Banana Disease : केळीमधील फ्युजारियम मर रोगाचे नियंत्रण

Fusarium wilt : केळी पिकावर येणारा फ्युजारियम मर (विल्ट) हा मातीमधून पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. हा ‘पनामा मर’ या नावाने ओळखला जातो.
Banana Disease
Banana DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रशेखर पुजारी, डॉ. विजयराज गुजर

केळी पिकावर येणारा फ्युजारियम मर (विल्ट) हा मातीमधून पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. हा ‘पनामा मर’ या नावाने ओळखला जातो. हा रोग जमिनीतील फ्युजारियम ऑक्झोस्पोरम क्युबेनसिस या बुरशीमुळे होतो. या बुरशीचे वेगवेगळे वंश असून,

यातील टी-४ (ट्रॉपिकल-४) हा वंश अत्यंत घातक आहे. कारण हा वंश व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या कॅव्हेंडिश गटातील सर्वच जातींवर येतो. महाराष्ट्रात ग्रॅडनैन ही व्यावसायिक लागवडी खालील जात कॅव्हेंडिश गटातील आहे.

फ्युजारियम बुरशीचा प्रसार कोनिडिया आणि क्लॅमेयडोस्पोअर्स या अलैंगिक बीजांणूमुळे होतो. तसेच क्लॅमेयडोस्पोअर्स या जमिनीत दीर्घकाळ राहत असल्याने हा बुरशीजन्य रोग घातक आहे. देशात या रोगाचा प्रादुर्भाव तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात आढळून येतो. सुदैवाने महाराष्ट्रात त्याची अद्याप तरी नोंद नाही.

असे असले तरी निष्काळजी राहून चालणार नाही. यासाठी काही बाबी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास किंवा त्या भागात अगोदरच अस्तित्वात असलेल्या रोगाचा एकदम उद्रेक झाल्यास त्यास हवामानातील बदल हे कारण सांगितले जाते. परंतु एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव किंवा उद्रेक अचानक होत नाही. त्यास मानवी चुकादेखील कारणीभूत ठरतात.

Banana Disease
Banana Disease : जळगावात केळीवर करप्याचा फैलाव

रोगाचा प्रसार

मातीमध्ये असलेल्या बुरशीमुळे, कंदावरील मातीद्वारे किंवा रोपांजवळील माती, शेतीची अवजारे, पादत्राणे, ट्रॅक्टर, वाहने, सिंचन आदींद्वारे रोगाचा होतो. म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रणाचे उपाय महत्त्वाचे आहेत.

व्यवस्थापनातील बाबी

या बुरशीजन्य रोगासाठी प्रतिबंधात्मक म्हणजेच जैविक नियंत्रण, जैव सुरक्षेचे उपाय महत्त्वाचे आहेत.

केरळ कृषी विद्यापीठाने एकात्मिक नियंत्रणाची शिफारस केली आहे. यामध्ये स्युडोमोनास फ्लोरेसन्स या जैविक घटकाची कंद प्रक्रिया करणे, अ‍ॅरब्युस्क्युलर मायकोरायझा आणि ट्रायकोड्रर्मा प्रजाती शेणखतात मुरवून लागवडीच्या वेळेस जमिनीतून वापरणे आणि ट्रायअझोल गटातील टेब्युकोनॉझोल या बुरशीनाशकाची लागवडीनंतर २ आणि ४ महिन्यांनी आळवणी करणे यांचा समावेश होतो.

स्ट्रेप्टोमायसेस आणि बॅसिलस हे जैविक घटकदेखील या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आढळून आले आहेत.

रासायनिक खतांचा विशेषत: नत्राचा काटेकोर वापर आणि एक पीक पद्धती टाळून पिकांची फेरपालट या पूरक उपायांचा अवलंब महत्त्वाचा आहे.

वरील सर्व उपायांना मर्यादा आहे. यासाठी निर्जंतुकीकरण, जैव सुरक्षितता आणि क्वारंटाइन नियमांचा काटेकोर अवलंब अत्यंत महत्त्वाचा आहे.

शेती अवजारे, पादत्राणे, ट्रॅक्टर, अन्य वाहने आदींचे निर्जंतुकीकरण करावे.

नावीन्यता म्हणून किंवा कॅन्हेव्डीश आणि इतर जनुक समुच्चयातील (जिनोमिक गट) इतर जाती परराज्यांतून आणून त्यांची लागवड करू नये.

उतिसंवर्धित रोपे निर्मितीतील कंपन्यांनी रोपे तयार करण्यासाठी कंदासाठी स्वत:च्याच मातृबागा लावाव्यात. परराज्यांतून किंबहुना राज्यातील इतर भागांतून देखील कंद आणू नये.

उतिसंवर्धित रोपे तयार करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्राव्यतिरिक्त केळी लागवड करणाऱ्या इतर राज्यांत देखील रोपे पुरवठा करतात. वाहने, माणसे यांच्या वावरामुळे मातीच्या दूषित कणांद्वारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो.

शासनाद्वारे देखील क्वारंटाइन नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच भविष्यातील फ्युजारियम मर रोगाचा धोका टाळता येईल.

कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या शिफारशींचा अवलंबून करून शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून बागा निरोगी ठेवाव्यात.

Banana Disease
Banana CMV Disease : केळी सीएमव्हीबाबत जिल्हास्तरावर समिती

लक्षणे

जुन्या पानांच्या कडा पिवळसर पडण्यास सुरुवात होऊन नंतर संपूर्ण पान पिवळे पडते. कालांतराने पानाच्या कडा तपकिरी काळपट पडून पान मृतवत होते. असे पान खोडापासून सुटते किंवा देठाजवळ मोडून पडते.

नवीन पाने हिरवी राहत असली तरी ती निस्तेज राहतात.

बऱ्याच वेळा अशी लक्षणे पिवळा सिगाटोका (करपा), इर्विनिया जिवाणू मर किंवा सीएमव्ही विषाणू रोगासारखी दिसतात.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

- डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६

(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com