Muslim Law: मुस्लिम धर्मीयांचे वैयक्तिक कायद्यानुसार मालमत्तेचे हस्तांतर

Muslim Property Transfer Rules: या अंकात आपण मुस्लिम धर्मीयांचे वैयक्तिक कायद्यानुसार मालमत्तेचे हस्तांतर ज्यामध्ये एका हयात व्यक्तीकडून दुसऱ्या हयात व्यक्तीकडे मालमत्तेची मालकी हस्तांतरित होते, याची माहिती घेत आहोत.
Law
LawAgrowon
Published on
Updated on

भीमाशंकर बेरुळे

Transfer of Property between Living Persons: मुस्लिम धर्मीयांमध्ये प्रामुख्याने हिबा (बक्षीस) या प्रकारे मालमत्तेचे हस्तांतर होते. अनेक न्यायालयांनी, मुस्लिम कायद्यातील ‘हिबा’ बाबतचे नियम वाजवी वर्गीकरणावर आधारीत आहेत. मुस्लिम समाजाने ‘हिबा’ बाबतच्या नियमांचे अनुपालन केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही या आशयाचे निकाल दिले आहेत.

‘हिबा’ या प्रकाराला कायद्यानुसार ‘व्यवहार’ (transaction) मानले जाते, मुस्लिम कायदा ‘हिबा’ (gift) या कराराच्या कायद्याचा भाग (part of contract law) मानतो, कारण ‘हिबा’साठी काही अटींची पूर्तता होणे अनिवार्य असते.

दाता ( Donor) :

सज्ञान असावा, त्याचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे. तो जर न्यायालयाने नेमलेल्या पालकाच्या देखरेखीखाली असेल तर वयाच्या एकवीस वर्षांनंतर त्याला सज्ञान समजण्यात येते. अज्ञानाने दिलेला ‘हिबा’ अवैध ठरेल.

तो स्वस्थचित्त असावा. वेडसरमाणसाला तो करत असलेल्या कामाचे कायदेशीर परिणाम कळत नाहीत. तथापि, वेडसर व्यक्तीने वेडाच्या भरात नसताना (lucid interval) दिलेला ‘हिबा’ वैध ठरेल कारण या कालावधीत तो सामान्य व्यक्ती असतो आणि त्याला तो करत असलेल्या कामाचे कायदेशीर परिणाम ज्ञात असतात. परंतु प्रसंगी तसे पुराव्यासह सिद्ध करावे लागेल.अज्ञान किंवा वेडसर व्यक्तीच्या नावे ‘हिबा’ करावयाचा असल्यास, त्याचा स्वीकार खाली अग्रक्रमाने दर्शविलेल्या ‘मालमत्ता पालक’ (guardian of the property) व्यक्ती करू शकतात.

अ) वडील

क) वडिलांचे वडील

ब) वडिलांचा व्यवस्थापक

ड) वडिलांच्या वडिलांचा व्यवस्थापक

अ) च्या उपस्थितीत, ब), क) किंवा ड) ‘हिबा’चा स्वीकार करू शकणार नाही. वरील अग्रक्रमाचे काटेकोरपणे पालन व्हावे.

Law
Muslim Personal Law: मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील तरतुदी

मुस्लिम कायद्यान्वये आईला ‘मालमत्ता पालक’चा दर्जा नाही. त्यामुळे आई अज्ञान किंवा वेडसर व्यक्तीच्या नावे केलेल्या ‘हिबा’चा स्वीकार करू शकत नाही.

मुस्लिम धर्मीय (Muslim) असावाः ‘हिबा’ची घोषणा करणारा पुरुष किंवा स्त्री दाता (donor) मुस्लिम धर्मीय असावा. तो मुस्लिम धर्मीय नसेल तर असे बक्षीस ‘हिबा’ ठरणार नाही आणि मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या तरतुदींना पात्र ठरेल. तथापि, ‘हिबा’ नंतर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिम धर्माचा त्याग केला तरी, त्याने मुस्लिम धर्मीय असताना दिलेला ‘हिबा’ अमलात राहील.

त्याचा मालकी हक्क (Right) असावा ः ज्या मालमत्तेचा ‘हिबा’ दिला जात आहे त्या मालमत्तेवर ‘हिबा’ देणाऱ्या पुरुष किंवा स्त्री दात्याचा (donor) पूर्णतः वैध व कायदेशीर अधिकार/हक्क असावा.स्वतःच्या मालकीची नसलेली किंवा अवैध पद्धतीने संपादन केलेल्या मालमत्तेचा ‘हिबा’ देता येत नाही तसेच मालमत्ता हस्तांतर अधिनियम १८८२, कलम ६ अन्वये नमूद गोष्टींचाच ‘हिबा’ देता येईल. कोणत्याही कायद्यान्वये हस्तांतरास प्रतिबंधित वस्तूंचा ‘हिबा’ देता येणार नाही.

‘हिबा’ देणारा, दाता (donor) विवाहित किंवा अविवाहित असू शकेल.

‘हिबा’ फक्त हयात/जीवंत व्यक्तीच्याच लाभात देता येतो. मयत व्यक्तीच्या नावे ‘हिबा’ देता येत नाही.

अदाता (Donee)

(ज्याच्या लाभात हिबा करण्यात येत आहे) :

कायद्याने स्थापित व्यक्ती (Juristic Person) असावाः म्हणजे कायद्याद्वारे स्थापन झालेले महामंडळ, नोंदणीकृत संस्था, विद्यापीठ, शाळा, मशीद इत्यादी. यांचे जैविक अस्तित्व नसले तरीही कायदा यांना व्यक्ती (person) मानतो. कायद्यानुसार ‘व्यक्ती’ या संज्ञेत

फक्त जैविक व्यक्तीच नव्हे तर कायद्याने स्थापित व्यक्तींचाही समावेश होतो. कायद्याने स्थापित व्यक्ती या सज्ञान (adult) आणि स्वस्थचित्त (of sound mind) मानल्या जातात. अशा कायद्याने स्थापित व्यक्तींच्या लाभात केलेला ‘हिबा’ वैध असतो. अशा ‘हिबा’चा स्वीकार, या संस्थांचे प्रबंधक किंवा सक्षम अधिकारी करतात.

गर्भस्थ अपत्य (Child in Womb): गर्भात असलेल्या अपत्याच्या हक्कात ‘हिबा’ करता येतो. या वेळी प्रमुख अट आहे की, असे अपत्य ‘हिबा’ करताना आईच्या गर्भात जीवंत असावे आणि असे गर्भात असलेले अपत्य ‘हिबा’च्या दिनांकापासून (सुन्नी पंथात) सहा महिन्याच्या, (शिया पंथात) दहा महिन्याच्या आत जीवंत जन्मले पाहिजे. गर्भस्थ अपत्य जरी अस्तित्वात नसले तरी कायदा त्याला जीवंत व्यक्ती मानतो. असे अपत्य जर कोणत्याही कारणामुळे जीवंत जन्मले नाही किंवा ‘हिबा’ करताना आईच्या गर्भात जीवंत नसेल तर असा ‘हिबा’ रद्द/अवैध ठरेल.

ज्याला ‘हिबा’ मिळणार आहे (donee) ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, लिंगाची, वयाची किंवा मानसिकतेची असू शकेल. मुस्लिम धर्मीय व्यक्तीला, हिंदू, ख्रिश्चन किंवा अन्य बिगर मुस्लिम व्यक्ती, पुरुष, स्त्री, अज्ञान व्यक्ती, वेडसर व्यक्तीच्या हक्कात ‘हिबा’ करता येईल.

Law
Indian Inheritance Law: हिंदू, मुस्लिम आणि पारसी धर्मीयांचे मिळकतीसंदर्भात वारसा नियमन

मुस्लिम कायद्यान्वये ‘हिबा’ देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तींसाठी अनिवार्य गोष्टी

घोषणा (Declaration): ज्याने हिबा द्यायचे ठरविले आहे (donor) त्याने, तो कोणाला आणि काय बक्षीस देत आहे याची ‘घोषणा’ करणे आवश्यक आहे. ही घोषणा स्वेच्छेने आणि स्पष्ट शब्दांत असावी. संदिग्ध शब्दात (ambiguous words) केलेली घोषणा अवैध ठरते. तसेच धमकीमुळे किंवा बळजबरीमुळे अथवा अयोग्य, अनधिकृत प्रभावाखाली किंवा फसवणूक करून दिलेला/घेतलेला ‘हिबा’ अवैध ठरतो.

स्वीकार (Acceptance): ज्याला असे बक्षीस/हिबा मिळणार आहे (donee) त्याने ‘हिबा’चा स्वीकार केला पाहिजे.

हस्तांतर/ताबा (Transfer of Possession) : हिबा देणाऱ्याने, हिबा दिलेल्या मालमत्तेचा ताबा, ज्याच्या लाभात हिबा देण्यात आला आहे त्याच्याकडे हस्तांतरित करावा.

त्याग (relinquishment): ‘हिबा’ दिल्यानंतर, दात्याने (donor), ‘हिबा’ दिलेल्या मिळकतीतील स्वतःचा अधिकाराचा, हितसंबंधाचा, मालकीचा त्याग केला पाहिजे. असे न झाल्यास (काही अपवाद वगळता) सदर ‘हिबा’ अवैध ठरेल.

उक्तसाठी (त्याग) अपवाद :

१) जर पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला ‘हिबा’ दिलेला असेल तर.

२) जर ‘हिबा’ देणार आणि घेणार हे एकमेकांशी प्रतिबंधित नातेसंबंधांनी संबंधित असतील तर.

३) जर ‘हिबा’ ‘सदका’ म्हणून (धार्मिक कामासाठी) दिला असेल तर.

४)जर ‘हिबा’ घेणार (donee) मयत झाला असेल तर.

५)‘हिबा’ म्हणून स्वीकारलेली वस्तू, ‘हिबा’ घेणार (donee)

Law
Milk Adulteration Law: दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा

६) जर ‘हिबा’ याने विकल्यामुळे, बक्षीस दिल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्याच्या ताब्यातून निघून गेली असेल तर.

७) जर ‘हिबा’ म्हणून दिलेली वस्तू गहाळ / नष्ट झाली असेल तर.

८) जर कोणत्याही कारणामुळे ‘हिबा’ म्हणून दिलेल्या वस्तूचे मूल्य वाढले असेल तर.

९) जर ‘हिबा’ म्हणून दिलेल्या वस्तूचे स्वरूप ओळखता येणार नाही इतके बदलले असेल तर. (उदा. गव्हाचे पीठात रूपांतर)

जर दात्याने (donor) ‘हिबा’च्या बदल्यात काही मोबदला स्वीकारला असेल तर.

दात्याने (donor) ‘हिबा’चा ताबा देण्याआधी केलेल्या केवळ घोषणेद्वारे (declaration) ‘हिबा’ कधीही रद्द केला जाऊ शकतो. परंतु ताबा दिल्यानंतर फक्त न्यायालयाच्या हुकूमनाम्यानेच ‘हिबा’ रद्द होऊ शकतो.

‘हिबा’चे किमान दोन साक्षीदार असावे.

‘हिबा’च्या बदल्यात कोणताही मोबदला अपेक्षित नाही.

मुस्लिम धर्मीय व्यक्ती, जर मृत्युशय्येवर (Deathbed) असेल, तर त्याला त्याच्या संपूर्ण मिळकतीपैकी (दफन विधीचा खर्च वगळून) फक्त १/३ मिळकतीचाच ‘हिबा’ करता येईल. जर त्याने संपूर्ण मिळकतीचा हिबा केला तर त्याच्या सर्व वारसांची परवानगी आवश्यक असेल.

‘हिबा’चा दस्त नोंदणीकृत असावा का?

याबाबत बराच संभ्रम आहे. विविध न्यायालयांनी याबाबत परस्पर विरोधी मते व्यक्त केलेली आहेत. मुस्लिम कायद्यान्वये ‘हिबा’ हा तोंडीसुद्धा असू शकतो. त्यामुळे तोंडी ‘हिबा’ नोंदणीकृत असावा असे बंधन नाही. मालमत्ता हस्तांतर कायदा १८८२, कलम १२९ अन्वये, या कायद्यातील प्रकरण सात मधील दान (gift) बाबतीच्या तरतुदी मुस्लिम कायदा पाळणाऱ्यांना लागू होत नाहीत अशी तरतूद आहे. त्यामुळे लेखी ‘हिबा’ नोंदणीकृत असावा असे बंधन नाही.

हिबाचा दस्त मुस्लिम कायद्यानुसार एक भेट किंवा हिबा आहे ः

१) मालमत्ता हस्तांतर कायद्याचे कलम १२३ अन्वये तो अनिवार्यपणे नोंदणी योग्य नाही.

२) मुल्लाच्या तत्त्वांन्वये, मुस्लिम देणगीदाराने लेखी स्वरूपात केलेली भेट अनिवार्यपणे नोंदणी करण्या योग्य नाही सदर दस्त हा देणगीदाराच्या घोषणेचे स्वरूप आहे, याद्वारे तिन्ही आवश्यक बाबी पूर्ण झाल्यामुळे सदर भेट पूर्ण आणि अपरिवर्तनीय बनली आहे.

न्यायालयाचा निकाल ः (मा. सर्वोच्च न्यायालय, अब्दुल रहीम गुड्डू, अब्दुल मजीद वि. शेख कय्युम/शेख रशीद, रिट याचिका क्र. १८४३२००९, दि. १०.११.२००९) मुस्लिम कायद्यानुसार, भेटवस्तूची घोषणा आणि स्वीकृती ही मौखिक असू शकते. जिथे भेटवस्तू लिखित स्वरूपात दिली जाते, त्याला हिबानामा म्हणतात. हे गिफ्ट-डीड (हिबानामा) स्टॅम्प पेपरवर असणे आवश्यक नाही आणि ते प्रमाणित किंवा नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. (मा. सर्वोच्च न्यायालय, इलाही समसुद्दीन विरुद्ध जैतुनबी मकबुल)

अशाप्रकारे, वरील न्यायिक निर्णयांमध्ये निश्चित केलेली कायदेशीर स्थिती पाहता, असे म्हणता येईल की, मालमत्ता हस्तांतरण कायदा, १८८२ मधील तरतुदी मुस्लिम कायद्यांतर्गत भेटवस्तूंना लागू होत नाहीत.

मुस्लिम कायद्याच्या नियमांन्वये भेटवस्तूच्या वैधतेसाठी लेखी दस्तऐवज आवश्यक नाही. मौखिक भेट जर खालील तिन्ही आवश्यक गोष्टी पूर्ण करत असेल तर अशी भेट पूर्ण आणि अपरिवर्तनीय बनते.

भेटवस्तू देणाऱ्याकडून भेटवस्तू देण्याची घोषणा.

भेटवस्तू स्वीकारणाऱ्याकडून भेटवस्तूचा स्वीकार.

भेटवस्तूचा ताबा देणे.अशा भेटवस्तूंची नोंदणी करणे आवश्यक नाही.

अशाप्रकारे, जर एखाद्या मुस्लिम धर्मीय व्यक्तीने तोंडी किंवा लेखी कळवले असेल की त्याने मौखिक भेट (हिबा) किंवा अनोंदणीकृत बक्षीसपत्रा (हिबानमा) द्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ (हक्क संपादन) च्या तरतुदींन्वये जमिनीवर हक्क संपादन केला आहे तर संबंधित तलाठ्याने अशा व्यक्तीला त्याबाबत लेखी पोचपावती द्यावी.सबब, मौखिक भेटवस्तू (हिबा) आणि नोंदणीकृत नसलेल्या बक्षीसपत्राच्या (हिबनामा) च्या आधारे रु. १००/- (रु. शंभर) पेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची फेरफार नोंद नोंदविता येणार नाही अशी जी महसूल आणि वन विभागाची धारणा आहे ती बरोबर असल्याचे दिसत नाही.

एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे ‘हिबा’

एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे किंवा व्यक्ती समूहाच्या लाभात ‘हिबा’ देता येऊ शकेल. परंतु त्या सर्वांची एकमेकांशी ओळख असावी आणि प्रत्येकाचा हिस्सा (share) स्वतंत्रपणे ठरविण्यात आलेला असावा तसेच त्या सर्वांनी वैयक्तिकरित्या ‘हिबा’चा स्वीकार करावा.

: bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com