Rural Development: दुष्काळग्रस्त चेलका गावाचा कायापालट

Drought-Free Chelka Village: अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका गावाने दुष्काळी प्रतिकूलतेवर मात करत जलसंधारण आणि सामूहिक शेतीच्या माध्यमातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. आता हे गाव मॉडेल व्हिलेज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
Water Management
Water ManagementAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दुर्गम गाव ‘चेलका’ सध्या समृद्धीच्या वाटेवर आहे. याला कारणीभूत ठरले ते या गावशिवारात उपलब्ध झालेले पाण्याचे कायम स्वरूपी स्रोत आणि शेतकऱ्यांची एकजूट. सात-आठ वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा झेललेल्या या गावात आता सुख-समृद्धी नांदू लागली आहे. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी मारामार व्हायची तेथे आता शेतकरी तीन-तीन पिके घेत आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील शेवटच्या टोकावर चेलका गाव आहे. या गावापासून पातूर तालुक्याची सीमा सुरू होते. अतिदुर्गम भागात वसलेल्या या छोट्याशा गावामध्ये २०१७ पूर्वी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. हे संकट दर वर्षी गावकऱ्यांवर ओढवत होते. पावसाचे दिवस लोटले की शेतकऱ्यांना पीक उत्पादनाची चिंता भेडसावत होती. या गावातील शेतकरी कुटुंब हे पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. पावसाच्या पाण्यावर खरिपामध्ये पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर रब्बीत पिकांना पाणी नसल्याने लागवड करता येत नव्हती.

Water Management
Latur Water Management : लेकराबाळांच्या कोवळ्या खांद्यांवर हंडा, लातूरमधील दयनीय परिस्थिती

अशातच अभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून पुढे ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू झाली आणि या स्पर्धेमध्ये २०१८ मध्ये ‘चेलका’ गाव सहभागी झाले. पानी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणाला गावातील प्रयोगशील शेतकरी रामेश्वर उंडाळ व गावातील चार महिला सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणामध्ये जलसंधारणाचे धडे घेऊन त्यांनी गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी लोक चळवळ सुरू केली.

साधारणपणे साडेतीनशे वस्तीच्या या गावामध्ये ७१ कुटुंबे राहतात. या कुटुंबांनी गावाच्या शिवारामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली. शेतांना बांधबंदिस्ती करून घेतली. शेतांमध्ये कंटूर बांध तयार केले. छोटे चर, मोठे चर, नाल्यावर मातीनाला बंधारे, दगडी बांध, कोल्हापुरी बंधारे, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे अशी अनेकविध प्रकारची कामे केली.

Water Management
Beed Drought Update: आजच्या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही: देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाच्या कामांमुळे या गावशिवारात पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे येथील शेतकरी आता खरीप सोबतच रब्बी आणि उन्हाळी पिकेही घेत आहेत. पारंपरिक पिकांसोबत गहू, हरभरा, कांदा, मका, मूग, भुईमूग, भाजीपाला लागवड करतात. काही शेतकऱ्यांनी तर बारमाही भाजीपाला व फळबागांची लागवड केली आहे. आज या गावांमध्ये सर्वत्र हिरवळ पसरली आहे. सुख-समृद्धी नांदू लागली. गावात कुठेही बोअरवेल घेण्याची गरज नाही. विहिरींवरूनच सिंचन करणे सहज शक्य आहे. ४० ते ५० फुटांपर्यंत विहिरींच्या खोली असून सर्व विहिरी वर्षभर तुडुंब भरलेल्या असतात.

गट शेतीत सहभाग

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ आली आहे. या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करावी. गटांनी एकत्र लागणाऱ्या निविष्ठा खरेदी कराव्या, जेणेकरून एकत्र खरेदी केल्याने पैशाची बचत होईल. शेतामध्ये गटांनी मिळून कामे करावी, जेणेकरून पैशाचा व्यवहार होणार नाही. जैविक शेतीसाठी जास्तीत जास्त निविष्ठा घरीच तयार करून त्याचा वापर करावा, अशी अपेक्षा होती. शेतकरी याप्रमाणेच कामे करीत आहेत. चेलका गावातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात या काळात मोठी वाढ झाली.

यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे एकरी १४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले. चेलका या गावाला मॉडेल व्हिलेज म्हणून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आता दत्तक घेतले आहे. गावामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सातत्याने भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोचवत आहेत. पानी फाउंडेशन तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ सातत्याने या गावामध्ये जात शेतकऱ्यांसोबत बैठका, संवाद, शिवारफेरी घेत संपर्कात राहत आहेत.

नागरिकांना पिण्यासाठी पाणी शेतामधून आणावे लागत होते. गावकऱ्यांनी श्रमदान तसेच बीजेएसचे मशिनसाठी सहकार्य, शासनाने डिझेल व इतर केलेले सहकार्य, या सामूहिक प्रयत्नातून गावशिवारात जलसंधारणाची कामे झाली. आमच्या नशिबाने त्याच वर्षी जोरदार पाऊस झाला. प्रत्येक थेंब जमिनीत जिरला. विहिरींच्या पातळी वाढल्या. पाणीटंचाईग्रस्त गाव या फेऱ्यातून बाहेर निघाले. त्यानंतर आता आम्ही तीनही हंगामात पिके घेत आहोत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पीकपद्धती बदलल्या, उत्पन्न वाढीस मोठा हातभार लागला.

रामेश्‍वर पाटील, शेतकरी,

चेलका, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला (मो. ९८२३२६९०१७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com