यांचे विभागाच्या खिडकीबाहेर त्यांचे लक्ष गेले. एक मनुष्य हातावर नारळ आडवा ठेवून शेजारच्या प्लॉटवर हळूहळू पावले टाकत चालत होता. चालता चालता एका विशिष्ट जागेवर आल्यावर त्याच्या हातातील नारळ एकदम उभा राहिला आणि त्या माणसाच्या हातून खाली पडला.
अरे, तो हे काय करतोय? याबद्दल सरांची उत्सुकता चाळवली गेली. त्या माणसाने दोन, तीन वेळा वेगवेगळ्या दिशांनी येत तीच कृती केली. तो सरळ रेषेत चालत येत असतानाच त्या विशिष्ट ठिकाणी आल्यावरच त्याच्या हातात तोपर्यंत आडवा निवांत असलेला नारळ उभा राहत होता.
सरांनाही प्रथम अंधश्रद्धाच वाटली. अशा प्रकारे जमिनीतले पाणी शोधतात हे त्यांना ऐकून माहीत होते. त्याला ते अंधश्रद्धाच मानत होते. मग ते बाहेर गेले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या अन्य सहकाऱ्यांनाही ते गंमत म्हणून दाखवले. परंतु तो माणूस स्वतःच नारळ हातसफाईने पाडतोय असे सर्वांचे मत झाले.
मग आपण हे करून पाहू असे म्हणत सर आणि त्यांचे तीन-चार सहकारी प्राध्यापकही नारळ हातावर आडवा ठेवून एक एक पाऊल टाकत त्या दिशेने चालू लागले. त्या विशिष्ट जागेवर आल्यावर त्यांच्याही हातातील नारळ उभा राहिला. त्याचा तोल न सांभाळता आल्याने खाली पडला. एकाला नाही, तर तीन-चार प्राध्यापकांनी करून पाहिले तर त्यांचाही हाच
अनुभव.
त्या माणसाने दाखविलेल्या त्या जागी दुसऱ्या दिवशी बोअरहोल घेण्यात आले. त्या बोअरला भरपूर पाणी लागले. काल वाटणाऱ्या गमतीचे आज आश्चर्यात रूपांतर झाले होते. मग पुढील काही दिवस संपूर्ण विभागात याच विषयावर चर्चा होत राहिली. त्या वेळी त्यांचे स्थापत्य अभियांत्रिकीचे तत्कालीन विभागप्रमुखांनी खरात सरांना यावरच संशोधन करण्यास सुचवले.
तोपर्यंत या साऱ्या प्रकाराला अंधश्रद्धा किंवा छद्म विज्ञान मानणारे खरात सरही प्रत्यक्ष अनुभवामुळे या संशोधनाला तयार झाले. सामान्यतः आधुनिक विज्ञानामध्ये ज्यांना वैज्ञानिक आधार नाही, किंवा वैज्ञानिक निकष लावून सिद्ध करता येत नसलेल्या विचारांना छद्म विज्ञान (स्युडो सायन्स) असे समजले जाते. जगभरामध्ये अनेक असे विषय आहेत की ज्याविषयी फारसे पुरावे नसताना किंवा सिद्ध झालेले नसतानाही केवळ एखाद्या वैज्ञानिक सिद्धान्ताप्रमाणे मांडणी केली जाते.
त्यातून त्यात ते वैज्ञानिक तथ्य असल्याचा दावा केला जातो. पण ते सर्व दावे विज्ञानाच्या नियमापेक्षा विसंगत व बऱ्याचदा अतिशयोक्तिपूर्णच नव्हे, तर असत्य आणि वा विरोधाभासाने भरलेले असतात.
विज्ञानातली गृहीतके आपल्या सोयीप्रमाणे तोडमोड करून बऱ्याच असत्य बाबी शब्दांच्या गारुडाने सत्य भासवल्या जातात. जमिनीतल्या पाण्यामुळे हातातला नारळ उभा राहतो किंवा पडतो व त्या ठिकाणी हमखास पाणी लागते, हे स्वतः सरांना त्या वेळेपर्यंत तरी छद्म विज्ञान वाटत होते.
पण आता संशोधक म्हणून मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रा. खरात यांनी हे सारे तंत्र छद्म विज्ञान आहे की खरेच त्यात काही वैज्ञानिक तथ्ये आहेत, हे शोधण्याचे आव्हान स्वीकारले.
कोणत्याही संशोधनाची सुरुवात होते, ती त्या बाबतीतले संदर्भ शोधण्यातून. त्यानुसार खरात सरांनी दोन कृतींवर भर दिला.
वास्तुशास्त्र विषयातल्या माहिती आणि साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्याविषयी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील विविध पुस्तके, संदर्भ साहित्य शोधण्यास सुरुवात केली.
त्यांनी नारळाच्या प्रयोगाप्रमाणेच जमिनीखाली पाणी शोधण्याचा अन्य काही पद्धती आहेत का, याचा शोध सुरू केला. त्यातून त्यांनी डाउजिंग हा सोपी पण खात्रीशीर पद्धत सापडली. मग सरांनी योग्य व्यक्तींकडून डाउझिंगही शिकून घेतले.
पुढील लेखामध्ये डाउजिंग म्हणजे काय, ते कसे करतात आणि त्याचे परिणाम याची माहिती घेऊ.
- सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.