
Washim News : विदर्भात हळद पिकाची सर्वाधिक लागवड वाशीम जिल्ह्यात गेल्या १० ते १२ वर्षांपासून होत आहे. तरीही या पिकाचा पीक पॅटर्नमध्ये समावेश नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी शासनाच्या विमा योजना आणि नैसर्गिक आपत्तीमधून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहत आहेत. शासनाने हळद उत्पादकांची निकड लक्षात घेत या पिकाला विम्याचे कवच द्यावे अशी मागणी पुन्हा एकदा हंगामाच्या तोंडावर शेतकरी करू लागले आहेत.
वाशीम जिल्हा हा पूर्वी सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जात होता. आता हळदीसाठीही जिल्ह्याची ओळख सर्वदूर तयार झाली. जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड होऊ लागलेली आहे. सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने सिंचनाची सोय असलेले बहुतांश शेतकरी हळदीच्या लागवडीकडे वळाले.
यावर्षी तर तुलनेने दीड ते दुप्पट लागवड होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात हळद पिकावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा भर असून अनेकांनी पारंपरिक पिकांऐवजी हळद लागवडीकडे वळत आपली अर्थिक घडी सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, शासनाच्या पीक पॅटर्न यादीत हळदीचा समावेश नसल्याने त्यांना पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवरील मदत, अनुदान व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही. हळद उत्पादनासाठी लागणारा खर्च, प्रक्रिया आणि काढणीच्या वेळेस हवामान बदलांचा होणारा परिणाम लक्षात घेता शासनाने हळद पिकाचा पीक पॅटर्नमध्ये तत्काळ समावेश करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
हळदीच्या मुद्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी शासनाकडे या मागणीला पाठपुरावा जोरकसपणे करण्याची गरज आहे. एवढे मोठे लागवड क्षेत्र असतानाही पिकाला कुठलेही कवच नसल्याने शेतकरी निराधार झालेले आहेत. यासाठी जिल्ह्याचे खासदार, आमदारांनी शासन दरबारी हा विषय लावून धरण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.