दर्जेदार पेरू, खरबूज उत्पादनात हातखंडा

कानळदा (ता.जि. जळगाव) येथील रवींद्र राजाराम भोई व त्यांचे पूत्र समाधान यांनी लीजवर ४० एकर शेती फुलवली आहे. त्यात पेरू, सीडलेस लिंबू व खरबुजाचे दर्जेदार उत्पादन घेताना थेट विक्रीसाठी तीन स्टॉल चालवले आहेत. खरबूज पिकाचे अचूक व्यवस्थापन आणि आडाखे यामुळे उत्तम शेतकरी म्हणून ओळखले जातात.
दर्जेदार पेरू, खरबूज उत्पादनात हातखंडा
दर्जेदार पेरू, खरबूज उत्पादनात हातखंडा
Published on
Updated on

कानळदा (ता.जि. जळगाव) येथील रवींद्र राजाराम भोई व त्यांचे पूत्र समाधान यांनी लीजवर ४० एकर शेती फुलवली आहे. त्यात पेरू, सीडलेस लिंबू व खरबुजाचे दर्जेदार उत्पादन घेताना थेट विक्रीसाठी तीन स्टॉल चालवले आहेत. खरबूज पिकाचे अचूक व्यवस्थापन आणि आडाखे यामुळे उत्तम शेतकरी म्हणून ओळखले जातात. खानदेशामध्ये भोई समाज नदीकिनारी परंपरेने कलिंगड, खरबूज शेती करतात. रवींद्र हेही बालपणापासूनच आपल्या वडिलांसोबत कलिंगड, खरबूज शेतीत मदत, व्यवस्थापन करत. गेल्या काही वर्षांत नदीचे प्रवाह बंद झाल्याने शेती लीजवर घेत कलिंगड, खरबुजाची शेती सुरू केली. वडिलोपार्जित शेती नसल्याने तुरखेडा (ता. जळगाव) शिवारात रवींद्र राजाराम भोई आणि त्यांचा मुलगा समाधान यांनी गेल्या चार वर्षापासून पंकज चौधरी यांची ४० एकर शेती लीजवर घेतली आहे. फळबागेखालील आठ एकरसाठी २० हजार रुपये प्रति वर्ष, तर उर्वरित २८ एकर क्षेत्रासाठी १२ हजार रुपये प्रतिवर्ष असा दर करार आहे. लिंबू, पेरूची फळबाग, त्यातील सिंचनसामग्री, कुंपण, सीसीटीव्ही आदी व्यवस्था शेती मालक चौधरी यांनीच करून दिली आहे. त्याची व्यवस्थित हाताळणी, दुरुस्तीची जबाबदारी भोई यांच्याकडे आहे. मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर व इतर यंत्र, अवजारे आहेत. वांग्याने दिले यश मध्यंतरी चार एकर क्षेत्रात त्यांनी वांगी पिकाचे उत्पादन घेतले. यातून चांगला नफाही मिळाला. या नफ्यातून कानळदा या आपल्या गावी टुमदार घरही बांधले. पीक व्यवस्थापन एकूण आठ एकर फळबाग असून, पाच एकरांत पेरूची १३०० झाडे आणि तीन एकरांत लिंबाची ५०० झाडे आहेत. या दोन्ही बागा गादीवाफ्यावर आहेत. संपूर्ण बागेसाठी ठिबक सिंचन व्यवस्था असून, त्याद्वारे खत नियोजन केले जाते. सर्व जमीन मध्यम, काळी कसदार आहे. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करतात. बहुतांश व्यवस्थापन रवींद्र व समाधान पार पाडत असले तरी गरजेनुसार फळांची काढणी, विक्री या काळात बाहेरून मनुष्यबळाची मदत घेतली जाते.  पेरूचे दोन हंगाम घेतात. पहिला हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत असतो. पेरूचे उत्पादन सुमारे दीड महिना सतत सुरू असते. पेरू तयार होतेवेळीच त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी फोम लावतात. एक फोम एक रुपये १० पैसे या दरात तर पेरू ठेवण्यासाठी आवश्यक पॉलिथिनची पिशवी एक रुपये आठ पैशात पडते. राजकोट येथून ही सामग्री घाऊक दरात मागवून घेतात. कमी दर्जाची फळे झाडावरच वगळली जातात. त्यांना फोम लावले जात नाही. हंगामात पेरूची रोज पाच क्विंटल एवढी फळे निघतात. लिंबाचे बारमाही उत्पादन घेतले जाते. रोज ५० किलो लिंबू विक्रीसाठी काढला जातो. उर्वरित २८ एकरांत कापूस, सोयाबीन, उडीद ही पिके असतात. रब्बीमध्ये किंवा हिवाळ्यात त्यात खरबूज व अन्य रब्बी पिके घेतात. खरबुजाची दरवर्षी जानेवारीत आठ ते १० एकरांत लागवड करतात. भोई यांना या वेलवर्गीय पिकांचा किशोरावस्थेपासून चांगला अभ्यास आहे. त्यावरील कीड, रोग, अन्य व्यवस्थापन या सोबतच बाजारपेठेची मागणी, एकूण खर्च, उत्पादनाचे गणित यांचे काही आडाखे आहेत. त्यानुसार ते व्यवस्थापन करतात. पेरू, लिंबाची थेट विक्री पेरू व लिंबाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. त्यासाठी जळगाव शहरात घाणेकर चौकानजीक व काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयानजीक स्टॉल असतो. तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनात फळबागेनजीक जळगाव-विदगाव मुख्य मार्गावरही फळे विक्रीचा स्टॉल आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, मंडळ कृषी अधिकारी एम.जी.जंगले, ‘आत्मा’चे तालुका समन्वयक सोनू कापसे, कृषी सहायक भारत पाटील यांनी मदत केली. या तीन स्टॉलवर सर्व पेरू, लिंबू विकले जातात. गेल्या तीन वर्षांत बाजार समिती किंवा व्यापाऱ्यांना एकदाही विक्री करण्याची गरज भासलेली नाही. थेट विक्रीतून ग्राहकांना दर्जेदार फळे रास्त दरात देऊनही भोई यांना बऱ्यापैकी नफा राहतो. खरबुजाची मात्र थेट जागेवर व्यापाऱ्याला विक्री करतात. कोविडच्या काळात झालेल्या टाळेबंदीमध्ये पेरू, लिंबू, खरबूज या पिकात नुकसान झाले. मात्र शेतातील थेट विक्रीच्या स्टॉलमुळे घरखर्च तरी भागू शकला, असे भोई सांगतात. -तुलनेने लिंबूला मागणी कमी आहे. मागणीच्या प्रमाणात काढणी केली जाते. परिणामी, लिंबू बागेतून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. -गेले दोन वर्षे पेरूला किमान ५० व कमाल ७० रुपये व सरासरी ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. हिवाळ्यात पेरूला अधिकचा उठाव असतो. उन्हाळ्यात मात्र मागणी कमी असते. -गेल्या दोन वर्षांत सीडलेस लिंबाला प्रतिकिलो सरासरी ५० रुपये मिळाला आहे. तर खरबुजाला किमान १० व कमाल १५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला. यंत्रणेचा वापर मिनी ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, सऱ्या पाडण्याची यंत्रणा, पेरणी यंत्र, मल्चिंग पेपर टाकण्याचे यंत्र भोई यांच्याकडे आहे. फळबागेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा शेतात असून, पीक संरक्षणासाठी बागेभोवती शॉकप्रूफ कुंपण आहे. समाधान स्वतः ट्रॅक्टर चालवितात. तसेच थेट विक्रीतही मदत करतात. रवींद्र हे पीक व्यवस्थापनात मुख्य जबाबदारी पार पाडतात. पीकनिहाय ताळेबंद लागवडीची माहिती पेरू ः क्षेत्र पाच एकर, गादीवाफ्यावर लागवड, अंतर - ८ बाय १२ फूट. पेरू उत्पादन - प्रतिझाड ४० किलो फळे (दोन हंगामात) उत्पादन खर्च २० ते २५ हजार रु., तीन वर्षांतील सरासरी दर ४० रु. प्रतिकिलो, खर्च वजा जाता निव्वळ नफा - ५० हजार रु. लिंबू ः क्षेत्र तीन एकर, लागवड अंतर - आठ बाय आठ फूट, तीन वर्षातील सरासरी दर ५० रु. प्रतिकिलो उत्पादन १० क्विंटल, उत्पादन खर्च १० हजार रु., निव्वळ नफा - २० हजार रु. खरबूज ः क्षेत्र १० एकर, लागवड अंतर -पाच बाय सव्वा फूट. तीन वर्षांतील सरासरी दर १२ रु. प्रतिकिलो. उत्पादन - २० टन, उत्पादन खर्च ३० ते ३५ हजार रु., निव्वळ नफा - एक लाख रु. रवींद्र भोई, ९७६४२६५६३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com