
भीमाशंकर बेरुळे
Islamic Legal System: “वैयक्तिक कायद्याची कल्पना मनुष्याच्या सामाजिक अस्तित्वाच्या संकल्पनेवर आधारित आहे, जेणेकरून त्याच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार, जे त्याच्यावर वैयक्तिक अर्थाने सर्वांत जवळून परिणाम करतात, जसे की विवाह, घटस्फोट, कायदेशीरपणा, अनेक प्रकारची क्षमता आणि उत्तराधिकार, त्या उद्देशासाठी सर्वात योग्य आणि पुरेशा समजल्या जाणाऱ्या कायद्याच्या प्रणालीद्वारे सर्वत्र शासित केले जाऊ शकतात...”
वैयक्तिक कायद्याला घटनात्मक संरक्षण आहे. हे संरक्षण संविधानाच्या कलम २५ अन्वये ‘वैयक्तिक कायद्या’पर्यंत विस्तारित केले आहे. ‘वैयक्तिक कायद्याचा’ दर्जा हा मूलभूत अधिकार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. थोडक्यात, प्रत्येक धार्मिक धर्माचा ‘वैयक्तिक कायदा’ हे उल्लंघनापासून संरक्षित आहे.
मुस्लिम कायदा हा वैयक्तिक कायदा असल्याने, त्याची स्वतःची कायदेशीर तत्त्वे आणि नियम आहेत जी विवाह, घटस्फोट, वारसा, ताबा आणि पालकत्व यासारख्या बाबींमध्ये कौटुंबिक संबंधांवर नियंत्रण ठेवतात. त्याची विशिष्ट तत्त्वे त्याला मूलभूत मुद्द्द्यांवर इतर वैयक्तिक कायद्यांपासून वेगळे करतात. ताहिर महमूद यांनी, त्यांच्या पुस्तक ‘’द मुस्लिम लॉ ऑफ इंडिया’’, दुसरी आवृत्ती, अध्याय १२ (वारसा कायदा) परिच्छेद II मध्ये, मुस्लिम कायद्यातील उत्तराधिकाराशी संबंधित खालील विविध संकल्पना स्पष्ट केल्या आहेत, ज्या इतर वैयक्तिक कायद्यांपासून वेगळ्या आहेत.
कायद्यातील संकल्पना
मुस्लिम उत्तराधिकार कायदा मुळात भारताच्या समांतर स्वदेशी व्यवस्थांपेक्षा वेगळा आहे. हिंदू उत्तराधिकाराच्या मिताक्षरा कायद्याचा पाया बनवणारा जन्मतःस्वामित्ववादाचा सिद्धांत (right by birth) मुस्लिम कायद्यात नाही. इस्लाम मधील वारसा हक्काचा कायदा हा हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे तुलनेने शास्त्रीय दयाभाग कायद्याच्या जवळ असला तरी तो अनेक मूलभूत मुद्यांवर भिन्न आहे.
संपत्तीचे स्व-अधिग्रहित आणि वडिलोपार्जित या संकल्पना मुस्लिम कायद्यात नाहीत. वारसाहक्काने मिळालेली कोणतीही मालमत्ता (मग ती पूर्वजांकडून मिळालेली असो किंवा इतरांकडून) मुस्लिम कायद्यानुसार, एखाद्या मुस्लिम स्त्री किंवा पुरुषाची संपूर्ण मालमत्ता (absolute property) असते.
मुस्लिम कायद्यात, जोपर्यंत एखादी व्यक्ती जीवंत आहे तोपर्यंत तो तिच्या मालमत्तेची संपूर्ण मालक असते. इतर कोणालाही (मुलासह) त्यात काहीही अधिकार नसतो. जेव्हा अशा मालमत्तेचा मालक मरण पावेल तेव्हाच त्याच्या वारसांना कायदेशीर हक्क प्राप्त होतील, त्यापूर्वी कधीही नाही.
संयुक्त मालमत्ता (joint Property) किंवा अविभक्त कुटुंब (undivided family), सहृदयाद (coparcenary),कर्ता (karta),अनुजीविताधिकार (survivorship) आणि विभाजन (partition) इत्यादी संकल्पनांना मुस्लिम कायद्यात स्थान नाही.एकत्र राहणारे वडील आणि त्यांचा मुलगा हे ‘’संयुक्त कुटुंब’’ बनत नाही. वडील त्यांच्या मालमत्तेचे मालक आहेत, तर त्यांचा मुलगा (अल्पवयीन असला तरीही) त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेचा मालक असेल. एकत्र राहणाऱ्या भावांची किंवा इतरांचीही तीच स्थिती असते.
हिंदू वारसा कायद्याच्या विपरीत, मुस्लिम स्त्रीला संपत्तीचा वारसा मिळण्यास प्रतिबंध नाही. मुस्लिम कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीला केवळ लिंगाच्या आधारावर वारसा हक्कापासून वगळले जात नाही. स्त्रियांना, पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे मालमत्तेचा वारसा मिळण्याचा अधिकार आहे. शिवाय, प्रत्येक मुस्लिम स्त्री, जिला काही मालमत्ता वारसाहक्काने मिळते ती पुरुषाप्रमाणेच त्या मालमत्तेची पूर्ण मालक (absolute owner) असते.
मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम पुरुष किंवा मुस्लिम स्त्रीला वारसाहक्कात हक्क आहेत, त्यामध्ये स्त्रीसोबत कोणताही भेदभाव नाही.
वारसा हक्क
मुस्लिम वारसाहक्क, मुस्लिम कायद्याच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.मुस्लिम कायद्यांतर्गत सर्व मालमत्ता उत्तराधिकाराने हस्तांतरित होतात, त्यामुळे वारसांचे अधिकार केवळ पूर्वजांच्या मृत्यूनंतर अस्तित्वात येतात. मुस्लिम कायद्यात वारसा हक्काचे परिभाषित नियम आहेत जे पूर्वजांच्या मृत्यूनंतर लागू होतात आणि कोणालाही अशा परिभाषित नियमांमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात आले आहे.
एखाद्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या हयातीत मालमत्तेचे हस्तांतरण करणे आवश्यक असल्यास, ते प्रामुख्याने बक्षीस (हिबा) मार्गाने करू शकतो. इतर पद्धतींमध्ये वसियतनामा/मृत्युपत्र (will) लिहिणे समाविष्ट आहे, परंतु त्यातही काही निर्बंध लादण्यात आले आहेत.
विभाजन (partition)
विभाजन म्हणजे, संयुक्त मालकांतील, त्यांच्या संबंधित हितसंबंधातील मालमत्तेमधील समान हितसंबंधांमध्ये वाटणी करणे आणि अशा स्वारस्यांना (interests) वेगळे करणे, जेणेकरून ते अधिक प्रमाणात मालमत्तेतील मालकीचा आनंद घेऊ शकतील. अशा विभाजनाचा परिणाम असा होतो की संयुक्त मालकी संपुष्टात येते आणि संबंधित हिस्सा लाभार्थीना प्राप्त होतो.
मालमत्तेचे विभाजन फक्त त्यांच्यामध्येच होऊ शकते ज्यांचा त्या मालमत्तेमध्ये हिस्सा (share) किंवा स्वारस्य (interest) आहे. ज्या व्यक्तीचा अशा मालमत्तेत हिस्सा किंवा स्वारस्य नाही तो साहजिकच विभाजनाचा लाभार्थी असू शकत नाही. हिस्सा विभक्त करणे (Separation of share) हे “विभाजन”चे वैशिष्ट आहे.
जेव्हा सर्व सह-मालक वेगळे होतात, तेव्हा ते विभाजन होते. हिस्से (shares) वेगळे करणे अशा कृतीला संदर्भित करते, जेथे अनेक सह-मालक/सहदायक (co-owners / coparceners) पैकी फक्त एक किंवा फक्त काही वेगळे होतात आणि इतर एकत्र राहतात किंवा उर्वरित मालमत्ता सीमांकनानुसार (meets and bounds) विभागल्याशिवाय संयुक्तपणे ठेवतात.
उदाहरणार्थ, जेथे चार भावांची मालमत्ता आहे, ते ती आपापसात सीमांकनाद्वारे विभाजित करतात, ते विभाजन आहे. पण जर फक्त एका भावाला त्याचा हिस्सा वेगळा घ्यायचा असेल आणि इतर तीन भाऊ एकत्र राहतील आणि फक्त एका भावाचा हिस्सा वेगळा करतील.याला आंशिक विभाजनाचे (partial partition) म्हणता येईल.
येथे हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, आंशिक विभाजनाचे (partial partition) तत्त्व मुस्लिम कायद्याला लागू होत नाही. कारण त्यातील वारस हे संयुक्त भाडेकरू (tenants-in-common) आहेत. मयत मुस्लिम व्यक्तीचे वारस त्याच्या मालमत्तेच्या प्रत्येक भागाच्या निश्चित अंशापर्यंत वारस ठरतात.
वारसांचे हिस्से (shares)
मुस्लिम कायद्यांतर्गत वारसांचे हिस्से हे पूर्व प्रमाणात निश्चित असतात आणि प्रत्यक्ष विभाजनापूर्वी ज्ञात असतात. त्यामुळे मयत मुस्लिम व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेचे विभाजन करताना कायद्याने आधीच ठरवलेल्या प्रत्येक वारसाचा विशिष्ट हिस्सा आणि सीमांकनानुसार विभागणी केली जाते. एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे वारसांमध्ये विभाजन शक्य आहे. एखादी व्यक्ती जीवंत असताना मालमत्तेचे विभाजन कसे होते, याची कोणतीही तरतूद नाही. म्हणजेच एखादी मुस्लिम व्यक्ती जीवंत असताना त्याच्या वारसांमध्ये विभाजन करण्यास परवानगी नाही. पूर्वजांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे विभाजन कशा पद्धतीने होईल, हे मुस्लिम कायद्यामध्ये सखोलपणे सांगितले आहे.
पुढील भागात आपण मुस्लिम धर्मीयांचे विभाजन, हिस्सा, पद्धत, हक्क व वारस कोण कोण होईल याबाबत विस्तृत पाहणार आहोत.
: bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.