Ujani Dam : उजनी पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर?

Ujani Panlot Area : धरणात यंदा मात्र १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
Ujani Dam
Ujani DamAgrowon

सकाळ वृत्तसेवा
Pune News : पळसदेव-ः पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गत वर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या या धरणात यंदा मात्र १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

यातही आगामी सहा महिन्यांत नदी, कालवा, पाणी योजनांद्वारे तीन आवर्तने सोलापूर जिल्ह्याला देणे निश्चित असल्याने, यंदा धरण कोरडे पडणार आहे. परिणामी तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीनंतर पहिले आवर्तन देण्यास सुरवात केली जाणार असून, यानंतर मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण ६० टक्के (९५ टीएमसी) भरले होते. यामध्ये ६३ टीएमसी मृत पाणीसाठा, तर ३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यापैकी आतापर्यंत २४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला, तर कालवा व इतर पाणी योजनांद्वारे हे पाणी वापरले गेले आहे.

सध्या केवळ १५ टक्के उपयुक्त साठा म्हणजे ८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. तर, आगामी सहा महिन्यांमध्ये सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याची, शेतीची व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे तारेवरची कसरत ठरणार आहे.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी जलाशयात केत्तूर येथे आठ लाख मत्स्यबीज सोडले

भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता १११ टक्के भरल्यानंतर १२३ टीएमसी आहे. यामध्ये ६३ टीएमसी पाणी हे मृतसाठा म्हणून, तर उर्वरित ५४ टीएमसी पाणी हे उपयुक्त पाणी म्हणून साठविले जाते. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो.

धरणाचा बॅकवॉटर पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमिटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून असल्याने, दर वर्षी ३० हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वांत मोठे कोठार म्हणून या जलाशयाकडे पाहिले जाते.

धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना-माढा, दहीगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा व नदीद्वारे दिले जाते. मागील काही वर्षांच्या नोंदीवर नजर टाकल्यास सन २०१०, २०१८, २०२० ते २०२२ या वर्षांमध्ये जानेवारीमध्ये धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. यंदा मात्र धरणातील पाणीपातळीने शंभर टक्क्यांचा टप्पा गाठला नाही. तर जानेवारी, मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यांसाठी संभाव्य आवर्तन दिली जाणार आहेत.

नदीतून पाणी देण्यासाठी एका आवर्तनासाठी सुमारे ६ टीएमसी पाण्याची आवश्यक असते. एकंदरीत पावसाळ्यापर्यंत आवर्तनाचा विचार केल्यास मृत साठ्यातील सुमारे ६० टक्के म्हणजे ३० टीएमसीहून अधिक पाणी वापरले जाणार आहे. उरलेल्या पाणीसाठ्यातून सुमारे ५ टीएमसी गाळाचे प्रमाण वजा केल्यास उरणारे पाणी केवळ बघत बसण्याची वेळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर येणार आहे.

उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष अरविंद जगताप म्हणाले, ‘‘धरणातील पाण्यापैकी धरणग्रस्तांसाठी उपयुक्त साठ्यातील ९.६० टीएमसी पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. धरणातील मृतसाठा वगळता उपयुक्त साठ्यातील धरणग्रस्तांच्या वाट्याचे पाणी वगळून पाणी वाटपाचे नियोजन गरजेचे आहे.

वास्तविक उपयुक्त साठ्यासह मृत साठ्यातील पाण्याचा वापर होतो आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पावसाळ्यानंतर धरणातील पाणी बेकायदेशीरपणे नदीतून सोडले जाते. यामुळे धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com