Turmeric Market : हळद बाजार निर्णायक वळणावर

Market Update : मसाला महामंडळाचे एप्रिल-जून तिमाहीचे हळद निर्यातीचे आकडे यायचे आहेत आणि त्यात २-३ टक्के वाढ संभवते. परंतु स्थानिक मागणीदेखील सणासुदीच्या हंगामात बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon
Published on
Updated on

Turmeric Commodity Market : एप्रिल महिन्यात नवीन हंगाम सुरू झाल्यावर या स्तंभातून हळद या कमोडिटीबाबत विस्तृत चर्चा केली होती. खरे म्हणजे त्यापूर्वीच्या दोन लेखांमध्ये देखील हळद बाजारपेठे संदर्भात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचे आणि त्याचा तेजी-मंदी वर होणाऱ्या परिणामांचे अंदाज देखील वर्तविले होते. यामध्ये हळद २०,००० रुपये क्विंटलचा विक्रमी टप्पा गाठण्याबरोबरच त्यात येणारी मोठी करेक्शन याची आगाऊ माहिती दिल्याप्रमाणेच बाजाराचा कल राहिला होता.

एप्रिलमध्ये हळदीचा नवीन हंगाम सुरू होताना किमती विक्रमी पातळीपासून खाली आल्या होत्या. परंतु हंगाम सुरू होताना १७,००० ते १८,००० रुपये मिळत असतील तर हंगाम अर्धा संपण्याच्या वेळी हीच किंमत २४,००० रुपये आणि शेवटी कदाचित २७,००० ते २८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकेल, अशा प्रकारची चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली होती. अशी वेळ येते तेव्हा बाजारातील सर्व भागधारकांना सावध करणे गरजेचे असते. सोयाबीन १०,००० रुपयांवर गेल्यावर १२,००० रुपये जाणार म्हणून साठवणूक केल्याने आणि कापूस मागील वर्षाप्रमाणे परत १२,००० रुपयांपलीकडे जाईलच यावर आंधळा विश्‍वास ठेवल्यामुळे काय झाले ते अलीकडेच आपण पाहिले आहे. काही महिन्यात ६,५०० रुपयांवरून २०,००० रुपयांवर गेलेल्या हळदीबाबत देखील असेच होऊ नये यासाठी एप्रिलमध्ये हळद उत्पादक आणि स्टॉकिस्ट यांना सावध करण्यासाठी या स्तंभातून माहिती देण्यात आली होती.

त्या वेळी हळद २०,००० रुपयांचे शिखर परत एकदा गाठण्याची दाट शक्यता आहे असे म्हटले होते. आणि टेक्निकल चार्टस वरील हा मोठा अडथळा पार केल्यास हळद २२,४०० ते २३,८०० रुपयांच्या पुढील लक्ष्यासाठी तयार होईल असे म्हटले होते. अगदी तसेच होऊन मेमध्ये देखील २०,४०० रुपयांचा विक्रम करून तो टिकवून ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यानंतर किमती उत्तरोत्तर नरम होत गेल्या. हळदीच्या किमती आता १५,००० ते १६,००० रुपयांवर आल्या आहेत, म्हणजे जवळपास २०-२२ टक्के करेक्ट झाल्या आहेत.

परंतु मागील तीन महिन्यात परिस्थिती बदलत गेली. देशातील बहुतेक हळद उत्पादक पट्ट्यात पाऊस चांगला झाला आहे. लागवडीमध्ये मागील वर्षात झालेली ३० टक्के घट भरून काढून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि तमिळनाडू मध्ये सरासरी १० टक्के क्षेत्र वाढ झाल्याचे प्राथमिक अहवाल व्यापारी आणि उत्पादक यांच्याकडून मिळत आहेत. दुसरीकडे उपलब्ध स्टॉक मागणी पूर्ण करीत असला तरी जानेवारी मध्ये शिल्लक साठा खूपच कमी म्हणजे २०,०००-२५,००० टन राहील जो सरासरी पेक्षा ८० टक्के कमी राहील असे तेलंगणा येथील व्यापारी सूत्रांकडून बोलले जात आहे. मागील वर्षात हळद निर्यात सुमारे पाच टक्के घटली आहे. अशा परिस्थितीत नवीन हंगाम यायला सात महिने बाकी असल्याने या काळात बाजारकल कसा राहील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबईत दुसरी हळद परिषद भरणार आहे. कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्सने आयोजिलेल्या या परिषदेत इतर अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबरच स्थानिक हळद व्यापाराचे भविष्य, निर्यात आणि किंमत कल याबाबत ऊहापोह केला जाणार आहे.

Turmeric Market
Turmeric Market : नव्या हंगामात हळदीचे दर दबावात राहण्याची शक्यता

मसाला महामंडळाचे एप्रिल-जून तिमाहीचे हळद निर्यातीचे आकडे यायचे आहेत आणि त्यात २-३ टक्के वाढ संभवते. परंतु स्थानिक मागणीदेखील सणासुदीच्या हंगामात बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा अधिकाधिक टाइट होत जाणार आहे. हळद गेल्या दोन महिन्यांत छोट्या कक्षेत राहिली आहे. बाजारात लागवडीचे आकडे नरमाईला पूरक असले तरी पुढील काळातील मागणी-पुरवठा समीकरण आणि संपत जाणारे साठे माफक तेजीला अनुकूल आहेत. तसेच बांगला देशातील राजकीय उलथापालथीमुळे व्यापारात अल्प काळासाठी अडथळे झाले तरी वार्षिक तत्त्वावर व्यापार सुरळीत होईल. या पार्श्‍वभूमीवर हळद परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यादृष्टीने पुढील काळात किंमत २०,००० रुपयांच्या दिशेने जाईल, की १२,००० रुपयांवर येईल, हे ठरविण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. एक म्हणजे हवामान व पाऊस अंदाजाप्रमाणे शेवटपर्यंत चांगले राहिले तर मागील वर्षापेक्षा उत्पादन ७५-८० टक्के वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसाला मंडळाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षाचे उत्पादन १० लाख टनांच्या आसपास असले, तरी व्यापारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार ते सहा लाख टन पेक्षा जास्त नाही. या परिषदेत याबाबतची आणि पुढील वर्षाची नवीन अनुमाने सादर केली जातील. आणि पुढील काळातील बाजारकलाबाबत ताजे अहवाल तयार होतील.

Turmeric Market
Turmeric Farming : वेळेवर करा हळद पिकात भरणी

कमोडिटी अपडेट

काबुली चण्यात जोरदार तेजी मुळे देशी चणा तेजीत.

टांझानियामध्ये तूर निर्यात स्पॉट कमोडिटी एक्स्चेंजच्या माध्यमातून करण्याच्या सक्तीने व्यापारात विलंब होऊन भारतातील किमती स्थिर.

काबुली चण्यात आयात शुल्क कपात तर पिवळ्या वाटाण्यात शुल्कवाढीच्या मागणीला जोर.

अमेरिकी वायदे बाजारात सोयाबीन अखेर १० डॉलर/बुशेल खाली, सोयापेंड घसरण सुरूच.

कापसात मंदी चालूच; बांगलादेशातील वस्त्रोद्योगावर भारताचे लक्ष.

तेजीपूरक घटक

पुरवठ्यातील सध्या निर्माण झालेल्या छोटी छोटी पोकळी लक्षात घेता येथून किमती सुधारण्यास वाव आहे असे म्हटले जात असले तरी लागवडीचे आकडे माध्यमांमध्ये येऊ लागतील तसा किमतीवर दबाव पडू शकतो. निर्यातीचे एप्रिल-जूनचे आकडे लवकरच प्रसारित होतील. तेही चांगले राहतील आणि त्यातून किमतीला आधार मिळेल असे मानले जात आहे. तसेच शिल्लक साठे पाच वर्षांतील नीचांक गाठणार हे जवळपास नक्की आहे. तर वायदे बाजारात ऑगस्ट कॉँट्रॅक्ट समाप्ती पुढील आठवड्यात असल्याने किमतीत तात्पुरते पण मोठे चढ-उतार दिसून येतील.

या कॉँट्रॅक्ट समाप्तीच्या गडबडीत डिसेंबर महिन्याचे कॉँट्रॅक्ट १८,८००-१९,००० रुपयांच्या कक्षेत गेल्यास ते विकून टाकणे चांगले राहील. जरी एक ऑफ-सीझन-तेजीची लाट बाकी असली तरी ती केव्हा येईल आणि कुठपर्यंत जाईल ते सांगणे कठीण आहे. दिवाळी-पूर्व पाच-सहा आठवडे हा अधिक मागणीचा कालावधी असतो. त्यानंतर हळद साठे आटतील. ही परिस्थिती पाहता ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते डिसेंबर या कालावधीत मूलभूत घटकांच्या आधारावर तेजीला पूरक वातावरण राहील आणि २०,००० रुपयांची पातळी हंगामात तिसऱ्यांदा येऊ शकेल, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

मंदीपूरक घटक

परंतु हवामान चांगले राहून क्षेत्र सरासरी पेक्षा १०-१५ टक्के आणि मागील वर्षापेक्षा ४०-५० टक्के अधिक असल्याच्या बातम्या वारंवार येऊ लागल्या की किमती १२,००० रुपयांवर केव्हा येतील ते कळणारही नाही. जगातील एकूण उत्पादनात २० टक्के वाटा असणाऱ्या देशांत चांगल्या किमतीमुळे हळदीचे क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच एप्रिल-जून या तिमाही साठी आपले निर्यातीचे आकडे मसाला बोर्डाकडून प्रसारित होतील तेव्हा ते कसे राहतील हे पहावे लागतील.

किंमत वाढीमुळे निर्यात मंदावली तर त्यामुळे देखील हळदीच्या किमतीत नरमाई येऊ शकेल. या परिस्थितीत बाजारात तेजी-मंदी घटक समसमान असले, तरी त्याची शक्यता ४०:६० अशी आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे अनुभव पाहता सुवर्णमध्य कसा काढता येईल, हे परिस्थिती पाहून ठरवावे लागेल. वायदे बाजारात डिसेंबरच्या हळद कॉँट्रॅक्टवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्यामध्ये १८,०००-१८,२०० च्या पातळीवर आणि १८,८००-१९,४०० या कक्षेत हळद विकण्याची संधी आली तर त्याचा फायदा उठवणे योग्य राहील. अर्थात, या किमती आणि बाजारकल या गोष्टी मूलभूत संशोधनावर आधारित असून, गुंतवणुकीची शिफारस म्हणून त्याकडे पाहू नये हे नमूद करणे गरजेचे आहे.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com