इच्छा तेथे मार्ग मिळतोच...

वातावरण बदलाच्या लढ्याविरुद्धचा पराभव शोकांतिकेत वाहून जातो, मात्र तुमच्याकडे जिद्द आणि उमेद असेल तर ती तुम्हाला पोहावयास शिकवून यशाच्या काठावर सुखरूप आणते. आज उत्तर प्रदेशातील ही तीन थरांची शेती यशस्वी होत आहे ती याचमुळे. शेवटी जेथे इच्छा असते तेथे मार्गसुद्धा असतो, हेच खरे...
Under the guidance of the University of Agriculture, women farmers have turned to vegetable cultivation.
Under the guidance of the University of Agriculture, women farmers have turned to vegetable cultivation.
Published on
Updated on

वातावरण बदलाच्या लढ्याविरुद्धचा पराभव शोकांतिकेत वाहून जातो, मात्र तुमच्याकडे जिद्द आणि उमेद असेल तर ती तुम्हाला पोहावयास शिकवून यशाच्या काठावर सुखरूप आणते. आज उत्तर प्रदेशातील ही तीन थरांची शेती यशस्वी होत आहे ती याचमुळे. शेवटी जेथे इच्छा असते तेथे मार्गसुद्धा असतो, हेच खरे... बुंदेलखंड हा भौगोलिक प्रदेश तेरा जिल्ह्यांपासून तयार झाला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये सहा आणि सात जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. ही यशोगाथा उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडच्या प्रेमसिंग या शेतकऱ्याची. दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी शापित असलेली ही भूमी आज प्रेमसिंग यांनी त्यांच्या गावापुरती तरी सदाहरित केली आहे. गेली दहा वर्षे सतत दुष्काळ, उद्‌ध्वस्थ खरीप आणि रब्बीमुळे या भागात शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, अर्थात याचे मूळ कारण होते वातावरण बदल. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेने २०१४ मध्ये या भागातील शेतकऱ्यांची एक कार्यशाळा घेऊन त्यांना पीक बदला बरोबरच पशुपालनाचा सल्ला दिला. प्रेमसिंग हा शेतकरी याच कार्यशाळेत आला होता. त्याने संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिलेला सल्ला प्रत्यक्ष अमलात आणून त्याच्या ३२ एकर क्षेत्रास संपूर्णपणे सेंद्रिय करून तेथे फळपिकांची लागवड केली. त्याचबरोबर पशुपालन सुरू केले. बांदा जिल्ह्यामधील एका लहान खेड्यामधील प्रेमसिंग यांच्या शेतीमधील प्रयोगाचे अनुकरण आता अनेक शेतकरी करत आहेत. थोड्या फार पडणाऱ्या पावसाचे पाणी भूगर्भात जिरविण्यात प्रेमसिंग यशस्वी झाले. आज त्यांच्या शेतात पाण्याची अनेक तळी निर्माण झाली आहेत. सोबत प्रत्येक वृक्ष फळाने लगडलेले आहे. त्यांनी पाळलेला गोवंश आज त्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवत आहे. प्रेमसिंग हे त्यांच्या तीन भावांची जमीन कसतात. वृक्षशेती, पीक बदल, सेंद्रिय शेती आणि शेतात मिळालेले सर्व उत्पन्न शेतातच प्रक्रिया करून ते विकतात. डाळवर्गीय पिकांपासून दलिया, मोहरीपासून तेल, फळापासून लोणची, मुरब्बा आणि दुधापासून दही, ताक, तूप ही त्यांची उत्पादने हातोहात संपतात. त्यांच्या “आवर्तनशील शेती” या पुस्तकात या सर्वांचे सविस्तर वर्णन आहे. चुकांपासून शिकत गेलो... प्रेमसिंग म्हणतात, “मी चुकांपासून शिकत गेलो, त्याची एक वहीच तयार केली. या वहीचा मी शांत चित्ताने अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझे ७० टक्के आर्थिक उत्पादन हे व्याज भरणे, रासायनिक खते, विजेचे बिल आणि डिझेलवर खर्च होत आहे, याला पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती, वृक्ष लागवड आणि भूगर्भात पाणी जिरविणे. तेच मी आज माझ्या या शेतात केले आहे.” आज दुष्काळी भागातील त्यांचा ३२ एकरांचा हिरवा पट्टा पाहण्यास भारतातूनच नव्हे, तर परदेशातून लोक येतात. कृषी विद्यापीठाचे योगदान 

  • उत्तर प्रदेशामधील शेतकऱ्यांना वातावरण बदलाविरुद्ध लढा देणे, त्याच बरोबर त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या शेकडो यशोगाथा निर्माण करण्यामध्ये कानपूर येथील चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे. विद्यापीठामध्ये या यशोगाथांचा एक स्वतंत्र विभाग आहे. त्या ठिकाणी चित्ररूपी प्रदर्शनाबरोबरच यशोगाथा निर्माण केलेल्या शेतकऱ्यांची नावे, पत्तासुद्धा उपलब्ध आहे. आपण कधीही त्यांच्या शेतावर जाऊन ते सर्व पाहू शकतो.
  • भविष्यामध्ये उत्तर प्रदेशातील मध्यवर्ती सपाट भागात भात शेतीला वातावरण बदलाचा मोठा फटका बसणार असून पुढील दशकामध्ये उत्पादन ९ ते १० टक्क्यांनी कमी होईल म्हणून यास अनुसरून एका मोठ्या प्रकल्पावर येथे संशोधन कार्य सुरु आहे. या भागात १४ जिल्हे येतात. विद्यापीठाने या प्रकल्पांतर्गत २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालखंडात काही गावे दत्तक घेऊन प्रत्येक गावामधील तीस शेतकऱ्यांची निवड केली. त्यांना हवामान खाते, त्यांचे अंदाज आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्याशी जोडण्यात आले. विद्यापीठाने वातावरण बदलामध्येही चांगले उत्पादन देणाऱ्या पीक जातींचा पुरवठा केला. शेती व्यवस्थापनाचे तंत्र दिले. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी शेती केली, त्यांना भरपूर उत्पादन तर मिळालेच शिवाय आर्थिक फायदा सुद्धा झाला. कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यामध्ये माती परीक्षण, बी बियाणे, पेरणी, तणनियंत्रण, काढणी, मळणी, साठवण यांचा सुद्धा समावेश होता. प्रकल्पात सहभागी झालेले सर्व शेतकरी हे गरीब अल्पभूधारक होते.
  • जे शेतकरी खरिपामध्ये भात आणि रब्बीमध्ये गहू आणि मोहरी लागवड करून नुकसानीमध्ये जात होते त्यांनी कृषी विद्यापीठाचा सल्ला स्वीकारून खरिपामध्ये संकरित भात आणि मका लागवड केली. रब्बीमध्ये गहू, बटाटा, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, कांदा लागवड केली. पीक फेरपालट आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने आर्थिक लाभात वाढ झाली.
  • यातून एक महत्त्वाचा बोध घेणे गरजेचे आहे ते म्हणजे, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी यापुढे कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आणि तंत्रज्ञानाची निवड करावी. तेथील शास्त्रज्ञांच्या मदतीने यापुढे खरीप आणि रब्बीमध्येही पीक उत्पादन घ्यावे. पीक बदल करावा. केवळ एक, दोन पिकांवर अवलंबून चालणार नाही. कृषी विद्यापीठांना यापुढे शेतकऱ्यांच्या बांधांवर जावे लागणार आहे.
  • शेतीची दहा सूत्रे  उत्तर प्रदेशमधील अनेक अभ्यासू,सुशिक्षित शेतकरी वातावरण बदलामध्ये यशस्वी शेती करण्यासाठी दहा सूत्रांचा वापर करतात. १) ठिबक सिंचन, २) अक्षय ऊर्जा, ३) सेंद्रिय कीटकनाशके, ४) सेंद्रिय खते, ५) जमिनीचे आरोग्य, ६) जमीन कायम सदाहरित ठेवणे, ७) पाळीव प्राण्यांना सतत फिरते ठेवून मिथेन उत्सर्जन कमी करणे, ८) जनावरांसाठी भरपूर हिरवा चारा, ९) खरीप, रब्बीमध्ये कमीत कमी ८ ते १० पिकांची विविधता, १०) उत्पादनावर शेतातच प्रक्रिया. ही दहा सूत्रे पाळण्यामध्ये शेती करणारे कृषी पदवीधर जास्त आहेत. शेती करू इच्छिणाऱ्या कृषी पदवीधरांना कृषी विद्यापीठात वातावरण बदल आणि भविष्यामधील शेती यावर आधारित कमी कालावधीचा अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे. स्वत:च्या शेतीबरोबरच, देशाच्या वातावरण बदलाच्या उपाययोजनांबद्दल सुद्धा हे शेतकरी जागृत असतात हे महत्त्वाचे आहे. मीरा चौधरी यांची यशोगाथा  उत्तर प्रदेशावर आज दीर्घ पल्ल्याचा कडक उन्हाळा, थोडीच पण कडाक्याची थंडी आणि अनपेक्षित पाऊस ही तीन संकटे आहेत. वातावरण बदलाचा प्रतिकार महिला जास्त सक्षमतेने करतात असे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे आणि ते किती तंतोतंत खरे आहे हे पूर्व उत्तर प्रदेशमधील जनकपूरच्या मीरा चौधरी या आदिवासी महिलेने सिद्ध करून दाखविले आहे. पती निधनानंतर २२ व्या वर्षी पदरात तान्हुल्याला सांभाळून मीरा चौधरी यांनी वातावरण बदलामध्ये सुद्धा कशी यशस्वी शेती करावी याचा आदर्श निर्माण केला. अनियमित पावसामुळे खरिपाच्या पारंपरिक पण नुकसानीत जाणाऱ्या भात शेतीला तिने रामराम करून त्याजागी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचा पर्याय निवडला. पहिल्याच वर्षी नफा झाला आणि त्यामध्ये त्यांनी एक गाय खरेदी केली. आज मीराबाईची शेती भाजीपाला, फळे आणि दूधदुभत्याने बहरलेली आहे. मीरा चौधरी या गावच्या पंच असून अनेक महिलांना आत्मविश्‍वासाबरोबरच शेतीचे प्रशिक्षणसुद्धा देतात. जुन्या पद्धतीनुसार हरभरा शेतात न फेकता व्यवस्थित पेरा, कडक थंडीत बटाटा लागवडीच्या जमिनीमध्ये ओलसरपणा ठेवा, कांदा, बटाटा साठवणूक मातीने लिंपलेल्या बांबू घरात करा, रासायनिक खते वापरु नका या त्यांच्या शिकवणीमुळे आज हे गाव कृषी महिला प्रधान झाले आहे. गोरखपूरमधील ‘पर्यावरण कृती गट’ ही संस्था राज्यामधील हजारो शेतकऱ्यांना वातावरण बदलामध्ये शाश्‍वत शेती कशी करावयाची याचे प्रशिक्षण मीरा चौधरी यांच्या शेतावर जाऊन देते. लहान नद्यांना येणारे वेगवान पूर हे या राज्यापुढे मोठे संकट आहे. पुराचे पाणी शेतात साठून राहिल्यामुळे खरीप हंगाम वाया जातो. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सिराज म्हणतात, की आज येथील शेतकरी पारंपरिक बियाण्यांची लागवड करत आहेत. यामध्ये भात, मका, भेंडी यांचा अंतर्भाव आहे. संस्थेने या भागात ‘मचाण’ पद्धतीचे शेती विकसित केली आहे. यामध्ये शेतात मोठे मचाण उभे करून त्यावर वेलवर्गीय फळ पिके घेतात. शेताच्या बाहेर आणि शेतामधील मुद्दाम उंच केलेल्या बांधावर भाजीपाला, डाळवर्गीय पिकांची लागवड केली जाते. शेतात जेथे पुराचे पाणी साचते तेथे भात शेती होते. भाताबरोबर उंच वाढणाऱ्या मका जातीची लागवड केली जाते. थोडक्यात, शेत, पुराच्या पाण्याने भरलेले असून सुद्धा शेतकरी तीन पिके यशस्वी पद्धतीने घेतात. संपर्क : डॉ. नागेश टेकाळे

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com