Guava Cultivation : पेरू लागवडीकडे इंदापुरातील शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Guava Farming : मागील काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे कल वाढू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या पेरूच्या क्षेत्रात तालुक्यात वाढ होताना दिसून येत आहे.
Guava Cultivation
Guava CultivationAgrowon

Pune News : डाळिंब उत्पन्नात अग्रेसर असणारा इंदापूर तालुका आता पेरू पिकासाठी ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला अथवा बांधावर असणाऱ्या पेरूच्या झाडांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये होऊ लागल्या आहेत. मागील काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे कल वाढू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या पेरूच्या क्षेत्रात तालुक्यात वाढ होताना दिसून येत आहे.

मागील चार वर्षांपूर्वी २०१९- २० मध्ये ३५६ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणारे पेरुचे पीक २०२३-२४ मध्ये २ हजार ४४९.५ हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. तालुक्यातील १४० गावांपैकी ९१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पेरुची लागवड केली जात आहे. उत्पादित पेरूची विक्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाह्यवळण रस्त्यांवरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे.

Guava Cultivation
Guava Processing : पेरू पासून कोणते पदार्थ तयार होतात?

वातावरणातील बदलामुळे जैविक अजैविक ताणाला बळी पडणाऱ्या, जागतिक मंदी, कोरोनानंतर विस्तारास मर्यादा आलेल्या द्राक्ष, डाळिंबाच्या पिकांऐवजी कोणत्या ही जमिनीत, हवामानात येणारे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेरू लागवडीकडे वळाले आहेत.

समशीतोष्ण हवामान असणाऱ्या भागात पेरुचा उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम धरता येतो. हिवाळी हंगामात ही उत्कृष्ट चवीची फळे मिळतात. वेगवेगळ्या जाती व त्यांची टिकवणक्षमता यामुळे पेरू देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत जाऊ लागला आहे. या माध्यमातून कामगारांना हमखास रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Guava Cultivation
Guava Farming : पडोळ यांनी लोकप्रिय केला श्रीहरी ब्रॅण्ड पेरू

तालुक्यात ७० टक्के पिंक तैवान ः

तालुक्यातील एकूण पेरू क्षेत्रापैकी ७० टक्के पिंक तैवान, २० टक्के व्ही.एन.आर. व १० टक्के गुजरात रेड या पेरू जातीची लागवड दिसून येत आहे. तालुक्यातील शेतकरी उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम धरून पेरू उत्पादन घेत आहेत.

सर्वाधिक पेरू लागवड असलेली गावे

गावे --- क्षेत्र (हेक्टरमध्ये)

गोतोंडी --- २४३

वरकुटे खुर्द --- २००

पिटकेश्‍वर --- १९९

शेळगाव --- १९०

निमगाव केतकी --- १२०

अवसरी --- ८५

मागील पाच वर्षांत वाढलेले पेरूचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वर्ष --- क्षेत्र

२०१९-२० --- ३५६

२०२०- २१ --- ४७७

२०२१-२२ --- ८९६

२०२२-२३ --- १०४७

२०२३-२४ --- २४४९.५

सद्यःस्थितीत बागांच्या छाटण्या आटोपल्या आहेत. बऱ्याचशा बागा फुटण्याच्या व कळीच्या अवस्थेत आहेत. चालू वर्षी जास्त तापमानामुळे आगाप छाटणीच्या बागांना कळी गळीची समस्या जाणवत आहे; परंतु येथून पुढील काळात फळांचा लाग चांगला राहील.
- भगवान गायकवाड, पर्यवेक्षक, कृषी कार्यालय, इंदापूर तालुका
माझ्याकडे पूर्वी ४५ एकर डाळिंब लागवड होती. मात्र तेल्या आणि मर रोगायामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी करून पेरू लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या माझ्याकडे वीस एकरांत तैवान पिंक या पेरू जातीची लागवड आहे. तर पाच एकरांवर गुजरात रेड या पेरू जातीची लागवड करण्याचे काम सुरू आहे.
- अतुल शिंगाडे, प्रगतशील शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर
पूर्वी इंदापूर तालुका डाळींब पिकासाठी ओळखला जात होता. परंतु मागील काही वर्षांत विविध रोगांचा प्रादुर्भाव डळिंबावर वाढत असल्याने शेतकरी पेरू बागेकडे वळत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तैवान, पिंक, व्ही. एन. आर. व गुजरात रेड या जातीच्या पेरूची लागवड केली जात आहे.
- भाऊसाहेब रूपनर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com