Chhatrapati Sambhajinagar : जनतेला आणि जनावरांना पिण्याचे पाणी पुरविण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पिण्याचे पाणी इतर कुठल्याही कामासाठी वापरले जाऊ नये. तूर्त जनावरांच्या चाऱ्याची टंचाई नाही, मात्र आवश्यकता पडली तर चारा उपलब्ध करून दिला जाईल, तशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठवाड्यातील टंचाई स्थिती व दुष्काळाचा आढावा घेतला. या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंत यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल तसेच सचिव, विभागीय आयुक्त, मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की मराठवाड्यात आताच्या घडीला १२४९ गावे व ५१२ वाड्यांत १८३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास टँकरच्या संख्येमध्ये वाढ केली जाईल जिथे कुठे पाण्याची टंचाई जाणवत असेल त्याची माहिती प्रशासनाला दिल्यास तीन दिवसांत टँकरची सोय करण्याची व्यवस्था केली आहे. शुद्ध आणि दर्जा तपासलेले पाणी जनतेला मिळावे. सोबतच जनावरांनाही पिण्याचे पाणी पुरविले जावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. चारा उत्पादनासाठी मध्यंतरी दिलेल्या बियाणे मदतीमुळे तूर्त चाऱ्याची टंचाई कुठे नाही; परंतु आवश्यकता भासली तर चारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री काय म्हणाले...
थकित वीजबिलापोटी पाणीपुरवठा योजना बंद पडू नये.
जल पुनर्भरणाचे प्रकल्प तातडीने हाती घ्यावे.
पाणी प्रश्नांवरील विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारसाठी यंत्राला लागणारे डिझेल पुरवठा करा.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी.
परवानाधारक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा.
एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या समन्वयातून आपत्कालीन स्थिती नियंत्रण कक्ष अद्ययावत करा
बोगस बियाणे व काळाबाजार करणाऱ्यांची गय नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.