Rural Story : बाभूळकाटा

Sameer Gaikwad : गोविंदने एकाएकी चुलता आणि भाऊ एका फटक्यात खलास केल्याचा विमलबाईंना धक्का बसला. आपला पोरगा इतका टोकाला कसा गेला, हे कोडं त्यांना छळू लागलं.
Rural Story
Rural StoryAgrowon
Published on
Updated on

एका रणरणत्या दुपारी सुनीताने कानूबाबापाशी वाढेगावात मस्क्यांच्या घरी निरोप पाठवला, की कस्तुराला शक्य तितक्या लवकर माहेरी पाठवून देण्याची तजवीज करा. आपली आई विमलबाई हिला न विचारता सुनीताने हा कारभार केला होता.

आठवड्याने कानूबाबा सहज विमलच्या घरी आला तेव्हा गप्पांच्या ओघात त्यानं सुनीताने दिलेल्या सांगाव्याचा उल्लेख करताच विमल चाट पडली. आपल्याला न विचारता इतका मोठा निर्णय आपल्या लेकीने का घेतला असावा या विचाराच्या भुंग्यानं तिचं मस्तक पोखरून काढलं.

रानात खुरपणीला गेलेली सुनीता माघारी येऊपर्यंतही तिला दम निघाला नाही. कानूबाबा घरातून बाहेर पडताच, पायताणं पायात सरकावून धाडदिशी दारं आपटून ताडताड ढांगा टाकत ती रानाकडे निघाली. वाटेनं तिच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. सात आठ वर्षांपूर्वीचा तो दिवस तिला अजूनही टक्क आठवत होता, ज्या दिवशी गोविंदनं आपल्याच माणसांच्या रक्तानं कुऱ्हाडीचं पातं माखवलं होतं.

त्या दिवशी आक्रित घडलं होतं. सकाळ उजाडताच जो तो आपल्या कामाला लागला होता. तरणाबांड गोविंद झपाझप पावलं टाकीत रानाकडे निघाला होता. त्याच्या कपाळावरची नस तडतड उडत होती. कानशिलं तापली होती. डोळ्यांतनं लालबुंद अंगार बाहेर पडत होता. लोहाराचा भाता आतबाहेर व्हावा तसा त्याचा छातीचा पिंजरा वरखाली होत होता.

मुठी गच्च आवळल्या होत्या. झेंडू फुटावा तसा रसरसून निघाला होता तो. केव्हा एकदा रानात जातो आणि आपली रक्ताची तहान भागवतो, असं त्याला झालं होतं. वाटेत गोरखचं शेत लागलं. नेहमी दोन शब्द बोलून जाणारा गोविंद कसल्या तरी तंद्रीत पुढं जातोय, त्याच्या हातात कुऱ्हाड आहे आणि डोळ्यात लाव्हा आहे हे पाहून गोरखला कसंसंच वाटलं.

Rural Story
Rural Story : बदलत्या ग्रामीण महाराष्ट्राची फेरी

त्यानं गोविंदला हाळी देऊन पहिली पण ऐकून न ऐकल्यासारखं करत गोविंद वेगाने पुढे निघून आला. चिंचेचा माळ ओलांडला. गंगाधर तात्यांनी त्याला आवाज दिला, तर त्यानं नुसते हातवारे करून जाऊन येतोची खूण केली. गालांड्याच्या वस्तीजवळची कुत्री रोज त्याच्या पायापाशी घुटमळत कारण घरून रानाकडे येताना तो कुत्र्यांसाठी भाकर आणायचाच.

आतादेखील काही कुत्री आणि त्यांची पिलं त्याच्या वासानं वाटंवर कडेला उभी राहिली. तो जवळ येताच लाडानं त्याच्या पायात शिरली. रोज त्यांना कुरवाळणाऱ्या गोविंदनं आधी हाडहूड केलं, पण कुत्री गेली नाहीत.

त्यांच्यामुळे पावलं अडखळू लागल्यावर मात्र तो वैतागला. लेकुरवाळी असलेल्या पांढऱ्या कुत्रीच्या पेकाटात त्यानं जोरात लाथ घातली. त्या सरशी ती कुत्री उडून पडली. जोरानं विव्हळू लागली. तिच्या आवाजानं सगळीच कुत्री विव्हळू लागली. एकाएकी कुत्र्यांचा गलका वाढल्यानं कालिंदीकाकू बाहेर आली आणि गोविंदनं कुत्र्यांना हिडीसफिडीस केल्याचं पाहून ती चकित झाली. ‘आवं भावजी, गोविंद भावजी’ अशा हाका मारेपर्यंत गोविंद तिच्या नजरेच्या टप्प्यातून पुढे गेला होता.

आणखी एक मैलभर चालून गेल्यावर साळुंख्यांच्या बांधावर पोहोचताच गोविंदला आपलं शेत दिसू लागलं. काळ्या मऊशार मातीत दोन ठिपके दिसत होते. दामूअण्णा आणि त्यांचा पोरगा नाथा कुसळे. गोविंदनं कुऱ्हाडीच्या दांड्यावरची पकड घट्ट केली आणि आधी वस्तीची मागची बाजू गाठली. तिथून नाथाला आवाज दिला. चकित झालेला नाथा मागच्या बाजूला आला. क्षणाचाही विलंब न लावता गोविंदने त्याचं मुंडकं धडावेगळं केलं.

रक्ताची कारंजी त्याच्या अंगावर उडाली. झटापटीच्या आवाजानं दामूअण्णा थोडा बावरला, भास झाला असावा समजून तो पुन्हा दंडात उतरला. हातातला टिकाव बाजूला सारून दारं धरू लागला. मध्येच त्यानं नाथाला हाळी दिली. पलीकडून काहीच आवाज आला नाही. सावधपणे पावलांचा आवाज न करता आलेल्या गोविंदने दामूअण्णाच्या पाठीत सपासप कुऱ्हाडीचे घाव घातले. लाकडाची ढलपी फोडून काढावी तसं त्यानं दामूअण्णाची खांडोळी केली. दामूअण्णांच्या किंकाळ्यांनी आसमंत थरारून गेला.

दामूअण्णा कुसळे हे गोविंदचे चुलते. नाथा त्याचा सख्खा चुलत भाऊ. गोविंदचे वडील रामनाथ आणि दामूअण्णा यांची सामायिक जमीन होती. त्याचे बरेच वाद होते. त्यावरून त्यांची अनेक वेळा भांडणं होत. रामनाथांचा कल पडतं घेण्याकडे असल्याने ते थोरले असूनदेखील दामूच्या तोंडाला कधी लागत नसत. दामूअण्णा जसा बेरकी, कपटी, स्वार्थी होता तसाच त्याचा पोरगा नाथा हा देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकून होता. विमलकाकू, सुनीता, गोविंद, कस्तुरा या कुणाचीही कुचेष्टा करताना तो वयाचा विचार करत नसे. गोविंदचे हात शिवशिवत पण आपल्या वडिलांची शिकवण आठवून तो गप्प राही.

सहा महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटक्याने रामनाथांचा मृत्यू झाला. आपल्या सोशिक, स्वाभिमानी आणि हळव्या स्वभावाच्या बापाचं एकाएकी जाणं गोविंद आणि सुनीताला हेलावून गेलं. विमलबाईवर मोठा आघात झाला. सासरा वारल्याच्या दिवसापासून सुनीताचा नवरा जयवंत हा आपल्या मेव्हण्याला धीर देण्यासाठी वारंवार येऊ लागला. सुनीताला हायसं वाटलं. त्याचं वागणं बघून विमलबाईंना वाटलं की आपल्याला एक नसून दोन पोरं आहेत.

गोविंदने एकाएकी चुलता आणि भाऊ एका फटक्यात खलास केल्याचा विमलबाईंना धक्का बसला. आपला पोरगा इतका टोकाला कसा गेला, हे कोडं त्यांना छळू लागलं. गोविंदने एक अवाक्षरदेखील काढलं नाही. खटला उभा राहिला. अत्यंत थंड डोक्याने खून केल्याबद्दल गोविंदला वीस वर्षांची सजा लागली. गोविंद जेलमध्ये गेल्यावर विमलबाईने भावकी सूड घेईल म्हणून कस्तुराला तिच्या लेकरांसह माहेरी पाठवून दिलं. अशा वेळी विमलबाईला धीर देण्यासाठी म्हणून सुनीता आणि जयवंत त्यांच्यापाशी येऊन राहिले. काही दिवसासाठी म्हणून आलेल्या जयवंताने तिथं कायमचंच बस्तान मांडलं. अर्थात, विमलबाईंना त्याची मदतच झाली.

Rural Story
Rural Story : गावाकडची नातीगोती विसरता येत नाहीत!

नवरा जेलमध्ये गेल्याने कस्तुराची अवस्था वाईट झाली. माहेरी भावजयांची बोलणी खात जगण्याची पाळी आली. विमलबाई घरातून बाहेर पडायच्या बंद झाल्या. गावानं गोविंदच्या नावानं छिथू केल्यानं त्या पार कोलमडून पडल्या. शिवाय भावकीने संबंध तोडले. त्या अगदी एकाकी पडल्या. शेत काही महिने तसंच पडून राहिलं. नंतर जयवंतनंच तिथं नांगरटीची कामं सुरू केली. हळूहळू त्यानं रामनाथाच्या हिश्‍शाची जेवढी जमीन होती ती कसायला सुरुवात केली.

दोन सालगडी ठेवले आणि तो फक्त त्यांच्यावर नजर ठेवू लागला. वीस एकरांचं रान होतं. पाटपाणी मुबलक होतं. पिकं जोमानं आली, उसाचा फड दाटीवाटीनं गच्च फुलून आला, गव्हाच्या लोंब्यांनी बाळसं धरलं. वर्षामागून वर्षे गेली आणि जयवंतच्या खिशात पैसा खेळू लागला.

त्या सुखातून त्याचं बाहेरख्याली होणं सुनीताला जाणवू लागलं. एका सांजंला तिने त्याचा पाठलाग केला. म्हसोबाओढ्याच्या पलीकडं पारूबाईच्या घरात शिरलेल्या जयवंताचं बोलणं तिनं कान लावून ऐकलं. तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. ती घाईने घरी निघून आली. सकाळ होताच तिने कानूबाबाला गाठलं. कस्तुराला ताबडतोब सासरी येण्याचा सांगावा त्यांच्यासोबत धाडला.

आपल्या लेकीने इतका मोठा निर्णय आपल्या परस्पर का घेतला याचं कोडं पडलेली विमल हातघाईने वस्तीवर आली. तिला पाहून सुनीताने तिच्या कुशीत धाव घेतली. ती हमसून हमसून रडू लागली. मनात कोणताही किंतु न ठेवता सगळी कहाणी तिने आईपाशी कथन केली. ती ऐकून विमलबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या.

दोनेक दिवसांत आपली पोरं घेऊन कस्तुरा सासरी परतली आणि ती येण्याच्या एक प्रहर आधी सुनीता आपल्या सासरी निघून गेली. कस्तुराला काही दिवस चुकल्याचुकल्यासारखं वाटलं, पण नंतर ती रुळून गेली. आताशा रात्र झाली की विमलला आपला नवरा आणि पोरगा डोळ्यापुढे दिसू लागतो. तिच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात. त्याच वेळी संतापाने तिच्या मुठीही आवळतात.

पण आपल्या मुलीच्या सौभाग्यापायी ती जयवंताला तळतळाट देऊ शकत नाही. झालं असं होतं की रामनाथ मरण पावल्यानंतर जयवंतानेच गोविंदच्या डोक्यात राख घातली होती, सूडाग्नी पेटवला होता. त्यानं गोविंदला भरीस पाडलं आणि नंतर जमिनीवर डोळा ठेवून शहाजोगपणाचा आव आणत तो तिथं येऊन राहिला होता.

त्याचा सगळा डाव कळाल्यावर सुनीता उन्मळून पडली होती. त्यामुळेच तिने कस्तुराला तडकाफडकी परत बोलवलं होतं. आपण भिकेला लागलो तरी चालेल पण ज्याचा त्याचा शेर ज्याला त्याला देण्यासाठी हा तिढा सोडवणं हे तिच्यासाठी अग्निपरीक्षेहून कमी नव्हतं. हा जीवेघेणा तिढा सोडवताना काळजातला बाभूळकाटा खोल रुतून होता. डोळ्यातलं पाणी लपवत ओठावर कृत्रिम हसू आणून ती सासरी निघून गेली, कायमचीच!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com