
Devrai Akyan:
पुस्तकाचे नाव : देवराई आख्यान
लेखिका : अर्चना जगदीश
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन,पुणे
पाने : ४४०
किंमत : ८०० रुपये
देवराई म्हणजे गावकऱ्यांनी ग्रामदेवतेसाठी राखून ठेवलेलं जंगल. अनादी काळापासून गावशिवार, डोंगर दऱ्यात असलेल्या देवराईंचा देश, परदेशातील संशोधक, अभ्यासक, निसर्गप्रेमींनी विविध अंगांनी अभ्यास केला आहे. खरं तर देवराई ही अनेक दुर्मीळ वनस्पती, पशुपक्षी आणि प्राचीन संस्कृतीचा खजिनाच म्हणावा लागेल. अमर्याद वृक्षतोड, हवामान बदलाच्या काळात देवराईचे महत्त्व सर्वांना समजू लागले आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या देवराईंचा शास्त्रीय आणि सांस्कृतिक अंगाने महत्त्वपूर्ण अभ्यास ‘ए.ई.आर.एफ.’ संस्थेच्या संचालिका डॉ. अर्चना गोडबोले यांनी ‘देवराई आख्यान’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आणला आहे.
गेली तीन दशके डॉ. गोडबोले ‘ए.ई.आर.एफ.’ संस्थेच्या माध्यमातून राज्य, देश आणि परदेशातील देवराईंचा अभ्यास करत आहेत. याचे सार त्यांनी पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे. पुस्तकात आठ विभागांमध्ये ३१ विषय मांडलेले आहेत. त्यामुळे विविध विषय टप्प्याटप्प्याने अभ्यासणे वाचकांना सोपे जाते, तसेच संकल्पना चांगल्या रीतीने समजतात. पहिल्या काही विभागांमध्ये देवराई म्हणजे काय?
भारतातील विविध विभागांतील परंपरा, वेगवेगळ्या समाजांची देवराईशी जोडलेली संस्कृती, नद्यांचे उगमस्थान आणि स्थानिक लोकजीवनाचा देवराईसोबत असलेल्या संबंधांचा अभ्यास वाचायला मिळतो. देवराई संदर्भातील काही लोककथा पुस्तकात आहेत. भारतातील विविध प्रसिद्ध तसेच दुर्लक्षित देवरायांची माहिती आहेच, त्याचबरोबरीने नेपाळ, ग्रीस, पेरू, आफ्रिका, मंगोलिया, थायलंड आदी देशातील लोकजीवन आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी देवराई कशी महत्त्वपूर्ण ठेवा आहे, याची देखील सविस्तर माहिती वाचायला मिळते.
देश, परदेशातील अभ्यासकांनी कोणकोणत्या पद्धतीने देवराई समजून घेतली, त्यांचे संशोधन आणि नोंदीचा आढावा सध्याच्या काळातील विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. यामध्ये प्रामुख्याने निसर्ग आणि पाश्चिमात्य दृष्टिकोन, आफ्रिका खंडातील देवराया, धर्म आणि पवित्र निसर्ग, लोकदेवता आणि देवराई प्रथा या प्रकरणातून देवराई कशी विस्तारत गेली,त्यांचे मानवी संस्कृतीमध्ये कसे स्थान अजूनही अबाधित राहिले आहे, याचा संदर्भ वाचायला मिळतो. भारतातील विविध राज्यांतील देवराया या निसर्गाचा अमूल्य ठेवा आहेत. त्यामुळे डॉ. गोडबोले यांनी राज्य आणि प्रदेशनिहाय देवरायांची अभ्यासपूर्ण माहिती विविध विभागांच्या माध्यमातून मांडलेली आहे.
यामध्ये प्रामुख्याने कोकण-उत्तर सह्याद्री रांगांतील देवराईंची मांडणी करताना देवरहाटी व्यवस्थापन, कोकणातील देवराई, गोव्यातील देवरानांचे विवेचन केले आहे. दक्षिण भारतातील देवराईंची माहिती देताना कर्नाटकातील कान आणि देवराकाडू, केरळ राज्यातील कावू आणि सर्पकावू, तमिळनाडूतील कोविलकाडू यांची सविस्तर माहिती वाचायला मिळते. हिमालय परिसर, सिक्कीम या भागातील देवराईंची काय परंपरा आहे, निसर्ग संवर्धनात त्यांचे महत्त्वाचे स्थान कशा पद्धतीने अबाधित आहे, याची माहिती अभ्यासपूर्ण आहे. याचबरोबरीने वाळवंटातही देवराई म्हणजे देवबनी, ओरण या पंरपरा अभ्यासण्यासारख्या आहेत.
आदिवासी लोकांच्या जीवनात देवराई हा महत्त्वाचा भाग आहे. लोकपरंपरा, संस्कृतीच्या माध्यमातून या लोकांनी देवराई जतन कसे केले, जैवविविधता संवर्धनात त्यांचा कशा पद्धतीने सहभाग आहे, याबाबत स्वतंत्र विभाग पुस्तकामध्ये आहे. तसेच विविध देवराईंची छायाचित्रे दिलेली आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या विभागात देवराईंची सध्याची परिस्थिती आणि संवर्धन कशा पद्धतीने आणि का करणे आवश्यक आहे, त्यासाठी कोणते कायदे आहेत, याचेही संदर्भ दिले आहेत. देवराई सोबत वारसा आणि इतिहास, संरक्षणासाठी कृती कार्यक्रम आणि देवराईचे पुनरुज्जीवन कसे करता येईल,याबाबत मार्गदर्शन आपल्याला मिळते. पुस्तकाच्या शेवटी टिपा आणि निवडक संदर्भ सूची देखील विद्यार्थी, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी दिशादर्शक ठरणारी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.