Food Processing : अवीट गोडीच्या आंब्यातून उलाढाल

Food Production : आमचूर हा प्रक्रिया पदार्थ आहे. यात आंब्यातील पांढरा शुभ्र गर काढून तो वाळविला जातो. शुभ्रता, लालसर, गडद लालसर आदी त्याचे प्रकार आहेत.
Mango
Mango Agrowon

Fruit Processing : सातपुडा पर्वतात आम्रवृक्षही किंवा आंब्याच्या वाड्या आहेत. वन क्षेत्रातही पारंपरिक आम्रवृक्ष जतन केलेले आहेत. खट्टू, गोलू, खाटा, आकाराने लहान व मोठे, लांब व आखूड देठाचे अशी गावरान आंब्यांची विविधता पाहण्यास मिळते. चवीला हे आंबे अत्यंत गोड, स्वादिष्ट असतात. लोणच्याच्या कैऱ्यांसाठी देखील या आंब्यांची मोठी मागणी असते.

आमचूरचा मोठा व्यवसाय धडगाव, अक्कलकुवा व अक्राणी भागांत आहे. त्यातून दरवर्षी १० कोटींची उलाढाल होत असावी असा कयास आहे. मागील दोन वर्षे आमचूरला २०० रुपये प्रति किलोचा दर मिळतो आहे. मागील वर्षी अधिक शुभ्र आमचूरला कमाल २५० रुपये दर मिळाला होता.

...असा आहे आमचूर व्‍यवसाय

आमचूर हा प्रक्रिया पदार्थ आहे. यात आंब्यातील पांढरा शुभ्र गर काढून तो वाळविला जातो. शुभ्रता, लालसर, गडद लालसर आदी त्याचे प्रकार आहेत. कैरीची साल वाळवून तिचीही विक्री केली जाते. तसेच आंबा कोय किंवा बीजासही बाजारपेठे आहे. धडगाव, काकडदा (ता. अक्राणी), मोलगी (ता. अक्कलकुवा), अक्कलकुवा येथे आमचूरचे खरेदीदार आहेत.

ही मंडळी आमचूरची पाठवणूक दिल्ली, मध्य प्रदेशात करते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यास अधिक मागणी असते. कैऱ्या व आंब्यांना शहादा, तळोदा, सातपुडा भागात मागणी असते. ‘बायफ’ संस्थेने वाडी प्रकल्पातून केसर आंब्यांची लागवड या भागात केली आहे. कैऱ्यांना ४० रुपये प्रति किलोचा दर मागील तीन वर्षे मिळाला आहे.

Mango
Mango Market : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून १४ हजार हापूस पेट्या वाशीत

तर गावरान आंब्याला प्रति किलो १०० रुपये दर मिळतो आहे. सातपुड्यातील महिला वर्ग आमचूर निर्मिती व्यवसायात व्यस्त आहे. एका पाड्यातील सात ते आठ बचत गट आमचूर व आंब्याविषयक अन्य प्रक्रिया उद्योगात कार्यरत आहेत.

चार शेतकरी उत्पादक कंपन्या धडगाव, अक्लकुवा व अक्राणी भागात कार्यरत आहेत. काकडदा, मोलगी, नर्मदा काठावरील केसर, गावरान आंब्यांना मोठी मागणी आहे. याच भागात लोणच्याच्या कैऱ्याही अधिक उपलब्ध होतात. सातपुड्यातील केसर आंब्याने आपली विशेष ओळख तयार केली असून नावावर त्याला उठाव आहे.

सीताफळातून आर्थिक स्रोत

आमचूर, आंबे याचबरोबर सातपुड्यात सीताफळांच्या विक्रीतून बऱ्यापैकी उलाढाल होते. या फळाची लागवड सातपुड्यात तशी कमी आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे काही प्रमाणात तरी झाडे आहेत. वन क्षेत्रातही ही झाडे पाहण्यास मिळतात. स्थानिक कुटुंबातील मुले व महिला त्यांच्या विक्रीत कार्यरत आहेत.

सीताफळाची झाडे परिसरातील मंडळी हंगाम येण्यापूर्वीच राखण्यास सुरुवात करते. जे ही झाडे राखतात, तेच फळे तोडतात व विक्री करतात. झाडे राखण्यावरून कुठलेही वाद होत नाहीत. नर्मदा काठावरील सीताफळ गोड असते.

भूषा, बादल, माळ, गेंदा, ओंद्या रोषमाळ, तिनसमाळ, भगदरी, दाब या भागांमधील सीताफळे आकाराने मोठी व गोड असतात. अक्राणीमधील मांडवी, काकडदा या भागांतही या फळाचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. त्यांची विक्री धडगाव, काकडदा, मोलगी, शहादा आदी भागांत मुख्य रस्त्यांलगत केली जाते.

Mango
Desi Mango : गावरान आंब्याची गोडी वाढणार

अवीट गोडीची फळे

टोपली हे प्रमाण सीताफळ विक्रीसाठी या भागात मानले जाते. स्थानिक विक्रेते गुजरातमधील सुरत, बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर, जळगावातील अमळनेर, चोपडा येथे सीताफळांची पाठवणूक करतात. सुरुवातीला ५० व हंगामाच्या अखेरीस २५ रुपये प्रति किलोपर्यंतचा दर सीताफळास गेले दोन हंगाम मिळाला आहे.

मोठी बी असलेल्या सीताफळांना मागणी अधिक असते. ती अधिक अवीट गोडीची असतात. पावसाळा अधिक असल्यास उत्पादन चांगले येते. पहिल्या बहरातील सीताफळांची टिकवण क्षमता कमी असते. नंतरच्या बहरातील फळ टिकावू व दर्जेदार असते. या फळांची बाजारपेठ दोन कोटी रुपयांवर असावी असा अंदाज आहे.

बियांनाही मागणी

सीताफळाच्या बियांची देखील १० ते १५ रुपये प्रति किलो या दरात विक्री केली जाते. या बियांपासून तेल काढले जाते. त्याचा उपयोग काही विकारांवर गुणकारी म्हणून केला जातो. बैलांच्या शिंगातील तसेच पायांमधील किडी नष्ट करण्यासाठीही या तेलाचा उपयोग केला जातो.

आवळा व जांभूळ

जांभूळ व आवळ्याची झाडेही सातपुड्यात आढळतात. मात्र त्यांची संख्या मागील काळात झपाट्याने कमी झाली आहे. परंतु शेतकरी, जागरूक मंडळींनी या वृक्षांचे आपल्या शेतात, परिसरात संवर्धन केले आहे. गावरान आवळा या भागात असून, अक्कलकुवा भागात काही शेतकरी गट आवळ्यापासून आवळा कॅण्डी, मुरब्बा आदींची निर्मिती करून त्यांची किरकोळ विक्री करतात.

अक्कलकुवा भागात काहींनी हा व्यवसाय टिकवून धरला आहे. मांडवी (ता. अक्राणी) भागात आवळ्याची विक्रीही काही गट करतात. पण त्याचे प्रमाण कमी झाले आहे. सातपुड्यात जांभळाचीही गावोगावी झाडे आहेत. त्याची किरकोळ विक्री जूनपासून धडगाव, मोलगी, अक्कलकुवा भागात सुरू होते. झाडांची संख्या अल्प असल्याने जांभळावरील प्रक्रिया उद्योग मात्र या भागात अद्याप उभा राहू शकलेला नाही.

लालसिंग वळवी ९०२२२१८१२३ (शेतकरी)

बी. जी. महाजन ९७६७७१३३३२, डॉ. एच. एम. पाटील ९४०४८८१५४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com