Story of Government Officer and Employees : शासकीय वाहन अशी खास ओळख सांगणाऱ्या जुन्या बंद बॉडीच्या जीपमध्ये मला ड्रायव्हरने पाठीमागे बसविले आणि जोरात दरवाजा ढकलला. माझी शंका खरी होती, हा दरवाजा आता मुक्कामाच्या ठिकाणीच उघडणार होता. बरं झालं आपल्या कल्पनारंजनासाठी आता छान एकांत मिळणार आहे. स्वसंवादात रमणे हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा लहानपणापासूनचा अविभाज्य भाग आहे.
नवीन शाळेत जाणे असो, नवीन व्यक्तीस भेटणं असो अथवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे असो, माझ्या कल्पनेच्या आविष्काराने मनःपटलाच्या कॅनव्हासवर धुसर चित्र उमटायला लागते. प्रत्यक्ष घटनेनंतर त्याचे खरं चित्र तयार होते आणि स्मरणात खोल रुतून बसते. स्वसंवादाच्या बाबतीत समर्थांनी काय चपखलपणे लिहून ठेवले आहे,
कल्पनेचा प्रांत, तो माझा एकांत,
तेथ मी निवांत, बैसईन !
साहेब बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. साहेबांची ओळख दोन दिवसांपूर्वी झाली. यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. साहेब तसे मोकळेढाकळे, पदानुसार येणारा कोणताही अभिनिवेश नाही. मात्र एकही पदोन्नती नसलेली बऱ्याच वर्षांची सरकारी नोकरीमुळे येणारी नकारात्मक मानसिकता त्यांच्याकडे आहे. हे म्हणतात , ‘‘यहा गधे, घोडे एक साथ गीने जाते है.’’
बाकी एकदम गप्पिष्ट, त्यात बराच वेळा बाळबोध चर्चा जसे आमच्या गावी देवळात एक परग्रही येतो व तो मंदिर स्वच्छ करतो पण कोणाला दिसत नाही, एका पुजाऱ्याला फक्त दिसतो. मग ड्रायव्हरचे तसेच उलटेसुलटे प्रश्न आणि निरर्थक बडबड.
साहेब मध्य प्रदेशातील खांडव्याचे आहेत, कुटुंब तेथेच असते, सुट्टी पडली की गावी जायचे आणि एखादी दांडी मारून परत कार्यालयात परतायचे. यांची वाट पाहणारे लोक कार्यालयात ‘खांडवा मेल आ गयी क्या?’ असे विचारतात. साहेब सतत कॅलेंडरकडे पाहत घरी परतायचं नियोजन करताना दिसतात.
साइटपर्यंतचा प्रवास ७० ते ७५ किलोमीटर म्हणजे जवळपास दोन-अडीच तासांचा आहे. रस्त्याने आजूबाजूला विनापेरीव, पण काळी कसदार जमीन, छोटी छोटी गावे, अत्यंत तुरळक दिसणारी शेतातील वस्ती, कृष व रोड दुभत्या जनावरांचे जथ्थे, कोरडे पडलेले प्रकल्पाचे पाट दिसतात. दिवाळीनंतरचे दिवस असल्याने काही मोजक्याच ठिकाणी गहू, हरभऱ्याची शेती दिसते.
एका गावात पोहोचताच ड्रायव्हरने पान टपरी जवळ गाडी थांबवली. साहेबांचे पान दिले, स्वतःचे पण खाल्ले, परत प्रवास सुरू. गाडी थांबली की पांढरे रुमाल डोक्याला बांधलेले रिकामे गावकरी उगीच गाडीभोवती फिरतात. साइटवर पोहोचेपर्यंत असे पानासाठी आणखीन दोन वेळा थांबे झाले. जुन्या सरकारी गाडीचे धक्के व रस्त्याची धूळ खाऊन चांगलाच ताण आला. शेवटी प्रकल्पाच्या गावात गाडी पोहोचली.
नेहमीच्या वळणाचे गाव आणि गावाच्या कोपऱ्यावर कॉलनी. त्यात एकाबाजूला कार्यालय, त्यासमोर जुने ट्रक, जीप, टँकर रोलर अशी महाराष्ट्र शासन लिहिलेली वाहने लावलेली. कॉलनीमध्ये आखीव पत्र्याची घरे, मोठे रस्ते पण उखडलेले, रिकाम्या जागेवर थोडेफार गवत वाढलेले त्यावर शेळ्या, गाई चरत आहेत.
कार्यालयात दुपारी एक दोनच माणसं, चौकशी करता कोणीच अधिकारी तेथे नाहीत आणि गाडीतल्या चर्चेनुसार अपेक्षितही नव्हते. बाहेरच्या एका माणसाकडे ड्रायव्हरने क्वार्टर राहण्यासाठी खाली आहे का, अशी चौकशी केली. त्याने रिकाम्या आहेत, पण इतर साहेब लोकांच्या नावावर आहेत असे सांगितले.
इथून पुढे चार-पाच मैलावर प्रकल्प. जीप कच्च्या रस्त्याने पुढे निघाली शेवटी तो प्रकल्प दिसायला लागला. जवळ गेल्यावर एका बाजूला पत्र्याचे शेडने तयार केलेल्या टेम्पररी क्वॉर्टर्स, काही मोठी गोडाउन तर एका टोकाला उंचावर उभारलेली आयबीची इमारत. प्रकल्पाच्या भिंतीजवळच कॅनॉल शेजारी सेक्शन ऑफिस व जनरेटर रूमची एक पक्की इमारत.
रस्त्यालगत एक खोपडे वजा हॉटेल, या हॉटेलसमोर गाडी थांबली. हॉटेलच्या बाहेर रेंगाळणाऱ्या दोन-चार लोकांनी साहेबांना रामराम केला. ड्रायव्हर उतरून आत खोपटात गेला, चांगलीच घसट असावी असा तो हॉटेलवाल्याशी बोलू लागला. त्याने तिथूनच साहेबांना गरम खारा आहे, आणू का म्हणून विचारले.
साहेबांनी घेऊन यायची खूण केली. टोपी, विजारवाला हॉटेलचालक पेपरच्या तुकड्यावर चिवडा घेऊन आला. त्याने साहेबांना व मलाही दिला. धुळीने भरलेल्या हातानेच मीही साहेबांप्रमाणे तो खाल्ला. हात आणखी धूळ व तेलानी चिकट झाले. त्यावर माठातले पाणी पिलो आणि गाडी सेक्शनकडे निघाली.
सेक्शन ऑफिसमध्ये दोन लाकडी टेबल, खुर्च्या आणि एक आलमारी. समोर बसण्यासाठी स्टील बारपासून तयार केलेले बाकडे. एका खुर्चीवर बाबू काही तरी लिहीत बसलेला. गाडी आल्यावर तो धडपडत बाहेर आला. त्याने साहेबांना नमस्कार केला, कदाचित त्याला कमी ऐकू येत असावे, तो बोलताना खूप मोठ्याने बोलत होता आणि काही विचारलं तर तेच बोलून खात्री करत होता.
‘‘लोकं आहेत का?’’
‘‘लोकं का? आहेत ना, आहेत ना’’
‘‘आज काम बंद आहे का?’’
‘‘काम का? सुरू आहे ना, आता दुपारनंतर येणार ना लोकं.’’
हळूहळू लोकं यायला लागले. साहेबांनी दिवाळीनंतर या लोकांचे काही अरियर्सचे पेमेंट आणले आहे. लोक येतील तसे त्यांचे पेमेंट करणे चालू झाले. एकंदरीत चाळीस लोक सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. एक एक जण नावाने बोलल्यावर पुढे येऊन त्याची रक्कम स्वीकारताना मला त्यांची नावे व पदे कळायला लागली. एक दोघांनी रामराम पण घातला. नवीन साहेब आल्याची चर्चा सुरू झाली.
साहेबांनी एका माणसाचे नाव घेतले,
‘‘दासस्वामी मुल्लकपल्ली.’’
एक ठेंगणा, जाड, अपऱ्या नाकाचा, काळा माणूस पुढे आला.
‘‘मेरा नाम मुल्लकपल्ली नही, मुलकलपल्ली है.’’
‘‘मुल्लक हो या मुलक्कल हो, कोइ तो फल्ली ही है ना?’’
‘‘फल्ली नाही पल्ली, पल्ली.’’
‘‘हा ठीक है.’’
साहेबांनी माघार घेतली.
तो पगार घेऊन माझ्याकडे आला.
‘‘न्यू अपॉइंटमेंट?’’
‘‘चक्क इंग्रजीमध्ये?’’ मी उत्तरलो.
‘‘होय.’’
तो पुढेच बसला.
लोक बरेच वयस्कर होते, सगळ्यांच्या तोंडाला विड्यांचा उग्र वास येत होता. काही अत्यंत आजारी, थकलेले तर काही हाताच्या बोटांवर मोजता येतील असे तरुण व तुकतुकीत, काहीतरी काम करू शकतील असे वाटणारे. लोकांच्या मध्ये शेळके, पाटील, अहिर, चाऊस, अहमद, ढवळे ही मंडळी जरा तरुण व बऱ्यापैकी तजेलदार वाटतात.
अहमद तर एकदम लुकडा पण त्याचा चेहरा मात्र इजाजतमधल्या नसीरसारखा. धारदार नाक आणि कुरळे केस. त्याने पैसे घेतले. जरासा बाजूला होताच कोणी एका त्रयस्थ व्यक्तीने त्याचे पैसे सर्वांच्या देखत हिसकावून घेतले आणि तो चालता झाला. मी तर पुरता हबकलो. लोकांनी हा साइटवरील सावकार असल्याचे सांगितले.
नंतर जोरदार एन्ट्री केली एका वयस्कर व पूर्ण पांढरे कपडे घातलेल्या गृहस्थाने. याचे नाव केणेकर, वाहन चालक. आत येताच तोंडातल्या विडीचा एक मस्त कश मारून त्याने धूर दारातून बाहेर सोडला व वेडी फेकून तो साहेबापुढे उभा राहिला. साहेबांनी त्याची बरीच फिरकी घेतली.
‘‘कितने साल गुजरे हाथ मे स्टेयरिंग लिए?’’
‘‘बाप्पा, लायसन्स रिन्यूअल के टाइम भी गाडी चलानी नही पडी.’’
‘‘देखो कैसे कैसे नमुने मिलेंगे यहाँ आपको.’’
साहेबांनी माझ्याकडे बघून म्हटले.
पण हा बिनधास्त माणूस पुरता नागडा होता. तसाच खलनायकासारखा रशीद पुढे आला, उंचापुरा, धारदार नाक, भेदक डोळे, अत्यंत बेदरकार चेहरा. बनगरवाडीतल्या बालट्याची धूसर झालेली प्रतिमा रशीदला पाहताच लख्खकन उजळ झाली.
नंतर बेलेकरने पगार घेतला पण सही करताना त्याने तारीख टाकली. साहेबांनी त्याला ठोकले. हाताची पाची बोटे एक करून तो साहेबांची वाद घालायला लागला. एका कसलेल्या वकीलासारखा त्याने युक्तिवाद केला. दिवाळीत मिळायला पाहिजे ते अरियर्सचे उशिरा मिळाल्याबद्दल त्याचा राग होता.
पुढे आतकुलवार आला. लांब, पांढरे, मानेपर्यंत रूळणारे केस, बाकदार नाक, रुंद व खानदानी चेहरा आणि अस्खलित नागपुरी हिंदी संवाद. वृद्धत्व व व्यसनाने संपूर्ण शरीर मात्र संपूर्ण थकलेले. ‘‘तेरेको भी दिपावाली मे ब्रँडेड नही मिली होगी, इसलिये देसी पीनी पडी होगी. बास तो वैसी ही आ रही है.’’
साहेबांचा टोला बेलेकरला होता.
‘‘क्या करेंगे, सर, पी पी के खून, पसीना, श्वास सभी से बास निकलती है. देहावसान हो गया तो कोई घासलेट डालने की जरूरत नही है, सिर्फ बत्ती से अग्नी दो, खुद के खुद जल जायेंगे.’’
‘‘अभी निकल पड जल्दीसे, नही तो मैं भी नागिन जैसा डोलने लग जाऊंगा, साला पिलांटु.’’
साहेबांनी त्याला हाकलून दिले.
या सगळ्या गोंधळात दासने मला खुणावले. मी बाहेर आलो, तो मला घेऊन वर धरणाच्या भिंतीवर आला. चालत येताना दासने स्वतःची अल्प ओळख सांगितली. तो ड्रायव्हर आहे, प्रकल्पावरच कुटुंबासह राहतो आणि ३० वर्षे विविध प्रकल्पांवर त्याने काम केले आहे. अत्यल्प शिक्षण असूनही तो अतिशय हुशार असल्याचे जाणवते.
ब्रिजवर आल्यानंतर धरणाची मोठी द्वारे व उच्चालक व्यवस्था पहिल्यांदाच जवळून पाहिली. त्यांची भव्यता आश्चर्यचकित करणारी. दासने द्वारांच्या भागांची नावे सांगायला सुरुवात केली, त्याचे इंग्रजी उच्चार स्पष्ट व उत्तम आहेत. त्याने एका भागाचे नाव एन्ड आर्म असे सांगितले, पण साइटचे लोक याला एंडाराम म्हणतात, ही गंमत सांगितली.
पुढे जाऊन कर्मचाऱ्यांच्या मधील सर्वांत वरिष्ठ गायकवाड फोरमनला त्याच्या वयोमानानुसार काहीही काम होत नसल्यामुळे लोक याला एंडाराम म्हणतात ही माहिती दिली. मी दासला त्याच्या हुशारीबद्दल दाद दिली तर त्याने खुश होऊन सिगारेटच्या पाकिटामधून एक सिगारेट काढून शिलगावली, मलाही ऑफर केली पण मी नकार दिला. पुढे तो म्हणाला,
‘‘वैसे तो मैं बचपन से बहुत हुषार हूं.’’
मी खाली आलो, अरियर्सचे वाटप संपले होते. साहेबांनी माझी तात्पुरती सोय लावण्यास लोकांना सांगितले व त्यांनी निरोप घेतला. मला काय काम करायचे, टार्गेट काय आहे या विषयी काही कल्पना न देता ते निघाले. तात्पुरती सोय आयबीवर होईल असे दासने सांगितले. पण आयबीचा वॉचमन संध्याकाळी येतो आणि नेहमीच येतो असे ही नाही. तो आला नाही तर कोणा संट्या माणसाकडे मुक्काम होणार आहे.
बेलेकर एकटाच राहतो पण त्याच्याकडे थांबणे कठीण आहे. पण आता नाइलाज आहे. आता आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी तयारी केली. संध्याकाळपर्यंत वेळ घालवायचा होता, दास घरी चला म्हणाला पण मी नाही म्हणालो. मग गजाननच्या खोपटासमोर बाजल्यावर बसून राहिलो. दिवस सरत आला आणि सुदैवाने वॉचमन आला.
बरेच आढेओढे घेऊन त्याने सूट उघडून दिला. फक्त पाणी उपलब्ध नसल्याने प्राथमिक विधी आणि अंघोळीसाठी बाहेर जावे लागेल असे त्याने बजावले. माझी हरकत नव्हती. रात्री गजानन जेवणाचा डबा घेऊन येतो म्हणाला.
बेडवर पडलो आणि खूप एकटे वाटायला लागले, निराशेचे मळभ दाटून आले आणि डोळ्यांतून पाणी वाहायला लागले. वाटले साहेब म्हणतात तसे परत जावे, कोठेतरी प्रायव्हेट नोकरी पाहावी, इतक्या दूर, संपर्क होण्यासही कठीण जागी राहू नये. पण आरती प्रभूंची कविता आठवली,
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा
मग सावरलो, सेक्शनमध्ये भेटलेले लोक आठवायला लागले. यामध्ये तात्यांच्या माणदेशी माणसांसारखी गरीब, कामसू भेटतील, त्यांच्याशी स्नेह जुळेल, काही शंकर पाटलांची इब्लिस व बेरकी भेटतील तर काही दमांची मिश्किल, खोडकर भेटतील. ते हसले तर हसू आणि रुसले तर मुक राहू. असेच सूर जुळतील व सगळेच म्हणतील,
नभ नाचेल आम्ही करिताच इशारा
पसरूनी इंद्रधनुचा दिव्य पसारा
यापेक्षा आयुष्यात आणखी काही वेगळे हवं आहे. हेच ‘सारे प्रवासी घडीचे’ पुढे जाऊन स्मरणात खोल रुतून बसतील.
९४२१२९९७७९
(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.