
Jalgaon News: खानदेशात या आठवड्यातही काही भागांत पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस फारसा नसताना अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची मुदत संपेल या भीतीने उडीद, मुगाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. उडीद, मूग पेरणी २० जूनपूर्वी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
२० जूननंतर उडीद, मूग पेरल्यास फारसे उत्पादन येत नाही, असे अनेक शेतकरी मानतात. यामुळे खानदेशात या आठवड्यात उडीद, मूग पेरणीला गती आल्याची स्थिती आहे. मागील आठ ते १० दिवसांत पाऊस झाला आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस अनेक भागांत नाही. कुठेही एका दिवसात ३५ ते ४० मिलिमीटर पाऊस झालेला नाही.
यात अनेक भागांत वादळी पाऊस येतच आहे. यात केळीची अधिक हानी होत आहे. काही भागात रोज हलका ते मध्यम पाऊस येत आहे. कोरडवाहू क्षेत्रांत पेरणीयोग्य पाऊस नसल्याने सोयाबीन, कोरडवाहू कापूस लागवड सुरू झालेली नाही. परंतु शेतकरी आता जोखीम घेऊन उडीद, मूग पेरणी करीत आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्यांची टक्केवारी वाढलेली नाही.
बेवडसाठी कडधान्य पेरणी
अनेक शेतकरी उडीद, मूग पेरणी केळीच्या बेवडसाठी करीत आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये केळी लागवडीचे अनेकांचे नियोजन आहे. जमीन सुपीकता व केळीला पुढे लाभ व्हावा यासाठी शेतकरी उडीद, मूग पेरणी करीत आहेत. ही पेरणी तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रात अधिक होत आहे. उडीद, मूग पेरणीस उशीर झाल्यास पुढे उशिराने कापणी, मळणी होईल.
यामुळे केळी लागवडीसही विलंब होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उडीद, मूग पेरणीस या आठवड्यात जळगावातील चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर आदी भागांत गती आली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार हजार हेक्टरवर उडीद पेरणी झाल्याचा अंदाज आहे. तर मुगाची पेरणी मात्र यापेक्षा कमी आहे. धुळ्यातही सुमारे दोन हजार हेक्टरवर उडीद पेरणी झाल्याची माहिती आहे.
२५ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण
खानदेशात कोरडवाहू पिकांची पेरणी कमी आहे. परंतु पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे. खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिके राहणार आहेत. यात सुमारे साडेसात ते पावणेआठ लाख हेक्टरवर कापूस पीक राहील. यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक लागवड झाली आहे. तसेच उडीद, मूग, तूर लागवडही होत आहे. पूर्वहंगामी तूर लागवडदेखील पूर्ण झाली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता खानदेशात सुमारे २४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. पेरण्यांना या आठवड्यात चांगली गती येईल, असे दिसत आहे.
पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण
खानदेशात यंदा पूर्वहंगामी कापूस लागवडदेखील उशिराने सुरू झाली. ही लागवड १२ जूनपर्यंत अनेक भागात सुरूच होती. आता ही लागवडदेखील आटोपली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. तर धुळे, नंदुरबारमध्ये मिळून सुमारे ५५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. कोरडवाहू कापूस पीक लागवड फारशी सुरू नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.