
Latur Summer Season : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी कोवळ्या खांद्यावर प्लॅस्टिकचे हंडे घेऊन पाण्यासाठी निघालेले शालेय विद्यार्थी, वस्तीपासून दोन किलोमीटर अंतरावरील गळक्या व्हॉल्व्हवर थेंब-थेंब पाण्याने बादली भरण्यासाठी ताटकळत उभ्या वृद्ध महिला, पंधरा वर्षांपासून तहान भागविणारा व सध्या नादुरूस्त असलेला हातपंप सुरू होण्याची भाबडी आशा घेऊन असलेल्या गृहिणी. हे विदारक चित्र आहे शिवाजीनगर तांड्याचे.
जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा (माळहिप्परगा) ही सातशे लोकसंख्येची वस्ती. गेल्या पंधरा वर्षांपासून एकमेव हातपंपावर येथील ग्रामस्थांची तहान भागते. मात्र, हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना आता पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तांड्यापासून एक किलोमीटर असलेल्या माळहिप्परगा साठवण तलावातून जळकोट शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा केला गेला. या गावांना उन्हाळा असताना पाणीपुरवठा सुरू आहे.
मात्र, येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील ग्रामस्थांना गेल्या पंधरा वर्षांपासून हातपंपावर अवलंबून राहावे लागत आहे.सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. अनेक ठिकाणचे तलाव कोरडे पडलेले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाई जाणवण्यास सुरवात झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टँकर अथवा अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईला मार्ग काढला जात आहे.
मात्र, शिवाजीनगर तांडा परिसरात पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगर तांड्यातील ग्रामस्थांना कामे सोडून दिवसभर पाण्याचा शोध घेण्यासाठी कोसोदूर जावे लागत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून गावापासून एक किलोमीटर अंतरावर हातपंप आहे. दिवसभर हापसून लहान मुलांसह ग्रामस्थांना कसेबसे हातपंपाचे पाणी मिळत होते.
मात्र, देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा हातपंप नादुरुस्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांना दुसऱ्या गावाला गेलेल्या नळयोजनेच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्हवरील गळतीचे पाणी मिळविण्यासाठी दिवसरात्र दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तेथेही उन्हात घागरभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. शासनाकडून पाणीपुरवठा योजना दिल्या गेल्या आहेत.
मात्र, कामेच बोगस झाल्यामुळे तांडावासीयांना कसलाच फायदा झाला नाही. पशुधनाचीही तहान भागविण्यासाठी दोन किलोमीटरवर असलेल्या साठवण तलावावर न्यावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने हातपंप दुरुस्त करावा, गावात नवीन हातपंप घ्यावेत, तसेच तांड्यासाठी कायस्वरूपी पाणी योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून तांड्यावरील ग्रामस्थांना हातपंपावर तहान भागावी लागत आहे. तांड्यावर कुठलीही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात हातपंपावर अवलंबून राहावे लागते. भर उन्हाळ्यात हातपंप बंद असल्याने पाण्यासाठी लेकराबाळांना, महिलांना वणवण भटकावे लागत आहे.
- धोंडिराम राठोड, ग्रामस्थ
हातपंपामुळे पिण्याचे पाणी कसेबसे मिळत होते. मात्र, हातपंप सध्या नादुरुस्त झाला आहे. ग्रामस्थांना दोन किलोमिटरहून पाणी आणावे लागत आहे. पशुधनाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे.
- संजय आडे, ग्रामस्थ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.