Tukayan Book Review : मनाचिये गुंती गुंफियेला शेला

Tukayan Book : नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘तुकायन’ या पुस्तकाचे लेखक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक सांगतात, ‘‘आम्ही सर्वच मनोविकारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांची आरईबीटी म्हणजेच, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही समुपदेशन पद्धती अनेक मनोविकार रुग्णांसाठी वापरतो.
Tukayan Book Review
Tukayan Book ReviewAgrowon
Published on
Updated on

New Book : नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘तुकायन’ या पुस्तकाचे लेखक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक सांगतात, ‘‘आम्ही सर्वच मनोविकारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांची आरईबीटी म्हणजेच, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही समुपदेशन पद्धती अनेक मनोविकार रुग्णांसाठी वापरतो. संत तुकारामांची गाथा वाचतानाही आपले मन आपणास अनेक गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्यास विवेकी चिकित्सा करण्यास भाग पाडते.’’

Tukayan Book Review
Book Review: ऊसतोड मजुरांची साखरेहून कडू कहाणी!

डॉ. नाईक यांच्या या प्रतिपादनाचा आपण विचार केल्यास आपल्याही लक्षात येते, की मानवी मनाचे खेळ आणि मनाच्या गुंतागुंतीतून निर्माण होणारे गुंते विवेकीपणाने सोडविता येतात. गुंत्यांची कारणे, अपाय रोखण्यासाठी आणि उपाय सांगण्यासाठी डॉ. नाईक संतकवी तुकारामांचे अभंग प्रस्तुत पुस्तकात उद्‍धृत करतात. अभंगांचे अर्थ सांगतात. अभंगांचा आधार घेत प्रत्येक माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्‍नांची आणि समस्यांची उकल फारच सूचकपणे करतात.

विविध उदाहरणे, वैज्ञानिकपणा, प्रासंगिक बंडखोरपणा आणि नवसाध्यता सूत्ररूपाने सांगताना डॉ. नाईक वाचकांना पुस्तकात खिळवून ठेवतात. प्रयत्न, परिस्थिती एकरूपता, निर्णयक्षमता, मानवी स्वभावाची स्वजाणीव, कर्माची धारणा, मानवी क्षमता आणि मर्यादा प्रस्तुत पुस्तकात अधोरेखित करून डॉ. नाईक खऱ्या अर्थाने सर्वांचेच ‘जीवन वाटाड्या’ होतात. इतरांच्या जीवनात आनंद, सुख, सहकार्यवृत्ती, गुणग्राहकता, परस्परप्रेम, सामाजिक एकजिनसीपणा पेरतात. समाजबांधणी करून राष्ट्रकार्याची जाणीव ठाशीव करण्यासाठी आणि प्रामाणिकपणा हे मूल्य जपण्यासाठी, कर्मप्रेरणा देण्यासाठी डॉ. नाईक यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन जाणीवेने केलेले आहे.    

हे पुस्तक म्हणजे लेखसंग्रह असून त्याचे चार भाग पाडण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिला भाग तुकोबांचा प्रयत्नवाद असा आहे. त्यामध्ये १२ उपभागांचे/ प्रकरणांचे लेखन आहे. दुसरा भाग तुकोबांचे भावविश्‍व असा असून त्यामध्येही १२ उपभागांची/ प्रकरणांची अभिव्यक्ती आहे. तिसरा भाग तुकोबांचे सामाजिक प्रश्‍न व उपाय असून त्यात ११ उपभाग/प्रकरणे समाविष्ट आहेत. चौथा भाग विद्रोही तुकाराम असा असून, यामध्ये ६ उपभाग/ प्रकरणांचा अंतर्भाव केलेला आहे. 

या पुस्तकात अभंगांच्या निरुपणाची ‘नाइकीशैली’ आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर येणारा वाचनानुभव अत्यंत बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक आहे. संतकवी तुकारामांनी माणसांना ‘मन करा रे प्रसन्न’ असा बोध केला आणि प्रसन्न मनाने होणारे प्रत्येक कर्म माणसाचा सर्वार्थाने अभ्युदय करते, हे सिद्ध करण्यात डॉ. नाईक संशोधनाच्या पातळीवर यशस्वी झालेले आहेत. सर्वसामान्यांचा विचार करून हे पुस्तक काळजाचा ठाव घेणाऱ्या भाषेचा उपयोग करून लिहिलेले आहे. 

पुस्तकाचे नाव ः तुकायन

लेखक ः डॉ. जगदीश हरिबाई ज्ञानोबा नाईक 

प्रकाशक : ज्ञानसाधना पब्लिकेशन, पनवेल-रायगड

पाने : १७५

स्वागत मूल्य : २१० रु.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com