Team Agrowon
गतवर्षी कमी पर्जन्यमान, वाढती उष्णता आणि लांबलेला पाऊस या साऱ्याचा फटका हळद लागवडीवर झाला. यामुळे यंदा हळदीच्या लागवडीसाठी शेतकरी धजावले नाहीत.
परिणामी, यंदा ७८ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली असून, १० हजार ९७३ हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट होण्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.
राज्यातील प्रामुख्याने हिंगोली, वाशीम, नांदेड, जळगाव, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र सर्वाधिक असते. तर परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतही कमी अधिक हळद लागवड होते.
गेल्या तीन वर्षांत राज्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी हळदीची ८९ हजार २७३ हेक्टरवर लागवड झाली होती.
मात्र गतवर्षी पीकवाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट झाली होती. यामुळे बाजारात हळदीच्या दर वाढले होते.
गतवर्षी हळदीला चांगले दर मिळाल्याने यंदाच्या हंगामात हळद लागवडीसाठी शेतकरी पुढे येतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यातच उष्णताही वाढली होती.
शेतकऱ्यांनी या दरम्यान, हळद लागवडीसाठी पुढे आले नाहीत. परंतु ज्या भागात हळद लागवडीसाठी पुरेसे पाणी होते, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद लागवड केली.
हळद लागवड मे आणि जून महिन्यांत प्रामुख्याने केली जाते. लागवडीसाठी पोषक वातावरण नव्हते. वाढती उष्णता आणि वेळेत पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड एक महिना लांबणीवर गेली. या साऱ्याचा फटका हळद लागवडीला बसला आहे.