
Chhatrapati Sambhajinagar News : लिलावात सुमारे ४०६ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून २ कोटींंपेक्षा जास्तीची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्याला वैजापूर पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले आहे. सोलापूर येथील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेतले. या व्यापाऱ्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सागर सुनील राजपूत (वय ३०, रा. मकरमतपूरवाडी, ता. वैजापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, बाजार समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये सागर राजपूत याची साई बालाजी ट्रेडिंग कंपनी या नावाचे दुकान आहे. सागर हा लिलावात बोलीत सहभागी होऊन कांद्याची खरेदी करीत असे.
सागरने १ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२४ या काळात जवळपास ४०६ शेतकऱ्यांचा कांदा वेगवेगळ्या दिवशी लिलावात सर्वोच्च बोली बोलून खरेदी केला होता. या शेतकऱ्यांना पुढील ८-१० दिवसांच्या तारखेचे चेक देऊन सागर फरार झाला. हे चेक बँकेत वठण्यापूर्वी सागर फरार झाल्याने शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबर रोजी बाजार समितीत धाव घेतली.
४०६ शेतकऱ्यांचे सागर राजपूतकडे २ कोटी ५ लाख ७५ हजार ४९७ रुपये थकल्याची बाब समिती प्रशासनाला समजली. त्यामुळे समिती सचिव व कर्मचाऱ्यांनी सागरला संपर्क साधला असता त्याने मी सध्या बाहेर आहे. पैसे देण्यासाठी मला थोडी सवलत द्या, मी शेतकऱ्यांचे सर्व पैसे देऊन टाकतो असे सांगितले.
सागर हा ठरल्याप्रमाणे आला नाही. त्यातच शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने गुरुवारी (ता.१४) सागर राजपूत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, सोमवारी (ता.२५) सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे पैसे मिळावे यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी राडा घातला. समितीच्या मासिक बैठकीच्यावेळी शेतकऱ्यांनी या ठिकाणी सभापती, संचालक व प्रशासनाला धारेवर धरले होते.
शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका बघता पोलिसांना पाचारण करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी तीन पथके सागर राजपूतचा शोध घेण्यासाठी पाठविले होते. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सागर हा सोलापुरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कौठाळे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सोलापूरमधील एका लॉजमध्ये दडून बसलेल्या सागरला ताब्यात घेतले. व्यापाऱ्याकडे कांद्याची थकीत रक्कम शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बुधवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी वैजापूर बाजार समितीचे सभापती यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांचे पैसे ५ डिसेंबरपर्यंत न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्याचवेळी पाच मागण्या शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर केल्या आहेत. या निवेदनावर पावणेदोनशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वैजापूर पोलीस अटक केलेल्या व्यापाऱ्याला तामिळनाडूत तपासकामी घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.