Turmeric Cultivation : हळद लागवडीचे व्यवस्थापन

Turmeric Farming : हळद पिकाच्या लागवड आणि व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केलेल्या चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon

अंजली गहरवाल, धीरज वसुले, डॉ. एन. डी. पार्लावार

Turmeric Farming Management : मसाला पिकामध्ये कांदा, लसूण, हळद, आले ही पिके महत्त्वाची ठरतात. हे मसाला पदार्थ रोजचे दैनंदिन स्वयंपाक आणि आहारामध्येही नियमित घेतली जातात. त्यामुळेच या या पिकांना मोठी बाजारपेठ असून, उत्तम दरही मिळतात. हळद पिकाच्या लागवड आणि व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केलेल्या चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे.

जमिनीची निवड :

या पिकाकरिता पाण्याचा मध्यम ते उत्तम निचरा होणारी भुसभुशीत जमीन निवडावी. अत्यंत भारी, पाणी साचून ठेवणारी जमीन या पिकाच्या लागवडीस अयोग्य आहे. अशा जमिनीत हळदीची लागवड न करता ती जमीन पीक फेरपालटाखाली आणावी. त्या ठिकाणी द्विदलवर्गीय पिके घ्यावीत.

Turmeric Farming
Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

लागवडीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत :

बहुतांश शेतकऱ्यांनी आपले शेत उन्हाळ्यात जमिनीची आडवी, उभी नांगरणी करून ढेकळे फोडून तयार केलेले असेल. या शेतामध्ये वखरणीच्या वेळेस हेक्टरी ३० ते ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पुन्हा जमीन भुसभुशीत करून घ्यावी. मशागत केलेल्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आकाराचे सरी वरंबे किंवा गादीवाफे तयार करावेत. गादी वाफे पद्धतीने लागवड करावयाची असल्यास २० ते २५ सें.मी. उंचीचे, १२० सें.मी. रुंदीचे गादी वाफे तयार करावेत.

अधिक उत्पादन देणाऱ्या जाती

विदर्भात हळदीची सेलम, वायगाव या प्रचलित जात मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहे. फुले स्वरूपा, पीडीकेव्ही वायगाव, राजापुरी, कृष्णा या जातींची लागवडीसाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे.

Turmeric Farming
Turmeric Cultivation : रोपांद्वारे हळद लागवडीची वाढवा व्याप्ती

बेण्यांची निवड :

प्रति हेक्टरी लागवडीसाठी हळदीचे २२५० ते २५०० किलो गड्डे म्हणजेच प्रति हेक्टरी २३ ते २५ क्विंटल बेणे वापरणे आवश्यक आहे. लागवडीकरिता जेठे गोल गड्डेच वापरावेत. जेठे गोल गड्डे नसल्यास साधारणपणे ४० ते ४५ ग्रॅम वजनाचे अंगठे गड्डे वापरावेत. ३० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे गड्डे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवडीसाठी निरोगी बेण्यांची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये.

बीजप्रक्रिया :

लागवडीपूर्वी हळद बेण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ॲझोस्पायरियलिम १०० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू खत १०० ग्रॅम प्रति १० लि. पाणी मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून सावलीत थोडे सुकवावे. त्यानंतर लगेच म्हणजेच १ तासाच्या आत लागवड करावी.

हळद लागवड पद्धती : हळद लागवड दोन पद्धतीने करतात

पारंपरिक पद्धत म्हणजे सरी वरंबा पद्धत. या पद्धतीमध्ये ३० ते ४० सें.मी. अंतरावर वरंबे तयार करून ओळीत २२.५ ते ३० सें.मी. अंतर राखून जेठे गड्डे असलेल्या बेण्यांची ८ ते ९ सें.मी. खोलीवर टोकून लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास फक्त जेठे गोल गड्डेच वापरावेत. लागवड मे ते जून अखेरपर्यंत करता येते.

गादीवाफे पद्धत : ठिबक सिंचन पद्धतीने ओलित करावयाचे असल्यास या पद्धतीने लागवड करावी. यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते. या पद्धतीमध्ये प्रथम १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून त्यात २० ते २५ सें.मी. उंचीचे ६० ते ७५ सें.मी.चा माथा असलेला रुंद वरंबे किंवा गादी वाफे तयार करावेत. या सपाट गादी वाफ्यावर ३० सें.मी. अंतरावर दोन ओळींत झाडांमध्ये ३० सें.मी. अंतर राखत जेठे गड्डे किंवा बेणे वापरून बेण्यांची टोकून लागवड करावी. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे.

अंजली गहरवाल (सहायक प्राध्यापक), ९८३४९६८३२६

(वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com