Fruit Farming : टिळेकर यांचा पेरू उत्पादनात हातखंडा

Guava Cultivation : नगर जिल्ह्यातील राहाता हा पेरूसाठी प्रसिद्ध असलेला पट्टा. येथील संदीप टिळेकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक असलेली पेरू लागवडीची परंपरा अनेक अडचणी पार करून आजही जोमाने जोपासली आहे.
Fruit Farming
Fruit FarmingAgrowon

सूर्यकांत नेटके

Peru Farming : नगर जिल्ह्यातील राहाता हा पेरूसाठी प्रसिद्ध असलेला पट्टा. येथील संदीप टिळेकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक असलेली पेरू लागवडीची परंपरा अनेक अडचणी पार करून आजही जोमाने जोपासली आहे. सध्या पंधरा एकर असलेल्या क्षेत्रावर दोन बहरांचे व्यवस्थापन, प्रयोगशीलता व बाजारपेठांचे नियोजन यांच्या साह्याने या पिकात हातखंडा तयार केला आहे.

नगर जिल्ह्यातील राहाता तालुका हा पेरूसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. अनेक अडचणी पार करून
येथील शेतकऱ्यांनी पेरूची पारंपरिक शेती चांगल्या प्रकारे जोपासली आहे. याच राहाता येथील संदीप जनार्दन टिळेकर यांचा संयुक्त कुटुंबाचा शंभर सदस्यांचा परिवार आहे.

संदीप यांचे आजोबा दिनकरराव शंकरराव टिळेकर यांनी १९७० च्या आधी पेरूची लागवड केली होती. तीच परंपरा पुढील पिढ्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ जोपासली आहे. टिळेकर हे पूर्वाश्रमीचे कदम. सुरतेची लूट करून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कपाळी टिळा लावण्याचा मान या कुटुंबाला मिळाला. तेथून त्यांचे टिळेकर हे आडनाव पडले.

पेरूची शेती

संदीप यांचे कुटुंब सध्या स्वतंत्र असून, त्यांची वडिलोपार्जित पंधरा एकर शेती आहे. बारावीपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स विषयात शिक्षण झाल्यानंतर संदीप यांनी शेतीलाच प्राधान्य दिले. आई सुलोचना, पत्नी रूपाली यांचीही मदत त्यांना होते. तीन वर्षांपासून सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. वीरभद्र नावाचा त्यांचा सेंद्रिय शेतकरी गटदेखील असून, त्यात २० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

संदीप यांच्या वडिलांनी १९९४ मध्ये साडेसात एकरांत लखनौ ४९ वाणाच्या पेरूची लागवड केली. त्या वेळी या भागात अठरा बाय अठरा फूट अंतरावर लागवड असायची. त्यातून एकरी १३० ते १३५ पर्यंत झाडे बसत. कालांतराने काही शेतकऱ्यांनी १० बाय सहा फूट किंवा सघन पद्धतीने लागवड सुरू केली. संदीप यांनी मात्र जुन्याच सूत्रानुसार २००६ मध्ये पुन्हा सात एकरांवर लागवड केली.

Fruit Farming
दर्जेदार पेरू, खरबूज उत्पादनात हातखंडा

पेरूबागेचे व्यवस्थापन (ठळक बाबी)

- संदीप सांगतात, की जुन्या सूत्रानुसार लागवडीचा फायदा सतरा ते अठरा वर्षांनी दिसून येत आहे. झाडे मोठी झाली तरी सुसूत्रता, मोकळी हवा आणि आवश्यक मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत, फवारणी करणे सोपे जाते. एकरी सुमारे १३४, तर पंधरा एकरांत सुमारे दोन हजार झाडे आहेत.
-पूर्वी या भागातील शेतकरी बाजारातील मागणीनुसार मृग आणि हस्त असे दोन्ही बहर घ्यायचे.
मध्यंतरी दहा वर्षांमध्ये कमी पाऊस, पाण्याची कमतरता, किडी- रोगांचा त्रास आदी कारणांमुळे शेतकरी केवळ हस्त बहर घेऊ लागले. संदीप मात्र दोन्ही बहर घेतात.
-हस्तातील पेरू जानेवारी ते मार्च दरम्यान येतो. तोडणी संपल्यानंतर एक महिना बागेचे पाणी तोडले जाते. दोन बहरांमुळे अनेक वेळा छाटणी करता येत नाही. मात्र दोन्ही बहरांमधील स्थिती पाहून त्याचे नियोजन होते.

Fruit Farming
Fruit Export : आता ‘फ्रूटनेट’मध्ये पेरू, अंजीर, सीताफळाचाही समावेश होणार

-एप्रिलमध्ये झाडाला बोर्डो पेस्ट लावली जाते. त्यात हिंग, गोमूत्र, कापूर आदींचा वापर होतो.
त्या गंधामुळे किडी झाडाकडे आकर्षित होत नसल्याचे संदीप सांगतात.
-बाग नवी असताना पाच ते सहा वर्षे सोयाबीनसारखे आंतरपीक घेण्यात येते.
-राहातासह अनेक भागांत फळमाशीची समस्या आहे. त्यासाठी एकरी १० प्रमाणात प्लॅस्टिक बाटलीचा वापर सापळा म्हणून केला आहे. त्यात किडीला आकर्षित करणाऱ्या गंध रसायनाचा वापर होतो. त्यातून माशीवर नियंत्रण आले आहे.
-कायमस्वरूपी पाच ते सात मजूर तर तोडणीच्या काळात दहा ते पंधरा मजूर तैनात असतात.
अकोले तालुक्यात त्यांना बोलावून राहण्याची व्यवस्था केली जाते. दोन बहरांमुळे मजुरांनाही पाच ते सहा महिने रोजगाराची सोय झाली आहे.

उत्पादन

-लखनौ ४९ हे वाण अधिक उत्पादनक्षम असल्याने त्याची निवड. त्याची गोडीही फार चांगली.
-आमच्या राहाता पट्ट्यातील पेरूची गोडी अन्य ठिकाणांपेक्षा अधिक असल्याचे संदीप सांगतात.
-त्यांच्याकडील पेरूची झाडे ३० ते ४० वर्षांहून अधिक वयाची. प्रति झाड प्रति बहर १०० ते १३० किलोपर्यंत उत्पादन. दुसऱ्या बहरातही त्या दरम्यानच उत्पादन.

विक्री व्यवस्था

-सध्या मृग बहरातील काढणी हंगाम सुरू. या बहरात सरासरी दर किलोला १५ ते २० रुपये.
-गुजरातमध्ये या काळात मागणी अधिक.
-हस्त बहरातील फळांना हाच दर २५ ते ३० रुपये. मुंबईत या काळात मागणी अधिक. त्यास कमाल ४० ते ४५ रुपये दर. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने आवकही कमी असल्याचा फायदा मिळतो.
-खरेदीसाठी राहाता येथे राज्यासह राज्याबाहेरूनही व्यापारी येतात. संदीप गुजरातेतील सुरत, अहमदाबाद, राजकोट यांसह मुंबईत पेरू पाठवतात. वाहन जागेवर येऊन माल भरून घेऊन जाते.
-जास्त पिकलेली फळे प्रक्रियेसाठी नाशिक, ओझर आदी भागांत पाठवण्यात येतात. त्यांना किलोला ३ ते ५ रुपये दर मिळतो.

रोपवाटिका आणि संवाद

तालुक्यातील अस्तगाव येथे संदीप यांचे आजोबा दिनकरराव यांनी पन्नास वर्षांपूर्वी पेरू, मोसंबी, लिंबू यांची रोपवाटिका सुरू केली. जिल्ह्यातील ती पहिलीच असावी. रोपांना मागणी चांगली असायची. मात्र मध्यंतरी पाऊस व अन्य कारणांमुळे ती बंद केली. ती सुरू ठेवण्याचे संदीप यांचे प्रयत्न आहेत. टिळेकर कुटुंबातील प्रत्येकाची शेती वेगवेगळी असली, तरी सर्व भाऊबंद एकत्र येऊन चर्चा करतात. त्या संवादातूनच पेरू उत्पादनात प्रगती साधली.

मधमाशीसाठी शेवगा लागवड

बागेत बांधावर शेवग्याची काही झाडे होती. त्यास वर्षभर फुले असतात. साहजिकच मधमाश्‍यांचा सतत वावर असतो. पेरूचे दोन्ही बहर घ्यायचे तर मधमाशी असली पाहिजे या दृष्टिकोनातून दोन वर्षांपूर्वी १० गुंठ्यांत शेवगा लागवड केली. परिणामी, परागीभवन व फळांच्या संख्यावाढीला फायदा झाला आहे. पेरूच्या मोठ्या झाडांवर मधपोळी तयार झाली आहेत.

राहाता- पेरूचे हब

राहाता तालुक्याला भंडारदरा, तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळते. त्यामुळे शेती बऱ्यापैकी समृद्ध आहे. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ‘आत्मा’चे तालुका समन्वयक राजदत्त गोरे यांचे सहकार्य शेतकऱ्यांना होते. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात १४०३ पर्यंत पेरू उत्पादक असून, सुमारे १२५२ हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. भाविकांचे दैवत सद्‍गुरू साईबाबा देवस्थान याच तालुक्यात असल्याने शेतकऱ्यांना येथे बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
-------
संपर्क ः संदीप टिळेकर, ९६५७६१९७३२
--------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com