Satara News : जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टसर रेशीम शेती नावीन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरण करायचे नाही, पाण्याची आवश्यकता नाही, औषध फवारणी नाही त्यामुळे सह्याद्रीपर्वत रांगांमधील शेतकऱ्यांसाठी टरस (वन्य) रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरे (ता. महाबळेश्वर) येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.
मुनावळ्यात जल पर्यटन
मुनावळे (ता. जावळी) येथे कोयना जलाशय (शिवसागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती.
त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबींचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे,’’ अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.